घरमुंबईआरटीईचे 123 बनावट अर्ज

आरटीईचे 123 बनावट अर्ज

Subscribe

मुंबई । दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणार्‍या 25 टक्के प्रवेशप्रक्रियेत नामांकित शाळेत प्रवेश मिळावा यासाठी पालकांनी अनोखी शक्कल लढवली आहे. हमखास प्रवेश मिळावा यासाठी पालकांच्या नावात इंग्रजी अक्षरात बदल करत अनेक अर्ज भरल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबई विभागातून असे तब्बल 123 अर्ज निदर्शनास आल्यानंतर ते रद्द करण्यात आले आहेत. आरटीई प्रवेशप्रक्रियेची मुदत 31 मार्चला संपली. यावेळी मुंबई विभागातून 11 हजार 723 अर्ज दाखल करण्यात आले.

अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर करण्यात आलेल्या पडताळणीत विद्यार्थ्यांच्या किंवा त्यांच्या पालकांच्या नावाच्या अक्षरांमध्ये बदल करणे, फोन क्रमांक बदलणे किंवा घरचा पत्त्यात फेरबदल करून अर्ज भरण्यात आल्याचे उघडकीस आले. 123 अर्ज दुबार भरल्याचे पडताळणीत दिसून आले. त्यामुळे दुबार भरलेल्या अर्जांबाबत विद्यार्थ्यांच्या पालकांना माहिती देऊन दुबार अर्ज बुधवारी बाद करण्यात आले आहेत. आता मुंबईतून 11 हजार 600 विद्यार्थ्यांचे अर्ज सोडतीसाठी पात्र ठरले आहेत, अशी माहिती पालिकेच्या अधिकार्‍यांकडून सांगण्यात आली.

- Advertisement -

आरटीईची सोडत अजूनपर्यंत विभागीय स्तरावर काढण्यात येत असे, परंतु यंदा ही सोडत प्रथमच राज्यस्तरावर काढण्यात येणार आहे. राज्यस्तरीय काढण्यात येणारी आरटीईची सोडत 8 एप्रिलला पुण्यातील आझम कॅम्पसमधील उर्दू मुलांच्या शाळेत सकाळी 11.30 वाजता काढण्यात येणार आहे. आरटीईअंतर्गत हमखास प्रवेश मिळावा यासाठी दुबार अर्ज पडताळणीमध्ये एका मुलीचे तब्बल 20 अर्ज भरण्यात आल्याचे उघडकीस आले. 20 अर्जांबाबत त्या मुलीच्या पालकांना माहिती देण्यात आली असता त्यांनी ते अर्ज भरण्याचे मान्य केल्यानंतर त्या मुलीचा एक अर्ज ठेऊन अन्य अर्ज बाद करण्यात आले, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -