घरमुंबईमानखुर्दच्या बालगृहात कोरोनाचा कहर; १८ मुलांना संसर्ग

मानखुर्दच्या बालगृहात कोरोनाचा कहर; १८ मुलांना संसर्ग

Subscribe

देशात दीड वर्षांपासून कोरोनाचा कहर सुरू असून अद्याप तो संपलेला नाही. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावादरम्यान, मुंबईतील मानखुर्दमधील चेंबूर चिल्ड्रेन्स होम या बालगृहामध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चिल्ड्रेन्स होममध्ये कोरोनाने प्रवेश केला असून तेथील अठरा मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यानंतर कोरोना बाधित मुलांना वाशी नाका येथील विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले असून या लहान मुलांच्या आरोग्याची देखरेख केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भायखळा येथील अनाथाश्रम शाळेतील आग्रीपाडा येथील अनाथाश्रमातील १६ मुलांसहा २२ जणांना कोरोनाची बाधा झाल्याची घटना ताजी असताना आता चेंबूर येथील बालगृहातील १८ मुलांनाही कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सर्व मुलांना वाशी येथील कोविड केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे आता मुंबईतील धर्मशाळा, अनाथाश्रम, बालगृहे ही रडारवर आली आहेत. चेंबूर येथील बालगृहातील एका मुलाची तब्येत बिघडली असल्याचे लक्षात आल्यावर पालिका आरोग्य पथकाने शनिवारी तात्काळ याठिकाणी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले. त्यावेळी तपासणी व चाचणीअंतर्गत १८ मुलांना कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यामुळे पालिका प्रशासन ही हादरले आहे.

- Advertisement -

दरम्यान, पालिका आरोग्य यंत्रणेने या सर्व मुलांना तात्काळ उपचारासाठी वाशीनाका येथील कोरोना केंद्रात उपचारासाठी दाखल केले आहे. संपूर्ण मुंबईत गेल्या तीन दिवसात ३४ मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
यामध्ये, चेंबूर येथील बालगृहातील १८ मुले व त्याअगोदर आग्रीपाडा येथील सेंट जोसेफ अनाथाश्रमातील १६ मुलांचा समावेश आहे. तसेच पालिका आरोग्य यंत्रणेने चेंबूर बालगृहातील १०२ मुलांची तपासणी केली असता त्यामध्ये १८ जणांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली आहेत. सुदैवाने उर्वरित ८४ मुलांना कोरोनाची बाधा झालेली नाही. मात्र आता मुंबईतील बालगृहे, अनाथाश्रम ही पालिकेच्या रडारवर आली आहेत. आता या सर्व ठिकाणीही मुलांची आरोग्य तपासणी करणे आवश्यक झाले आहे.

कर्मचाऱ्यांची वाढली चिंता

चिल्ड्रेन्स एड सोसायटी अंतर्गत असलेल्या मानखुर्दमधील बालगृहामध्ये मुलांच्या आरोग्याची नियमित तपासणी करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना खबरदारी म्हणून शासनाच्या कोरोनाविषयक सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे. असे तरी देखील कोरोनाने प्रवेश केल्यानंतर त्याठिकाणी असणाऱ्या कर्मचाऱ्यांची चिंता वाढली आहे.

- Advertisement -

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -