घरमहाराष्ट्रVishwajeet Kadam : मविआने सांगलीच्या जागेचा फेरविचार करावा, विश्वजीत कदमांची पक्षश्रेष्ठींना विनंती

Vishwajeet Kadam : मविआने सांगलीच्या जागेचा फेरविचार करावा, विश्वजीत कदमांची पक्षश्रेष्ठींना विनंती

Subscribe

मविआच्या नेत्यांनी सांगली लोकसभेच्या जागेबाबत फेरविचार करावा, अशी विनंतीही विश्वजीत कदम यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली.

सांगली : काल मंगळवारी (ता. 09 एप्रिल) गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर महाविकास आघाडीकडून जागावाटप जाहीर करण्यात आले आहे. यामुळे सांगली आणि भिवंडी लोकसभेच्या जागेचा तिढा सुटल्याने मविआत सर्व काही आलबेल असल्याचेच पाहायला मिळाले. परंतु, सांगली लोकसभा ही ठाकरे गटासाठी सुटल्याने काँग्रेसच्या सांगली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी आणि नेतेमंडळींनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. यासाठी आज (ता. 10 एप्रिल) काँग्रेसचे सांगलीतील आमदार विश्वजीत कदम यांनी पत्रकार परिषद आयोजित करून आपली भूमिका स्पष्ट केली. पण मविआच्या नेत्यांनी सांगली लोकसभेच्या जागेबाबत फेरविचार करावा, अशी विनंतीही विश्वजीत कदम यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली. (Vishwajeet Kadam requested the leaders of MVA to reconsider the seat of Sangli Lok Sabha)

सांगली लोकसभेची जागा ठाकरे गटाकडे गेल्यापासून सांगली जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी विशेषतः आमदार विश्वजीत कदम आणि नेते विशाल पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. यासाठी त्यांनी काँग्रेसच्या राज्यातील आणि दिल्लीतील पक्षश्रेष्ठींची भेट घेतली. पण या कोणत्याही भेटीचा फायदा न झाल्याने या नेत्यांनी आज पलूसमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली.

- Advertisement -

हेही वाचा… Lok Sabha 2024 : माढा लोकसभेसाठी शरद पवारांची खेळी, धैर्यशील मोहिते पाटलांना देणार उमेदवारी?

या पत्रकार परिषदेत आमदार विश्वजीत कदम म्हणाले की, आपल्या सर्वांना माहिती आहे, जागावाटपाची चर्चा चालू झाल्यापासून काँग्रेस पक्ष सातत्याने आणि सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी, सांगली जिल्ह्याचा इतिहास पाहता, सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेस पक्षाला मिळावा यासाठी आम्ही सर्वांनी खूप प्रयत्न केले. आम्ही पक्षश्रेष्ठींना नागरिकांच्या भावना पोहोचवण्याचा मनापासून प्रयत्न केला आहे.

- Advertisement -

तसेच, आम्ही राज्यातील प्रमुख नेते आणि दिल्लीतील प्रमुखांना सांगली जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या भावना सांगितल्या आहेत. आम्ही सातत्याने पक्षश्रेष्ठींच्या भेटी घेत होतो. काँग्रेस पक्ष सांगलीची जागा लढायला सक्षम आहे, ही भावना सातत्याने मांडली. कारण या सांगलीत काँग्रेसचे दोन आमदार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेत काँग्रेसची ताकद आहे. त्यामुळे आम्ही या जागेची मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली, अशी माहिती आमदार विश्वजीत कदम यांच्याकडून देण्यात आली.

गेल्या काही दिवसात महाविकास आघाडीत जागावाटपात ज्या घडामोडी घडल्या ते सर्वांना माहिती आहे. कोल्हापूरची जागा श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढायची होती म्हणून ही जागा काँग्रेसला देण्यात आली. या परिस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांनी सांगलीच्या जागेचा दावा केला. या दाव्यातून त्यांनी 21 तारखेला अचानकपणे चंद्रहार पाटील यांनी उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर आमच्या राज्यातील ज्येष्ठ नेत्यांनी भूमिका घेतली. हा निर्णय एकतर्फी होता, त्यांनी इतर मित्रपक्षांना विश्वासात घेऊन हा निर्णय जाहीर करायला हवा होता, असे विश्वजीत कदम यांच्याकडून सांगण्यात आले.

हेही वाचा… Lok Sabha 2024: ठाकरेंच्या उमेदवाराचा होणार गेम? विशाल पाटलांचे बंधू प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला

पण, आता महाविकास आघाडीकडून काल जागावाटप जाहीर करण्यात आले. सांगली जिल्ह्याची राजकीय परिस्थिती काय आहे, याची पुन्हा एकदा माहिती घ्यावी. सांगलीच्या जागेबाबत पुन्हा फेरविचार करावा, अशी आमची विनंती आहे. आमच्या भावना समजून घ्याव्यात. सांगली जिल्ह्याबाबतची बातमी आम्हाला सहजासहज पचनी पडली नाही. त्यामुळे येणाऱ्या दिवसांत आम्ही सांगली जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न करु. यातून सकारात्मक मार्ग कसा निघेल? यासाठी प्रयत्न करु, असेही विश्वजीत कदम पत्रकार परिषदेत म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -