घरताज्या घडामोडीVideo: 'शेतकऱ्याच्या जन्माला परत कधी येणार नाही', म्हणत पंढरपूरमध्ये तरुणाची आत्महत्या

Video: ‘शेतकऱ्याच्या जन्माला परत कधी येणार नाही’, म्हणत पंढरपूरमध्ये तरुणाची आत्महत्या

Subscribe

पंढरपूरमध्ये तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शेतकऱ्याच्या जन्माला परत कधी येणार नाही म्हणत व्हिडिओ चित्रित करून या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. या तरुणाचा व्हिडिओ माऊली भाऊ हळणवर या नावाच्या फेसबुक हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना म्हटले आहे की, ‘वीज तोडणीचा पंढरपूर तालुक्यात पहिला बळी. सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाला कंटाळून आणि वारंवार वीज तोडणी करून शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या महावितरणवर वैतागून परत शेतकरी जन्माला येणार नाही असे म्हणून मगरवाडी तालुका पंढरपूर येथील तरुण सूरज जाधव यांनी आत्महत्या केली.’

- Advertisement -

या घटनेबाबत शेतकरी नेते राजू शेट्टी एका मराठी वृत्तवाहिनी बोलताना म्हणाले की, ‘अतिशय विदारक आणि दुर्दैवी घटना आहे. हेच सर्व प्रश्न घेऊन गेले १२ दिवस मी कोल्हापुरात धरणा आंदोलन करत बसलो आहे. पण या राजकर्त्यांना जाग येत नाही. ही घटना अतिशय संताप आणणारी आहे. मी सर्व शेतकऱ्यांना हात जोडून कळकळीची विनंती करतो की, आत्महत्या करू नका. तुम्हाला अगदीच असहाय्य झालं तर संघटनेच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधा, अशी माझी विनंती आहे. असं स्वतः जीव संपवण्यापेक्षा अपरात्री शेतात येणारे साप पकडा आणि या हरामखोरांचा कार्यालयात सोडू द्या. यांना अद्दल घडवू या. परंतु स्वतः जीव धोक्यात घालू नका आणि देऊ नका, अशी माझी हात जोडून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आहे.’

‘लॉकडाऊनच्या काळात ऊर्जा मंत्र्यांनी गावोगावी जाऊन वीज बिल भरायची काही गरज नाही. आम्ही वीज बिल वसूल करणार नाही, असं सांगितलं होत. विजेचं रिडिंगसुद्धा घ्यायला या लोकांनी ज्यांना नेमलंय ते लोकं रिडिंग घ्यायला आले नाहीत आणि तीन-तीन वर्षांचं साचलेलं बिल आता एकदम अचानक मागायला लागले. यामधील ५० टक्क्यांपेक्षा अधिक बिल बोगस आहेत आणि वाढवून आलेली आहेत. मग दुरुस्त करायला गेलं, तर अधिकारी टाळाटाळ करतात. आधी सगळी रक्कम भरा आणि मग बिल दुरुस्त करतो, अशी भूमिका घेतली जातेय. आता एवढी मोठी रक्कम भरण्यासाठी शेतकऱ्याकडे पैसे आहेत का? आणि कशी भरायची?,’ असे राजू शेट्टी म्हणाले.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -