घरमहाराष्ट्रWorld Cancer Day: बदललेल्या जीवनशैलीमुळे 'कॅन्सर' वाढतोय

World Cancer Day: बदललेल्या जीवनशैलीमुळे ‘कॅन्सर’ वाढतोय

Subscribe

महाराष्ट्रात कॅन्सरच्या रुग्णांचं प्रमाण वाढत आहे. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनामुळे कॅन्सर होतो हे लोकांना माहित आहे. मात्र बदललेल्या जीवनशैलीमुळे देखील 'कॅन्सर'चा वाढत असल्याचे समोर आले आहे.

मुंबईसह महाराष्ट्रात कॅन्सरच्या रुग्णांचं प्रमाण वाढत आहे. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनामुळे कॅन्सर होतो हे ही लोकांना माहित आहे. भारतात दरवर्षी एक लाख तोंडाच्या कर्करोगाचे रुग्ण आढळून येतात. धक्कादायक म्हणजे नवीन प्रकरणातील ५० टक्के रुग्ण कॅन्सरचं निदान झाल्यानंतर वर्षभराच्या आत मृत्यू पावतात. याशिवाय, जे अन्य कॅन्सरचे प्रकार आहेत जसे की, ब्रेस्ट कॅन्सर, गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर, अंडाशयाचा कॅन्सर, स्वादुपिंडाचा कॅन्सर या आणि अशा अनेक प्रकारच्या कॅन्सरचंही प्रमाण वाढत आहे. याचं कारण नेमकं काय ? तसेच, कॅन्सरबद्दल असणारे समज – गैरसमज, कोणत्या वयात कॅन्सरबाबतच्या चाचण्या केल्या जाऊ शकतात. तसेच बदललेली जीवनशैलीमुळे वाढणाऱ्या कॅन्सरचे प्रमाण नेमके किती आहे? या संपूर्ण विषयाबाबत जागतिक कॅन्सर दिनानिमित्त एशियन कॅन्सर इंन्स्टिट्यूचे ऑन्कोलॉजिस्ट ‘डॉ. सुहास आगरे’ यांच्याशी केलेली खास बातचीत…

कॅन्सर काय आहे आणि कसा होतो?

कॅन्सर म्हणजे अनियंत्रित पेशी – विभाजनामुळे उद्भवणारा एक रोग आहे. या रोगामुळे शरीरातील निरोगी ऊतींचा नाश होतो आणि ज्या खराब झालेल्या उती आहेत त्या मोठ्या प्रमाणात शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांमध्ये पसरुन ते अवयव निकामी करतात. तसेच, या पसरणाऱ्या उतींवर शरीराचं नियंत्रण राहत नाही आणि त्यातून आणखी काही संधीसाधू आजार जडले की त्या व्यक्तीवर नेमक्या कशा पद्धतीने उपचार करावे हे देखील डॉक्टरांना कळत नाही.

- Advertisement -

कॅन्सरचे नेमके प्रकार किती आणि कोणकोणते आहेत?

शरीरातील मुख्य अवयवांएवढे कॅन्सरचे प्रकार आहेत. जसे की, तोंडाचा कॅन्सर, अन्ननलिकेचा कॅन्सर, गळ्याचा कॅन्सर, लहान आणि मोठ्या आतड्याचा कॅन्सर, पोटाचा कॅन्सर, गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर ज्यात गर्भपिशवी आणि योनीला जोडणाऱ्या अवयवाच्या उतींमध्ये तयार होणारा ट्यूमर तयार होतो. तसेच, स्वादुपिंडाचा कॅन्सर, सॉफ्ट टिशूस सारकोमा, लिम्फोमा, ल्यूकेमिया, हाडांचा कॅन्सर, यकृताचा कॅन्सर, फुप्फुसाचा कॅन्सर म्हणजेच शरीराच्या अवयवांनुसार वेगवेगळा कॅन्सर होऊ शकतो.

भारतातील महिलांमध्ये सर्वात जास्त आढळणारा कॅन्सर कोणता?

भारतातील महिलांमध्ये सर्वात जास्त ब्रेस्ट कॅन्सर आढळतो. वयाच्या २० वर्षांपासून ते अगदी चाळीशीनंतरच्या महिलांना ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो. त्यानंतर गर्भाशयाच्या मुखाला होणारा कॅन्सर, तसेच, अंडाशयाला होणाऱ्या कॅन्सरचं प्रमाण ही वाढलं आहे. आधी गर्भाशयाच्या मूखाला होणारा कॅन्सर हा पहिल्या क्रमांकावर होता. आता त्यात बदल होऊन ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे.

- Advertisement -

महिलांमध्ये यामुळे वाढते ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण?

सध्याची जीवनशैली हे बैठी असल्याकारणाने महिलांमध्ये स्थूलपणा वाढल्याचं चित्र पाहायला मिळते. शिवाय, धूम्रपान , मद्यपान केलं जातं. बाळाला स्तनपान केलं जात नाही. त्यामुळे, २० वयोगटापासून ते ४० वयोगटापर्यंत महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण आढळतं.

भारतातील पुरुषांमध्ये सर्वात जास्त आढळणारा कॅन्सर कोणता?

पुरुषांमध्ये सर्वात जास्त आणि १०० टक्के तोंडाचा कॅन्सर आढळतो. कारण, पुरुष मंडळी सर्रास सिगारेट, चैनीखैनी, पान, सुपारी, गुटखा असे अनेक तंबाखूजन्य पदार्थ खातात. त्यामुळे त्यांच्या तोंडातील म्युकोसला हानी पोहोचते. शिवाय, हल्ली व्हायरल इंन्फेक्शन म्हणजेच ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीवी) मुळे देखील तोंडाचा कॅन्सर आढळताना दिसत आहे.

कॅन्सर बाबतचे समज – गैरसमज नेमके कोणते?

भेसळयुक्त अन्नपदार्थ, दूध किंवा फवारणी केलेल्या भाज्या, पेपरमधील पदार्थ खाल्ल्यानंतर होतो का असे अनेक गैरसमज लोकांमध्ये आहेत. पण, यापैकी एकाही गैरसमजावर ठोस संशोधन झालेले नाही. पण, फवारणी केलेल्या भाज्या न धुता खाल्ल्या तर कॅन्सर होण्याची शक्यता असू शकते.

कॅन्सरचे किती स्टेज आहेत? कोणत्या स्टेजवरील कॅन्सर बरा होऊ शकतो?

जर ब्रेस्ट कॅन्सरचं उदाहरण घेतलं तर ब्रेस्ट कॅन्सरमध्ये फक्त एका ठिकाणी जर गाठ झाली असेल आणि त्या गाठीचं वेळीच निदान झालं तर ती कॅन्सरची पहिली स्टेज असते. पहिल्या स्टेजवरील कॅन्सर ९० टक्के बरा होतो. पण, तीच गाठ ब्रेस्टसह काखेत, हाडांमध्ये झाली असेल तर त्या कॅन्सरची दुसरी किंवा तिसरी स्टेज असते. काही मोजकेच कॅन्सर चौथ्या स्टेजवर जाऊनही बरे होण्याची शक्यता असते. त्यामुळे, आपल्या शरीरातील एका तरी अवयवाला अॅबनॉर्मल वाटत असेल आणि त्यावर तुम्ही एक – दोन महिने उपचार घेत असाल तरी देखील बरं वाटत नसेल तर त्या दुखण्याकडे किंवा त्या गाठीकडे कॅन्सरच्या नजरेने पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे, लवकरात लवकर निदान आणि उपचार झाले तर नक्कीच कॅन्सर बरा होऊ शकतो. पण, त्यासाठी आपल्यामध्ये तेवढी जागृती असणे गरजेचे आहे.

महिला किंवा पुरुषांनी कशापद्धतीने रुटीन चेकअप करावं?

आपल्याला कोणत्याही प्रकारच्या आजाराचं निदान करायचं असेल तर त्या आधी रुटीन चेकअप करुन घेणं महत्त्वाचं आहे. ब्रेस्ट कॅन्सर होऊ नये म्हणून २० ते ४० वयोगटातील महिलांनी ‘सेल्फ ब्रेस्ट एक्झॅमिनेशन’ करणं गरजेचं आहे. त्यासोबतच काखेत ही एकदा कसल्याप्रकारची गाठ आहे का? हे तपासणे. तसेच चाळीस वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या महिलांनी महिन्यातून एकदा सेल्फ ब्रेस्ट एक्झॅमिनेशनच्या जोडीने वर्षातून एकदा ‘मॅमोग्राफी’ करून घेणं गरजेचं आहे.
आतड्यांचा कॅन्सर होऊ नये म्हणून वयाच्या पन्नाशीनंतर ५ किंवा १० वर्षांतून एकदा आतड्यांची एन्डोस्कोपी करुन घ्यावी. धूम्रपानाचा इतिहास असेल तर ५० ते ७४ वयोगटातील पुरुषांना लो डो सिटीस्कॅन करण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे फुप्फुसाचा कॅन्सर झाला आहे का? याचं निदान होऊ शकतं.

  • गळा किंवा तोंडाचा कॅन्सर ओळखण्यासाठी तंबाखूजन्य पदार्थ खातो का? याची क्लिनिकल तपासणी केली जाते.
  • गर्भाशय मुखाच्या कॅन्सरसाठी चाळीशीनंतर वर्षातून एकदा किंवा ५ वर्षांतून एकदा पॅप स्मिअर टेस्ट केली जाते.

पोटाच्या कॅन्सरची लक्षण कशी ओळखायची?

भूक न लागणे, सतत पोट भरल्यासारखे वाटणे, अॅसिडीटी, जेवण न पचणं, आंबट डेकर अशी लक्षण जर ३ आठवड्यांपेक्षा जास्त काळ असतील तर एकदा एन्डोस्कोपी करुन घेतली पाहिजे.

आतड्यांच्या कॅन्सरची लक्षणे कशी ओळखावी?

  • सतत जुलाब, पोटात दुखणे, काळ्या रंगाची संडास होणे, संडास मधून रक्त येणे, वजन कमी होणे, भूक न लागणे अशी लक्षणे ३ आठवड्यांपेक्षा जास्त असतील तर देखील एन्डोस्कोपी करुन घेतली पाहिजे.
  • पुरुषांमधील आढळणाऱ्या प्रोस्टेट कॅन्सरसाठी सीरम पीएसए ही रक्ताची चाचणी केली जाते. प्रोस्टेट कॅन्सर हा पन्नाशीनंतर पुरुषांमध्ये आढळतो. त्यामुळे ५० ते ७५ वयोगटातील पुरुषांना डिजीटल लेक्टल एक्झामिनेशन केलं जातं.

वर्षाला भारतात किती कॅन्सर पेशंट आढळतात?

भारतात वर्षाला ३० लाख कॅन्सर रुग्ण आढळतात. त्यापैकी ५ लाख रुग्णांचा वेगवेगळ्या कॅन्सरमुळे मृत्यू होतो. तर, १२ लाख नवीन केसेस दरवर्षी आढळतात. कॅन्सर होण्याचं सर्वात मुख्य कारण म्हणजे आपली बदललेली जीवनशैली आणि अनियमित डाएट. त्यात खाण्यापिण्याच्या सवयी, त्यातून वाढती स्थूलता, जंक फूड, अनियमित व्यायाम, धूम्रपान, मद्यपान अशा सवयी जर टाळल्या तर नक्तीच कॅन्सर टाळता येऊ शकतो. खूप कमी कॅन्सर अनुवांशिक असतात. पण, उर्वरित अनेक कॅन्सरला रोख लावता येऊ शकतो.


वाचा – जागतिक कॅन्सर दिन – ब्रेस्ट कॅन्सरमुळे जगभरात महिलांचा सर्वाधिक मृत्यू


 

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -