घरताज्या घडामोडीघाबरू नका; राज्यात ८०० रुग्णांच्या टेस्ट पैकी फक्त ४२ करोना पॉझिटिव्ह

घाबरू नका; राज्यात ८०० रुग्णांच्या टेस्ट पैकी फक्त ४२ करोना पॉझिटिव्ह

Subscribe

महाराष्ट्रात आतापर्यंत ८०० संशयित रुग्णांच्या चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी ४२ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असून इतर सर्व चाचण्या निगेटिव्ह आल्या असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच पुढच्या एक-दोन दिवसांत केईएम आणि हाफकिन मध्ये देखील करोनाची चाचणी सुरु होईल, असेही ते म्हणाले. आज मंत्रालयात करोना संबंधी अपडेट देत असताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नवीन उपाययोजनांची माहिती दिली. राज्यातील मेडिकल कॉलेजच्या प्रयोगशाळा देखील करोनाच्या चाचणीसाठी उपलब्ध करुन देण्यासंबंधी प्रयत्न केले जाणार असल्याचे ते म्हणाले. त्यासाठी संबंधित यंत्रणांशी देखील चर्चा केली जाणार आहे.

चाचणी कुणाची केली जाते?

करोनाची चाचणी करण्यासाठी लागणारे किट हे केंद्र सरकारकडून मिळते. सध्या राज्यात किटची कमतरता नाही, मात्र तरिही आम्ही अतिरिक्त किटची मागणी केली आहे. तसेच केंद्राला शक्य नसल्यास राज्य हे किट आयात करेल, असे टोपे यांनी सांगितले. तसेच करोनाची चाचणी करण्यासाठी दोन निकष लावलेले आहेत. एक म्हणजे ज्या रुग्णांमध्ये करोना आजाराची लक्षणे असतील किंवा ज्या रुग्णांचा परदेशातील प्रवासाचा इतिहास आहे, अशाच रुग्णांची आम्ही चाचणी करत असल्याचे टोपे म्हणाले आहेत.

- Advertisement -

आरोग्य मंत्री राजेश टोपे आज पुण्यातील राष्ट्रीय विषाणून विज्ञान संस्था (NIV) आणि इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) संस्थांना भेट देणार आहेत. राज्यात करोनाची चाचणी करण्यासाठी नवीन प्रयोगशाळा NIV च्या देखरेखीखाली स्थापन केल्या जाणार आहेत. तसेच ICMR संस्थेचेही लोक पुण्यात असल्यामुळे दोन्ही संस्थांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन करोना विरोधातील लढा आणखी तीव्र करण्याबाबत विचारविमर्श करणार असल्याचे टोपे यांनी सांगितले. तसेच पिंपरी चिंचवड आणि पुणे येथील रुग्णांची परिस्थितीही तपासणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -