घरमहाराष्ट्रमाझ्यावर सगळ्यांचे प्रेम का ऊतू चालले आहे? अजितदादांचा शिंदे गटातील नेत्यांना सवाल

माझ्यावर सगळ्यांचे प्रेम का ऊतू चालले आहे? अजितदादांचा शिंदे गटातील नेत्यांना सवाल

Subscribe

नागपूर : शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (Nationalist Congress Party) देखील फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचे बोलले जाते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Opposition leader Ajit Pawar) यांच्यातील जवळीक वाढत असल्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान दिसत होते. त्यातच आता शिंदे गटातील नेते आणि शिंदे-फडणवीस सरकारमधील तीन मंत्र्यांनी अजित पवार यांच्याबद्दल भाष्य केले आहे. त्यावर अजित पवार यांनी मात्र, माझ्यावर सगळ्यांचे एवढे प्रेम का ऊतू चालले आहे? असा मिश्किल सवाल केला आहे.

एका बाजूला सत्तेत नसणे आणि दुसर्‍या बाजूला केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईची टांगती तलवार अशा दुहेरी संकटात सापडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. महाराष्ट्रातील सत्तासंर्षावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल केव्हाही अपेक्षित आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवरच राष्ट्रवादी आणि भाजपाची जवळीक वाढताना तसेच काँग्रेस, ठाकरे गटात अंतर पडताना दिसत आहे. अगदी याचप्रकारे भाजपा-शिवसेनेच्या नेत्यांमध्येही धुसफूस आहे. भाजपा नेते राधाकृष्ण विखे-पाटलांची भावी मुख्यमंत्री म्हणून सोशल मीडियावर अफवा पसरणे आणि राष्ट्रवादी भाजपसोबत गेल्यास आम्ही स्वबळावर लढण्यास समर्थ आहोत, हे शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांचे वक्तव्य बरेच काही सांगून जाते. अयोध्या दौर्‍यातही किमान डझनभर सेना नेते अनुपस्थित होते.

- Advertisement -

त्यातच अदानी प्रकरण, ईव्हीएम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिग्रीवरून विरोधक केंद्रातील भाजपाला कोंडीत पकडण्यासाठी जोर लावत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अदानींची बाजू घेत आणि मोदींना सॉफ्टकॉर्नर दाखवत काँग्रेसच्या विरोधातील हवाच काढून घेतली. तर, विरोधी पक्षनेते अजित पवार मधेच नॉट-रिचेबल होऊन चर्चांना खतपाणी घालतात. बंडखोरी झाल्यास राष्ट्रवादीचे अंदाजे 30 आमदार अजितदादांना साथ देण्याची शक्यता आहे.

एकीकडे हे सर्व घडत असताना शिंदे गटातील नेते व राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil), उदय सामंत (Uday Samant) आणि दादा भुसे (Dada Bhuse) यांनी अजित पवार यांच्याबद्दल भाष्य केले आहे. अजित पवारांसोबत बरेच आमदार असून अजित पवार हीच खरी राष्ट्रवादी आहे, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. कोणतेही लग्न व्हायचे असेल तर तिथीची गरज असते. मात्र, त्यासाठी कुळ बघावे लागेल आणि गुणही जुळवावे लागतील. नंतरच ते काम करावे लागेल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

- Advertisement -

या आधी उदय सामंत यांनीही अजित पवार यांचे कौतुक केले होते. ‘विरोध करताना तो हास्यास्पद होणार नाही, अशाच मुद्द्यांचा करावा, असे अजित पवार यांनी ईव्हीएमबाबत म्हटले आहे. त्यांचे हे मत कौतुकास्पद आहे, असे त्यांनी म्हटले होते. तर, अजित पवार यांच्या बाबतीत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहेत, त्याबद्दल मला माहीत नाही. तथापि, अजितदादा अस्वस्थ आहेत, असे मला वाटते. त्यामुळे आगामी काळात काहीही होऊ शकते, अशी टिप्पणी दादा भुसे यांनी केली आहे.

याबाबत अजित पवार यांना छेडले असता, गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसे… अनेक जण बोलले. माझ्यावर या सगळ्यांचे एवढे प्रेम का ऊतू चालले आहे? असा मिश्किल सवाल त्यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -