घरदेश-विदेशदहावी-बारावी, विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकानुसारच

दहावी-बारावी, विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकानुसारच

Subscribe

राज्‍यातील शाळा-कॉलेज 31 मार्चपर्यंत बंद

मुंबईसह राज्यात वाढत असलेल्या करोना विषाणूचा संसर्ग लक्षात घेता खबरदारीचे उपाय म्हणून राज्यातील सर्व शाळा, कॉलेज सोमवारपासून ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने शनिवारी जाहीर केला. मात्र राज्यातील नऊ विभागीय मंडळात सुरू असलेल्या राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार आहेत. मात्र ग्रामपंचायत क्षेत्रातील शाळा पूर्ववत सुरू राहतील. करोनाच्या संसर्गावर उपचार घेणार्‍या रुग्णांचा खर्च सरकार उचलणार असल्याची घोषणा सार्वजनिक राजेश टोपे यांनी विधिमंडळात केली. रविवारपासून महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रातील मॉल्सही बंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला असून, जाहीर केलेले विवाह सोहळे रहित करून नोंदणी पद्धतीने पार पाडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान करोनामुळे बुलढाण्यात एकाचा मृत्यू झाला आहे. राज्यात करोनासदृश्य रुग्णांची संख्या ३१ झाली असून, विदेशातून आलेल्या ५ जणांची खातरजमा केली जात आहे.

मुंबईसह राज्यात करोना विषाणूचा प्रभाव वाढत चालला आहे. शनिवारपर्यंत राज्यभरात एकूण 31 करोनाग्रस्त रुग्ण असल्याचे आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आणखीन काही करोनाग्रस्त रुग्ण आढळून येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्य सरकारतर्फे अनेक खबरदारीचे उपाय राबविण्यात आलेल्या आहेत. ज्यात प्रामुख्याने गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचे आवाहन राज्य सरकारतर्फे करण्यात आले होते. त्यामुळे राज्यातील शाळा कॉलेजांना सुट्टी जाहीर करण्याची मागणी पालकवर्गांकडून करण्यात आली होती. मात्र राज्यात सर्वत्र सुरू असलेल्या परीक्षा लक्षात घेता शाळांना सुट्टी देण्याबाबत अनेक शाळा कॉलेजांनी एकमत दर्शविले नव्हते. मात्र याप्रकरणी राज्य सरकारने हस्तक्षेप करीत यासंदर्भातील निर्णय जाहीर करीत राज्यातील सर्व शाळांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी जाहीर केली आहे. यात राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, सरकारी, खासगी शाळांना हा नियम लागू करण्यात आला आहे. शाळांप्रमाणेच कॉलेज, व्यवसाय प्रशिक्षण केंद्र यांनादेखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

- Advertisement -

राज्य सरकारने जाहीर केलेल्या निर्णयानुसार शैक्षणिक संस्था साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, १९८७ च्या अन्वये हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, सुट्टी जाहीर केली असली तरी दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने त्यांच्यासाठी देखील खबरदारीच्या उपाययोजना राबविण्याची सूचना यावेळी करण्यात आल्या आहेत. ज्यात प्रामुख्याने आजारी विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणार नाही, यासाठी आवश्यक ती दक्षता व खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागाने हा निर्णय जाहीर केला असून त्याची सूचना शालेय शिक्षण विभाग आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाला दिली आहे. त्यानुसार या विभागांकडून तशा सूचना जाहीर करण्यात येणार आहेत.

राज्यातील पहिला मृत्यू बुलढाण्यात?

शहरापाठोपाठ आता ग्रामीण भागातही करोना विषाणूंचा संसर्ग जाणवू लागला आहे. गेल्या ७२ तासांत या विषाणूंचा संसर्ग झालेल्या सहा जणांचा समावेश झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यात एका करोना संशयिताचा मृत्यू झाल्याची बाब पुढे आली आहे. याशिवाय यवतमाळमधील दोन, तर नागपुरात आणखी एकाला करोनाची लागण झाल्याचे उघड झाले.

- Advertisement -

अमेरिकेतून प्रवास करून नागपुरात आलेल्या एकाला बुधवारी करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर अवघ्या ४८ तासांत करोनाची लागण झालेल्याची पत्नी आणि त्याच्याच सोबत विमान प्रवास करून आलेल्या एका सहकार्‍यालाही करोनाची बाधा झाल्याचे सिद्ध झाले. या तिघांसोबत आणखी चार संशयिताचे नमुने शुक्रवारी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. त्यापैकी तिघांचा अहवाल शुक्रवारी रात्रीच निगेटिव्ह आला होता. यापैकी एकाला करोनाची लक्षणे आढळल्याने त्या व्यक्तीचे पुन्हा एकदा नमुने गोळा करण्यात आले. त्याची तपासणी केली असता या व्यक्तीला करोनाची लागण झाल्याचे शनिवारी स्पष्ट झाले.

२५० रुग्णालयांचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप
नाशिकमधील अडीचशे रुग्णालयांचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करण्यात आला असून, करोनाशी संबंधित संशयित आढळल्यास तातडीने पालिकेला कळवता येईल, असा त्यामागील हेतू आहे.

मनसेचा गुढीपाडवा मेळावा रद्द!
मुंबईसह राज्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा २५ मार्चला होणारा गुढी पाडवा मेळावा रद्द करण्याचा निर्णय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतला आहे.

बीसीसीआयकडून सर्व स्पर्धा रद्द
करोना विषाणूमुळे बीसीसीआयने आपल्या सर्व स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील स्थानिक स्पर्धा रद्द करण्यात आल्या असून आयपीएलबाबत मात्र निर्णय घेतलेला नाही.

पद्म पुरस्कार वितरण लांबणीवर
करोनामुळे केंद्र सरकारकडूनही दक्षतेची पावलं उचलण्यात येत आहेत. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या पद्म पुरस्कारांच्या वितरण सोहळ्याची तारीख तुर्तास पुढे ढकलण्यात आली आहे.

इटलीच्या लोंबार्टीत १ हजार बळी
करोना व्हायरसमुळे इटलीच्या लोंबार्डी शहरात लागण झालेल्या एक हजार शहरवासीयांचा मृत्यू झाल्याचे पत्रकार फ्रान्सेस्का बोरी यांनी इंडिया टुडेला ही माहिती दिली.

पालिका क्षेत्रातील मॉलही बंद

करोनाच्या वाढत्या उपद्रवाची दखल घेत आता गर्दीची ठिकाणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून,याचा पहिला फटका राज्यातल्या मॉल्सना बसला आहे. खरेदीसाठी, फिरण्यासाठी मोठी गर्दी मॉलमध्ये होत असल्याची दखल घेत शाळा, कॉलेज यांच्यासह मॉल बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासंबंधीची घोषणा सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानमंडळात केली. मुंबईसह महत्वाच्या शहरातील सर्वच मॉल यामुळे अनिश्चित काळ बंद राहतील.

राज्यातील गर्दीच्या ठिकाणांना करोना विषाणूंचा मोठा फटका बसला आहे. राज्य सरकारने काल शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. गर्दीच्या ठिकाणांना या विषाणूंचा तात्काळ प्रभाव पडत असल्याचे लक्षात घेऊन राज्य सरकारने गर्दीच्या ठिकाणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत यासंबंधी घोषणा करताना राज्यातल्या महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रातील मॉल अनिश्चित काळपर्यंत बंद ठेवल्यामुळे नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना घरातच राहावे लागणार आहे.

नववर्ष स्वागतयात्रा रद्द त्र्यंबकमध्ये धार्मिक विधी रोडावले

करोना बाधितांची संख्या राज्यात वाढत असल्याने नाशिकमध्येही खबरदारीच्या उपाययोजना सुरू आहेत. नाट्यगृहांमध्ये वॉश बेसिनची व्यवस्था करत प्रवेश करताना प्रत्येकाला हात धुणे सक्तीचे केले आहे. तर, दुसरीकडे गुढी-पाडव्यानिमित्त काढण्यात येणार्‍या नववर्ष स्वागत यात्राही रद्द करण्यात आल्या आहेत. करोनासदृश रुग्णांवर महापालिकेची परवानगी न घेता उपचार केल्याप्रकरणी प्रशासनाने रुग्णालय व्यवस्थापनाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्र्यंबकेश्वर येथे नियोजित धार्मिक विधीही भाविकांनी रद्द केल्याची माहिती संबंधित पुरोहितांनी दिली तर, पुण्याच्या धर्तीवर नाशिकमधील शाळांनाही ३१ मार्चपर्यंत सुटी जाहीर करावी, अशी मागणी मनविसेने केली आहे.

शहरात फेब्रुवारी व मार्च महिन्यात इटली, इराण, न्युझीलंड, दुबई व अमेरिकेहून सात जण आले आहेत. त्यांना श्वसनाचे त्रास जाणवू लागल्याने उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे. सर्वांच्या घशातील स्त्रावाचे नमुने निगेटिव्ह आल्याने जिल्हा रुग्णालयाने सुटकेचा नि:श्वास सोडला असला तरी, खबरदारीचा उपाय म्हणून सर्वतोपरी काळजी घेतली जात असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाच्या सुत्रांनी दिली आहे.

नारायण नागबळीवर परिणाम
त्र्यंबकेश्वर येथे नारायण नागबळीसाठी देशभरातून भाविक नियमितपणे येत असतात. नारायण नागबळीसाठी अनेक महिने अगोदर बुकिंग केले जाते. सध्या करोनाच्या धास्तीने नागरिक गर्दीच्या ठिकाणी जाणे आणि प्रवासही टाळत आहेत. त्यामुळे राज्यातील मोठ्या शहरांमध्ये करोनाचा उद्रेक झाल्याच्या बातम्या आल्याने अनेकांनी नारायण नागबळी, त्रिपिंडी, कालसर्प विधीच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत. परिणामी त्र्यंबकेश्वरमध्ये येणार्‍या भाविकांची संख्या रोडावल्याचे सांगितले जात आहे.

नववर्ष स्वागत यात्रा रद्द
नवीन नाशिक – मराठी नववर्ष अर्थात गुढीपाडव्यानिमित्त नवीन नाशिकसह सातपूर, इंदिरानगर, अंबड, गंगापूर रोड, त्र्यंबकरोड, शरणपूररोड भागातून निघणार्‍या स्वागतयात्रा करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय स्वागत यात्रा नियोजन समित्यांनी घेतला आहे. इंदिरानगर भागातून निघणार्‍या सर्व ९ शोभायात्रादेखील रद्द करण्यात आल्या असल्या तरी येथील सर्व शोभायात्रांच्या नियोजन समित्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे एकत्रीकरण करून त्याठिकाणी रामरक्षा स्तोत्राचे पठण करण्यात येणार आहे.

माहिती न देणार्‍या रुग्णालयाला पालिकेची नोटिस
नाशिक- करोना संशयित म्हणून न्यूझीलंडहून आलेल्या रुग्णाची माहिती न देता परस्पर उपचार केल्याप्रकरणी आडगाव नाक्याजवळील एका खासगी रुग्णालयाला महापालिकेने नोटिस बजावली आहे. या रुग्णावर उपचार करणार्‍या डॉक्टर आणि स्टाफला तूर्तास रुग्णालयापासून दूर ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. या प्रकरणात रुग्णालयाकडून हलगर्जीपणा झाला असून, सेंट्रल एसी असल्याने करोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यताही रुग्णालयाने लक्षात घेतली नाही. यापुढे माहिती न देता परस्पर उपचार करणार्‍या रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिला आहे.

नाट्यगृहांमध्ये प्रेक्षकांसाठी वॉश बेसिन
नाशिक : सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांवरही करोनाचा परिणाम जाणवू लागला आहे. प्रेक्षकांची संख्या कमी होऊ नये, यासाठी शहरातील नाट्यगृहांबाहेर वॉश बेसिन, सॅनिटायजर व साबणाची व्यवस्था करण्यात आली आहे. नाट्यगृह परिसर दिवसातून तीन वेळा स्वच्छ केला जात आहे. कार्यक्रमांना प्रेक्षकांची संख्या कमी होऊ नये, यासाठी कुसुमाग्रज स्मारक, सावानातर्फे दिवसातून तीन वेळा स्वच्छता केली जात आहे. प्रेक्षकांचादेखील त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नाट्यगृहांमध्ये करोना आटोक्यात येईपर्यंत स्वच्छतेसाठी सर्वेतोपरी काळजी घेतली जाणार आहे, असे कुसुमाग्रज स्मारक, सावाना, आणि नाट्यगृहांच्या व्यवस्थापकांनी सांगितले.

शाळांना सुटी द्या; मनविसेची मागणी
करोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात कुठल्याही उपाययोजना केल्या जात नसल्याचा दावा करत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने ३१ मार्चपर्यंत शाळा आणि महाविद्यालयांना सुट्ट्या जाहीर करण्याची मागणी केली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि मुंबईच्या धर्तीवर हा निर्णय घ्यावा, अशी मागणी मनविसेचे जिल्हाध्यक्ष श्याम गोहाड यांनी केली आहे.
सामुदायिक विवाह सोहळा पुढे ढकलला फुले, शाहू, आंबेडकर, मा. कांशीरामजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचालित पंचशील अकॅडमीनेही १५ मार्चचा सामुदायिक विवाहसोहळा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -