घरमहाराष्ट्रWorld Cancer Day: ब्रेस्ट कॅन्सरमुळे जगभरात महिलांचा सर्वाधिक मृत्यू

World Cancer Day: ब्रेस्ट कॅन्सरमुळे जगभरात महिलांचा सर्वाधिक मृत्यू

Subscribe

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार संपूर्ण जगभरात २००५ ते २०१८ या तेरा वर्षामध्ये ८८ दशलक्ष लोकांचा मृत्यू कर्करोगामुळे झाला आहे. तसेच ब्रेस्ट कॅन्सरमुळे जगभरात महिलांचा सर्वाधिक मृत्यू होत असल्याची माहिती समोर आली आहे.

भारतात दिवसेंदिवस कर्करोग रुग्णांची संख्या वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार संपूर्ण जगभरात २००५ ते २०१८ या तेरा वर्षामध्ये ८८ दशलक्ष लोकांचा मृत्यू कर्करोगामुळे झाला असून आशिया खंडामध्ये कर्करोग हे महिलांच्या मृत्यूंचं मुख्य कारण आहे. कर्करोगाविषयी जनजागृती करणं आवश्यक असल्यामुळे ४ फेब्रुवारी हा जागतिक कर्करोग दिन जगभर साजरा केला जातो. यानिमित्ताने जगभरातील कर्करोग निदान संस्थेमध्ये कर्करोगाविषयी काळजी कशी घ्यावी, त्याची लक्षणं काय आहेत तसेच त्यावर उपचार काय आहेत? याबद्दल जनजागृती केली जाते. ‘आय एम – आय विल ‘म्हणजेच’ मी आहे…मी राहणार’ हे २०१९ सालचे ब्रीदवाक्य असून कर्करोगाशी एकजुटीने लढणे हाच एकमेव मार्ग आहे.

वर्षाला ५ लाख मृत्यू

कर्करोग म्हणजे अनियंत्रित पेशी – विभाजनामुळे उद्भवणारा एक रोग. या रोगामुळे शरीरातील निरोगी ऊतींचा नाश होतो आणि जीवाला धोका निर्माण होतो. भारतात वर्षाला जवळपास ५ लाख लोक कर्करोगामुळे मृत्युमुखी पडतात, जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, २०२५ साली ही संख्या ७ लाखांच्या घरात पोहोचण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

२८ पैकी एका महिलेला कॅन्सर

याविषयी अधिक माहिती देताना बोरीवली येथील अपेक्स हॉस्पिटल समूहाच्या कर्करोगासंबंधीत लॅप्रोस्कॉपीक शल्यचिकित्सक डॉ. अदिती अग्रवाल यांनी सांगितलं, ‘गेल्या काही वर्षात स्तनांचा कर्करोग हा तरुण वयातच होण्याचं प्रमाण अधिक वाढलेलं दिसत आहे. पूर्वीपेक्षा हे प्रमाण अधिक वाढलं आहे. त्यामुळे स्तनाच्या कर्करोगाशी लढायचे असेल तर नियमित स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. वयाच्या २० वर्षापासूनच डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी जेणेकरून या कर्करोगाचं निदान लवकर होण्यास मदत होईल आणि वेळीच उपचार केल्याने महिलेला नव्याने जीवनाची संधी मिळू शकते. जगभरातील महिलांचं मृत्यू होण्याचं प्रमुख कारण स्तनांचा कर्करोग हेच आहे. नुकत्याच केलेल्या संशोधनानुसार असं सिद्ध झालं आहे की दर अठ्ठावीस महिलांमधील एका महिलेला स्तनांचा कर्करोग होण्याची शक्यता असते. आहाराच्या चुकीच्या पद्धती, बैठी जीवनशैली, शहरीकरण, पाश्चिमात्यकरण, अनुवांशिकता, बाळाच्या जन्माच्या वेळी दूध न पाजणे. स्तनामध्ये गाठी आढळणे सामान्य बाब आहे. मात्र, काहीवेळा ही गाठ कर्करोगाची असू शकते. कर्करोगांच्या पेशींपासून तयार झालेली ही गाठ पसरत जाऊन हा आजार शरीरात बळावू शकतो’.

महिलांसाठी काही टीप्स

  • २० वर्षांवरील सर्व महिलांनी ‘सेल्फ ब्रेस्ट एक्झॅमिनेशन’, म्हणजेच स्तनाची स्वतः तपासणी करणे आवश्यक आहे.
  • या तपासणीमध्ये स्तनामध्ये कोणत्याही प्रकारची गाठ, किंवा स्तनातून कोणत्याही प्रकारचा स्राव होतो आहे का याकडे लक्ष देणे गरजेचे असते.
  • मासिक पाळीनंतर सातव्या दिवशी स्तनांची तपासणी करणे गरजेचे आहे.
  • चाळीस वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या महिलांनी महिन्यातून एकदा सेल्फ ब्रेस्ट एक्झॅमिनेशनच्या जोडीने वर्षातून एकदा ‘मॅमोग्राम’ करून घेणे गरजेचे आहे.
  • ज्या महिलांची मासिक पाळी बंद झाली असेल, त्यांनी महिन्याच्या एका ठराविक तारखेला ब्रेस्ट एक्झॅमिनेशन करणे आवश्यक आहे. जर स्तनामध्ये कोणत्याही प्रकारची गाठ, किंवा सूज आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

    वाचा – ‘या’ टेस्टमुळे मिळणार ब्रेस्ट कॅन्सरच्या महिलांना केमोथेरपीतून सुटका


Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -