घरमहाराष्ट्रलोकसभा की विधानसभा निवडणूक लढविणार? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले...

लोकसभा की विधानसभा निवडणूक लढविणार? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

Subscribe

मुंबई : सन 2019मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने 25 तर, शिवसेनेने 23 जागा लढविल्या होत्या. तर, आता 2024मध्ये भाजपा 26 तर, शिंदे गट आणि अजित गट मिळून 22 जागा लढविणार आहेत. दस्तुरखुद्द भाजपाचे ज्येष्ठ नेते तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे. त्याचबरोबर लोकसभा की विधानसभा निवडणूक लढविणार, हेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – वैयक्तिक कारणासाठी फडणवीसांचा राजीनामा मागत नाही, त्यामागे… सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

- Advertisement -

भाजपा तसेच शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात धुसफूस सुरू असल्याची चर्चा चुकीची आणि आधारहीन असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती खर्‍या अर्थाने एकवटली असून त्यात कोणतीही अडचण नसल्याचे फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जबाबदारी घेण्यास खंबीर असून नेतृत्वात बदल होणार असल्याच्या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही, असे त्यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना सांगितले.

फडणवीस यांनी लोकसभेच्या जागावाटपाचा फॉर्म्युलाही सांगितला. महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार गट यामध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. महाराष्ट्रातील एकूण 48 जागांपैकी भाजपा 26 जागा, तर शिवसेना आणि अजित पवार गट मिळून 22 जागा लढविण्याचे प्रस्तावित आहे, असे ते म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – मोदी-शहांपेक्षा राहुल गांधी यांच्या सभांना जास्त गर्दी, संजय राऊतांचा निशाणा

मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही. पण विधानसभा निवडणुकीत मी नागपूरच्या माझ्या पारंपरिक जागेवरून पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवेन, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. दिवाळीत फडणवीस यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला होता. मी विधानसभेचीच निवडणूक लढविणार आहे. ती देखील माझ्या नागपूर मतदारसंघातूनच लढवेन, असे त्यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते.

लोकसभा निवडणुकांपूर्वी आरक्षणाचा प्रश्न मार्गी?
गेल्या काही महिन्यांपासून आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, यासाठी ओबीसींचेही आंदोलन सुरू आहे. राज्यभरात सुरू असलेल्या या आंदोलनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचाच प्रश्न उपस्थित झाला असून राज्यातील गुंतवणुकीवर देखील याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी भीती फडणवीस यांनी व्यक्त केली. खूप उशीर होण्यापूर्वी आम्हाला या प्रश्नांना युद्धपातळीवर हाताळावे लागेल. मी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार याबाबत गंभीर असून, लोकसभा निवडणुकीपूर्वी यातून मार्ग निघेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -