घरमहाराष्ट्रपाच वर्षांत तुम्ही काय दिवे लावलेत

पाच वर्षांत तुम्ही काय दिवे लावलेत

Subscribe

गुजरातचे मॉडेल दाखवून भाजपने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसविरोधी प्रचार करत सत्ता मिळवली. काँग्रेस सरकारविरोधातील राग म्हणून जनतेने आपल्याला निवडून दिल्याचा दावा भाजप करत आहे. परंतु ही सत्ता दिल्यानंतर पाच वर्षांत काय केले हे न सांगता ५० वर्षे काँग्रेस सरकारने काय केले हेच सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. जनतेने जर तुम्हाला निवडून दिले आहे, तर तुम्ही काय कामे केली हे विचारण्याचा अधिकार त्यांना आहे. त्यामुळे पाच वर्षात काय दिवे लावलेत ते आधी सांगा, असा खडा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोरीवली येथील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना केला.

उत्तर मुंबईच्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या प्रचाराचा समारोप बोरीवली गोराईतील जाहीर सभेने झाला. या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, मनसेचे उपाध्यक्ष नयन कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना शरद पवार यांनी, महायुतीची जाहीर सभा गुरुवारी वांद्रे कुर्ला संकुलात पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या सभेसाठी आले होते.

- Advertisement -

ते इथे आल्यामुळे मुंबईबाबत काही बोलतील अशी अपेक्षा होती. परंतु मुंबईकरांचे कौतुक करण्यापलिकडे ते काही करू शकले नाही. अशा कौतुकांनी हुरळून जाणारी मुंबई नाही, असे सांगत पवार यांनी या देशाला स्थिरता आणि दिशा देणारी मुंबई आहे, असे स्पष्ट केले. उर्मिला मातोंडकर यांना काँग्रेस पक्षाने संधी देवून एका कलाकाराचा गौरव केला आहे. त्यामुळे त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आपली आहे, असे सांगत सर्वांनी एकत्र कामाला लागा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

गांधी कुटुंब देशासाठी समर्पित
आज नरेंद्र मोदी आपण पाच वर्षांत काय केले हे सांगण्याऐवजी नेहरु-गांधी घराण्यावर आरोप करत आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात नेहरुंनी ९ वर्षांचा तुरुंगवास भोगला. तरीही मोदी विचारतात नेहरुंनी देशासाठी काय केले म्हणून. स्वर्गीय इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या हत्या पंतप्रधान असताना झाल्या. आई आणि मुलगा देशासाठी शहीद झाला तरीही गांधी कुटुंबाचे योगदान काय म्हणून विचारता? पाकमधून जेव्हा घुसखोरी होऊ लागली. तेव्हा पाकला समज देऊनही त्यांनी न ऐकल्याने अखेर दोन तुकडे करून टाकले. देशाची प्रतिष्ठा त्यांनी राखली. आज आपल्या हातात जो मोबाईल फोन घेवून फिरतोय, ते दळणवळणाचे तंत्र राजीव गांधी पंतप्रधान असताना आणले गेले.

- Advertisement -

आज शेतकरीही शेतातून मोबाईलवरून बोलत आहे. ही किमया त्यांनी साधली आहे. त्यामुळे नेहरु व गांधी कुटुंबांनी केलेल्या त्यागाचा सन्मान करण्याऐवजी आरोप केले जात आहेत. राजीव गांधीच्या हत्येनंतर सोनिया गांधी देश सोडून इटलीला जातील,असे बोलले जात होते. परंतु त्यांनी देशाशी बांधिलकी असल्याने देश सोडला नाही. उलट काँग्रेसचे नेतृत्व स्वीकारुन पक्षाला उभारी दिली,असे सांगत पवारांनी गांधी घराण्याच्या त्यागाची उदाहरणेच दिली.

जोवर भाजप जात नाही, तोवर आपण स्वस्थ बसणार नाही,असा निर्धारच अशोक चव्हाण यांनी केला. तर मतशाही हवीय की हुकूमशाही असा सवाल करत उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी शेट्टी यांच्याविरोधात आपण घट्ट पाय रोवून उभे आहोत. केवळ आपल्या सर्वांच्या पाठबळावरच असे सांगत सत्तेमुळे माजलेल्यांचा माज उतरवायलाच हवा,असे पवारांनी ठणकावून सांगितले.

वाघांना दिल्लीत पाठवायला राणीबाग नाही
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे वारंवार शिवसेनेच्या वाघांना दिल्लीत पाठवा, असे आवाहन करत आहेत. याचा समाचार घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी दिल्लीतील ती सार्वभौम अशी संसद आहे, राणीबाग नाही, असे सांगत ठाकरेंची खिल्ली उडवली.

पवारांचे भाषण आणि पाचवर काटा
प्रचाराची वेळ शनिवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत असल्याने त्या वेळेतच प्रचार संपवण्याचे निर्देश होते. परंतु बोरीवलीतील समारोप सभेत शरद पवार ४ वाजून ४८ मिनिटाला बोलायला उभे राहिले.भाषण रंगात आलेले असताना, पाच वाजले. तसेच निवडणूक अधिकार्‍यांची धक धक वाढू लागली. शेवटी ५ वाजून ०३ मिनिटांनी पदाधिकार्‍यांच्या लक्षात ही बाब निवडणूक अधिकार्‍यांनी आणून दिले. त्यानंतर पवारांनी आपले भाषण आटोपते घेतले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -