घरमहाराष्ट्रनाशिकलतादिदींच्या संकल्पनेतून तिरडशेतला उभारण्यात येणार्‍या ‘हेल्थ सेंटरला’ ग्रामस्थांचा विरोध

लतादिदींच्या संकल्पनेतून तिरडशेतला उभारण्यात येणार्‍या ‘हेल्थ सेंटरला’ ग्रामस्थांचा विरोध

Subscribe

गावठाण विकासाकरिता जागा देण्याची मागणी

नाशिक : गानकोकिळा लता मंगेशकर यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मंगेशकर कुटुंबियांनी नाशिकमध्ये त्यांच्या नावे वृध्दालय उभारण्याचा संकल्प केला होता. त्याकरिता स्वरमाऊली फाउंडेशनच्या माध्यमातून शासनाकडे जागेची मागणी करण्यात आली होती. परंतु, नव्याने प्रस्ताव सादर करताना संस्थेने वृध्दालयाऐवजी आता आरोग्य केंद्र आणि रुग्णालय उभारणीसाठी जागा मागितली आहे. प्रशासनाने त्यांना त्र्यंबकेश्वररोडवरील तिरडशेत येथील जागा देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पण आता तिरडशेतच्या ग्रामस्थांनी लतादीदींच्या नावाने होणार्‍या हेल्थ सेंटरला जागा देण्यास विरोध केला असून त्यांनी या जागेचा वापर हा गावठान विकासासाठी करावा अशी मागणी केली आहे.

ज्येष्ठ कलाकारांसाठी वृध्दाश्रम असावे, असे लतादीदींचे स्वप्न होते. अनेकदा त्यांनी ते बोलूनही दाखविले होते. त्यांच्या निधनानंतर मंगेशकर कुटुंबियांनी या स्वप्नपूर्तीसाठी पुढाकार घेतला. ज्येष्ठ कलाकारांना हक्काचा निवारा असावा, त्यांची आपुलकीने काळजी घेतली जावी, ही भावना यामागे आहे. त्या अनुषंगाने स्वरमाऊली फाउंडेशनचे मयूरेश पै आणि ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांनी वृध्दाश्रम उभारणीसाठी जिल्हा प्रशासनाकडे जागेची मागणी केली होती. या उपक्रमासाठी आडगाव शिवारातील दोन जागा सूचविल्या गेल्या होत्या. संस्थेलाही ती जागा पसंत पडली. त्यामुळे प्रशासनाने आडगाव शिवारातील पाच एकर जागा संस्थेला देण्यासाठीचा प्रस्ताव गेल्या वर्षी शासनास पाठवला होता. तथापि, नंतर या जागेतून प्रस्तावित महामार्ग जाणार असल्याचे उघड झाल्याने उपरोक्त जागा देण्यास असमर्थता दर्शविली गेली. त्याचवेळी तिरडशेत येथील शासकीय जागेचा पर्याय सूचविला गेला. या जागेची पाहणी ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर आणि संस्थेच्या सदस्यांनी केली. प्रारंभी वृध्दालयासाठी जागा मागितली होती. आता आरोग्य केंद्र, रुग्णालय उभारणीसाठी जागा मागण्यात आली आहे. त्यांच्या मागणीनुसार मौजे तिरडशेत येथील गट क्रमांक १९ ही शासकीय जागा मुंबईच्या स्वरमाऊली फाउंडेशन संस्थेला आरोग्य केंद्र, दवाखाना आणि रुग्णालयासाठी देण्याच्या दृष्टिने प्रशासनाने छाननी सुरू केली आहे.

- Advertisement -

उषा मंगेशकर यांनी या जागेची पाहणी केल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, नाशिक तहसीलदार अनिल दौंडे आणि तहसीलदार (चिटणीस) राजेंद्र नजन यांनी याबाबतचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला. पण आता तिरडशेतच्या ग्रामस्थांनी एकत्र येत ही जागा ‘स्वरमाऊली फाउंडेशन’ला न देता त्या जागेचा वापर हा गावठान विकासासाठी करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. त्यामुळे आडगाव नंतर आता तिरडशेत येथील जागाही वादात सापडली आहे. खरेतर ही जागा ‘स्वरमाऊली फाउंडेशन’ला देण्यासाठीचा ना हरकत दाखलाही तिरडशेतच्या ग्रामस्थांनी ग्रामसभा घेत दिला आहे. असे असतांनाही ग्रामस्थांनी आज एकत्र येत विरोध दर्शवल्याने जमिनीचा हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -