घरमुंबईविद्यार्थ्यांचे नुकसान टाळणार्‍या ४५ शिक्षकांना कारवाईचे बक्षीस

विद्यार्थ्यांचे नुकसान टाळणार्‍या ४५ शिक्षकांना कारवाईचे बक्षीस

Subscribe

उल्हासनगर महापालिका शाळेतील ४५ शिक्षकांना बीएलओचे काम देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. काम करण्यास नकार दिल्यामुळे गुन्हे दाखल करण्याचा निर्णय.

आगामी निवडणुकी साठी उल्हासनगर विधानसभा क्षेत्रातील मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी बीएलओ म्हणून उल्हासनगर महापालिकेच्या ४५ शिक्षकांवर जबाबदारी देण्यात आली होती. मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष आणि रोजच्या विषय तासांची जबाबदारी त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षकांनी काम करण्यास नकार दिला. मात्र, या शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती तहसीलदार उत्तम कुंभारे यांनी दिली.

या प्रकारामुळे मनपाचे शिक्षक धास्तावले असून शिक्षक संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. आगामी संभाव्य लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन उल्हासनगरातील दोन्ही क्षेत्रातील मतदार याद्या अद्ययावत करण्याचे आदेश संबंधित तालुक्यांना दिले आहेत. त्यानुसार उल्हासनगर तालुक्याचे तहसीलदार उत्तम कुंभारे यांनी महापालिकेच्या ४५ शिक्षकांना बीएलओ कामाचे आदेश दिले. नवीन शैक्षणिक वर्ष आणि शिक्षकांची कमतरता यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार हे लक्षात घेऊन त्यांनी बीएलओचे काम करण्यास नकार दिला. त्यामुळे शिक्षकांनी मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम ठप्प झाले.

- Advertisement -

तहसीलदार कुंभारे यांनी याबाबतची माहिती प्रांत अधिकारी जगतसिंग गिरासे यांना दिली. त्यांनी निवडणुकीचे काम करण्यास नकार देणार्‍या शिक्षकांविरुध्द गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. तशा नोटीसा देखिल शिक्षकांना तहसील कार्यालयातून पाठविण्यात आल्या. या प्रकारामुळे शिक्षक धास्तावले आहेत.
या शिक्षकांनी शिक्षक सेनेचे शहराध्यक्ष विनोद सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला. संपूर्ण प्रकरण समजून घेतल्यानंतर शिक्षक संघटनांनी या प्रकरणी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

 

- Advertisement -

नव्या शैक्षणिक वर्षात शिक्षकांना अशैक्षणिक काम देण्यात येऊ नये असे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. या निर्णयाची प्रत आम्ही प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना दिली आहे.तरीही या शिक्षकांवर गुन्हा दाखल झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू
-विनोद सूर्यवंशी, शहराध्यक्ष, शिक्षक सेना

मतदार याद्या अद्ययावत करणे हे राष्ट्रीय काम आहे. महापालिका शाळेतील ४५ शिक्षकांना बीएलओचे काम देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसे आदेशही देण्यात आले होते. मात्र या शिक्षकांनी आदेश स्विकारले नाहीत. त्यानंतर नोटीसाही देण्यात आल्या त्याही स्विकारल्या नाहीत. शेवटी हा सर्व प्रकार प्रांताधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यांच्या आदेशानुसार शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. – उत्तम कुंभारे , तहसीलदार, उल्हासनगर तालुका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -