घरमहाराष्ट्रWinter Session : "राज्यात-केंद्रात तुमचीच सत्ता...", मराठा आरक्षणावरुन अमित देशमुखांचा सरकारला सल्ला

Winter Session : “राज्यात-केंद्रात तुमचीच सत्ता…”, मराठा आरक्षणावरुन अमित देशमुखांचा सरकारला सल्ला

Subscribe

नागपूर : महाराष्ट्रात आरक्षणाची चर्चा जोर धरू लागली आहे. आघाडी आणि युतीच्या काळापासून आरक्षणाचे मुद्दे वेळोवेळी समाजामध्ये चर्चेला आले. अगदी 1995 पासून राज्यात जेव्हा युतीचे सरकार आले, त्यानंतर आघाडीचे सरकार आले. तेव्हापासूनच आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला असे नाही तर अनेक दशकांपासून वेगवेगळ्या आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मराठवाड्यातील मनोज जरांगे पाटलांच्या अलिकडे झालेल्या आंदोलनामुळे ही चर्चा होत आहे, असे मी म्हणालो तर चुकीचे ठरणार नाही. मराठ्यांचे आंदोलन गेल्या तीन महिन्यांपासून आपल्याला पाहायला मिळाले. मराठा समाजाला आरक्षण द्यावे, यांवर कोणाचेच दुमत नाही. इतर समाजांच्या आरक्षणाला धक्का लागू नये, असेही सांगण्यात येत आहे. समाजाला मराठा आरक्षणाचा मुद्दा लागेल असे का वाटत आहे कारण ज्यांची राज्यात सत्ता आहे त्यांची केंद्रात देखील सत्ता आहे. त्यामुळे या दोघांनी मिळून तोडगा काढला तर यांवर नक्कीच मार्गी लागेल असे समाजाला वाटत आहे, असे म्हणत आज (ता. 13 डिसेंबर) काँग्रेस पक्षाचे आमदाक अमित देशमुख यांनी 293 च्या अंतर्गत मांडण्यात आलेल्या मराठा आरक्षणाच्या प्रस्तावावर भाषण केले. (Winter Session: Amit Deshmukh’s advice to the government on Maratha reservation)

हेही वाचा – Winter Session : मराठा आरक्षणावरील भुजबळांचे भाषण एकांगी, भास्कर जाधवांची सडकून टीका

- Advertisement -

विधानसभेत बोलताना अमित देशमुख म्हणाले की, केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यरत आहेत. त्यांच्या अंतर्गत राज्यातील सरकार कार्यरत आहे. या देशात जेव्हा सगळ शक्य आहे तेव्हा हे का शक्य नाही. त्यामुळे मराठा समाजाच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. लाखो-करोडो लोक आज रस्त्यावर येत आहेत. मनोज जरांगे पाटील त्यांचे नेतृत्व करत आहेत, लोक त्यांच्या मागे खंबीर उभे राहात आहे, हे आपण पाहिले पाहिजे आणि त्यांची भूमिका समजून घेतली पाहिजे. मराठवाड्यात या आरक्षणाची चर्चा होत आहे, मराठा आरक्षणाचे केंद्रबिंदू मराठवाडा बनले आहे. मराठा आणि कुणबी यांच्यात फार वेगळेपण होते असे नाही. इम्पेरिकल डेटामध्ये सुद्धा याबाबतचे दाखले देण्यात आले आहे. धाराशीवमध्ये मराठा आणि कुणबी एकच आहे, असे दाखले सापडलेले आहे, अशी माहिती यावेळी अमित देशमुख यांच्याकडून देण्यात आली आहे.

तसेच, जेव्हा मोठ्या संख्येने समाज एकवटतो, तेव्हा समाजाच्या पुढाऱ्यांनी याची नोंद घेतली पाहिजे. एकनाथ शिंदेंनी मराठ्यांना आरक्षण देणार हे सांगितले ते कौतुकास्पद आहे. गरज पडल्यास सर्व पक्षीय नेत्यांनी पंतप्रधानांची भेट घेण्याचे ठरवले तर याचा मोठा फायदा होऊ शकतो. अनेक नेत्यांनी मराठा आरक्षणावर काम केले आहे. त्यामुळे यामध्ये कोणतेही राजकारण झालेले नाही, याचे समाधान आहे. पण आपण लोकप्रतिनिधी आहोत, लोकांनी आपल्याला निवडून दिले आहे. लोकसभेत कदाचित जितके पाठबळ नरेंद्र मोदींना नाही त्यापेक्षा जास्त पाठबळ या विधिमंडळात एकनाथ शिंदेंना आहे. त्यामुळे या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी अजून कोणते पाठबळ या सरकारला हवे आहे? असा प्रश्नही त्यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आहे.

- Advertisement -

विकसित भारत ही मोहीम भारत सरकारने सुरू केली आहे. पण जेव्हा ही मोहीम भारत सरकारकडून सुरू होते, पण तरी सुद्धा आरक्षणाची गरज का भासावी, याचे आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. राज्यामध्ये जे आंदोलन सुरू आहे त्याचा जर का सन्मान करायचा असेल तर या आंदोलनामध्ये जे मृत्यूमुखी पडले त्यांच्या कुटुंबियांना काय मदत केली याची माहिती सरकारने सभागृहात दिली पाहिजे. ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे, त्यांच्यावरील गुन्हे कधी मागे घेणार याबाबतची माहिती देण्यात आली पाहिजे. 24 डिसेंबरला नेमके काय होणार याची माहिती सरकारकडून सभागृहाला देण्यात आली पाहिजे, असेही देशमुखांकडून यावेळी सांगण्यात आले.

तसेच, महाराष्ट्रातील एकही गाव नसेल जिथे हे आंदोलन झाले नसेल. मराठ्यांचे मोर्चे हे फक्त मराठवाड्यात नाही निघाले तर मुंबई, दिल्ली येथेही “एक मराठा, लाख मराठा” हे मोर्चे निघाले. या समाजाच्या भावना, वेदना समजून घेतल्या पाहिजे. एक समुह मोठ्या संख्येने एकवटतो तेव्हा तो लक्षवेधी ठरतो. त्यामुळे आमची धारणा आहे की आरक्षणावर कायमस्वरुपी तोडगा काढायचा असेल तर समाजाच्या भावनेशी आपण एकरूप आहोत हे दर्शविण्याची गरज आहे. आम्हा सर्वांना आशा आहे की हे आरक्षण मिळेल, ते मिळावे. याबाबत आपण केंद्र सरकारशी चर्चा कराल. जनगणना येणाऱ्या काळात करावी लागेल. ज्यामुळे सरकारला आणखी मदत होईल. या सगळ्यामध्ये केंद्र सरकारसोबत चर्चा करून, विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करून याबाबतचा तोडगा काढावा, ही मागणी आमची असल्याचेही अमित देशमुख म्हणाले.

या चर्चेच्या निमित्ताने एवढेच विषद करायचे आहे की, या संदर्भामध्ये आम्ही सर्व सरकारबरोबर आहोत. आपण सरकार म्हणून मजबूत पाऊल टाका. सरकारला या आरक्षणाच्या संदर्भात काही करायचे ठरवले तर विधानसभा आणि लोकसभा इथून कोणतीही अडचण येईल, असे वाटत नाही. मनोज जरांगे पाटील हे या आंदोलनामुळे पुढे आलेले आहेत. त्यांनी घेतलेल्या सभेसारखी सभा या आधी महाराष्ट्रात झाली नसावी, त्यामुळे त्याची ऐतिहासिक नोंद करण्यात आली आहे, असे म्हणत यावेळी अमित देशमुख यांनी मनोज जरांगे पाटील यांचेही कौतुक केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -