घरमहाराष्ट्रचिंचवड पोटनिवडणुकीत वंचितचा कलाटेंना पाठिंबा

चिंचवड पोटनिवडणुकीत वंचितचा कलाटेंना पाठिंबा

Subscribe

महाविकास आघाडीच्या अडचणीत वाढ

चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. भाजपला कलाटे हेच रोखू शकतात. त्यामुळे चिंचवडमधील मतदारांनी कलाटे यांना निवडून आणावे, असे आवाहन वंचितने केले आहे. वंचितच्या या भूमिकेमुळे चिंचवडमध्ये आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. चिंचवडमध्ये अशी भूमिका घेणार्‍या वंचितने मात्र कसबा पेठ मतदारसंघाबाबत भूमिका घेण्याचे टाळले आहे.

पुणे जिल्ह्यातील भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे अनुक्रमे चिंचवड, कसबा पेठ विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या २६ फेब्रुवारीला मतदान होत आहे. पोटनिवडणुकीत सत्तारूढ भाजप-शिंदे गट आणि विरोधी पक्षातील महाविकास आघाडी यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असताना चिंचवडमधील शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांना वंचितने पाठिंबा दिला आहे. विशेष म्हणजे कलाटे यांनी उमेदवारी मागे घ्यावी म्हणून शिवसेनेकडून प्रयत्न झाले असतानाही वंचितने शिवसेनेसोबत झालेल्या युतीचा दाखला देत कलाटे यांना आपला पाठिंबा घोषित केला, तर कसबा पेठमध्ये पाठिंब्याबाबत वंचितला काँग्रेसच्या विनंतीपत्राची प्रतीक्षा आहे.

- Advertisement -

वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची बैठक गुरुवारी दूरदृष्य प्रणालीद्वारे पार पडली. या बैठकीमध्ये कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीबाबत चर्चा झाली. कसबा पेठमध्ये काँग्रेस लढत आहे, परंतु काँग्रेस पक्षाकडून अजूनही वंचित बहुजन आघाडीकडे कसबा मतदारसंघात पाठिंबा द्यावा, असे विनंतीपत्र आलेले नाही. त्यामुळे कसबा पेठबाबत निर्णय घेण्यात आला नाही, असे वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी स्पष्ट केले.

चिंचवडमध्ये २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राहुल कलाटे हे अपक्ष उमेदवार होते. त्यांना त्यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला होता. कलाटे हे शिवसेनेचे सभागृहाचे नेते आहेत. त्यामुळे ही जागा शिवसेनेने लढवावी आणि राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्यात यावी असा आमचा आग्रह होता, परंतु तसे घडले नाही. चिंचवड मतदारसंघात भाजपला राहुल कलाटे हेच थांबवू शकतात या मतापर्यंत वंचित आली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीने एकमताने राहुल कलाटे यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना दिलेल्या उमेदवारीमुळे कसबा पेठ येथील पोटनिवडणूक चुरशीची झाली आहे. येथे भाजपने दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबाला डावलून हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्याने मतदारसंघात काहीशी नाराजी आहे. विशेषकरून ब्राम्हण समाजाची नाराजी अंगलट येऊ नये म्हणून भाजपने गुरुवारी चक्क खासदार गिरीश बापट यांना आजारी असूनही प्रचारासाठी मैदानात उतरवले. त्याआधी बुधवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बापट यांना भेटायला गेले होते. गुरुवारी बापट व्हिलचेअरवर बसूनच प्रचारासाठी आले. त्यांना ऑक्सिजन लावले होते. त्यांचे हात थरथरत होते. त्यांना बोलायलाही जमत नव्हते. त्यामुळे थोडा वेळच त्यांनी पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी लिहून आणलेला संदेश हेमंत रासने यांनी कार्यकर्त्यांना वाचून दाखवला. यावरून भाजपला कसब्यातील निवडणूक जिंकण्यासाठी गिरीश बापट यांच्या ऑक्सिजनची गरज असल्याचे दिसले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -