घरमुंबईकेडीएमसीतून वगळलेल्या 18 गावांतील 13 नगरसेवकांचे नगरसेवकपद रद्द

केडीएमसीतून वगळलेल्या 18 गावांतील 13 नगरसेवकांचे नगरसेवकपद रद्द

Subscribe

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील 18 गावे वगळून नगरपरिषद बनविणे आणि उरलेल्या 9 गावांसहीत कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीबाबत राज्य शासनाने अधिसूचना काढल्याने निवडणूक आयोगाने पालिका निवडणूक कामकाजाला सुरुवात केली आहे. आता पालिका हद्दीत 118 वार्ड राहणार असून पालिका हद्दीतून वगळण्यात आल्याने तेथील 13 नगरसेवकांचे नगरसेवकपद पालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी रद्द केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.

राज्य सरकारने 24 जून रोजी एका अधिसूचनेद्वारे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतून घेसर, हेदूटणे, उंबोली, भाल, द्वारली, माणेरे, वसार, आशेळे, नांदिवली तर्फे अंबरनाथ, आडिवली-ढोकली, दावडी, चिंचपाड, पिसवली, गोळीवली, माणगाव, निळजे, सोनारपाडा व कोळे ही १८ गावे वगळून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये फेरफार केलेला आहे.

- Advertisement -

पूर्वी 27 गावांचा समावेश असल्याने 21 वार्ड होते असे एकूण पालिका हद्दीत 122 वार्ड होते. यात 27 पैकी 18 गावांची नगरपरिषद आणि 9 गावे पालिका हद्दीत ठेवण्याची अधिसूचना राज्य शासनाने काढल्याने निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार नव्याने 118 वार्डबाबत निवडणूक आयोगाने अंतिम निर्णय घेतला असून त्यानुसार प्रभाग रचनाबाबत कामाला सुरुवात झाली आहे. गावे वगळण्यापूर्वी 27 गावचे 21 वार्ड होते यातील 12 वार्ड ई-प्रभाग क्षेत्रात येत होते तर आय प्रभागात 9 वार्ड होते. आता 18 गावे वगळल्याने 9 वार्डांचा आय प्रभाग क्षेत्र पूर्णपणे पालिका हद्दीतून वगळण्यात आले असून 18 गावे वगळली आहेत. त्यामधील 13 नगरसेवकांचे नगरसेवक पद कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने रद्द केले आहे.

या नगरसेवकांचे पद रद्द
यात वार्ड क्रमांक 107 – नगरसेवक मोरेश्वर भोईर, वार्ड क्रमांक 86 -नगरसेविका सुनिता खंडागळे, वार्ड क्रमांक 109 – नगरसेवक रमाकांत पाटील, वार्ड क्रमांक – 110 – नगरसेविका प्रमिला पाटील, वार्ड 116 – नगरसेविका दमयंती वझे, वार्ड क्रमांक 117-नगरसेवक जालिंदर पाटील, वार्ड क्रमांक 118 नगरसेविका इंदिरा तरे, वार्ड क्रमांक 119 – नगरसेविका विमल भोईर, वार्ड क्रमांक 120 – नगरसेविका शैलजा भोईर, वार्ड 122 – नगरसेवक प्रभाकर जाधव, वार्ड 108 – नगरसेवक कुणाल पाटील, वार्ड क्रमांक 105 – नगरसेविका सोनी अहिरे आणि वार्ड क्रमांक 106 -उर्मिला गोसावी आदींचा समावेश आहे.

- Advertisement -

नगरसेवकांचा न्यायालयात जाण्याचा इशारा
याबाबत पालिका सचिव संजय जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दुजोरा देत सरकारच्या निर्णयानंतर पालिका हद्दीतील वगळलेल्या गावातील नगरसेवक यांचे नगरसेवकपद रद्द झाले आहे. याबाबत आयुक्त यांच्या सहीचे पत्र संबंधित नगरसेवकांना पाठविण्यात आल्याचे स्पष्ट केले. तर याबाबत माजी उपमहापौर आणि नगरसेवक मोरेश्वर भोईर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आम्ही लोकनियुक्त सदस्य आहोत. संविधानाने आम्हाला पाच वर्षांचा कार्यकाल दिला आहे. या पद्धतीने पत्र देऊन आमचा कार्यकाल खंडित करायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? आमच्या अधिकारांवर गदा आणण्याचा प्रयत्न आयुक्तांनी केला आहे. या विरोधात आम्ही कोर्टात धाव घेणार असल्याचे भोईर यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -