घरमुंबईआता मुंबईतही एअर प्युरीफायर टॉवर

आता मुंबईतही एअर प्युरीफायर टॉवर

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महापालिका आयुक्तांना सूचना

वाढते प्रदूषण, धूलिकण, बांधकामे, घटती वनसंपदा यामुळे मुंबई महानगरातील हवेचा दर्जा सातत्याने खालावत आहे. जानेवारी महिन्यात तापमानाचा पारा घसरताच प्रदूषणाची उचांकी नोंद करण्यात आली होती. इतकी की मुंबईने दिल्लीलाही पिछाडीवर टाकले होते. यामुळे मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. या समस्येची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी मुंबई महापालिका आयुक्त आणि प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांना मुंबईत एअर प्युरीफायर टॉवर बसवण्याच्या सूचना केल्या आहेत.

मुंबईतील प्रदूषण नियंत्रण आणि हवेची गुणवत्ता नियंत्रित राहण्यासाठी दिल्ली, गुडगाव, लखनऊप्रमाणे एअर प्युरीफायर टॉवर मुंबई महानगरात बसविण्यात यावेत. त्याचबरोबर शहरी वनीकरण वाढेल यासाठी उपाययोजना करण्याची सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी इकबाल सिंह चहल यांना केली आहे.

- Advertisement -

सोबतच मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणार्‍या नागरिकांची घरोघर जाऊन तपासणी करणे, महापालिकेच्या शाळेत कौशल्य विकास केंद्र सुरू करणे, महापालिका प्रशासनात पारदर्शकता आणि शहराचे सौंदर्यीकरण या विषयांचा अंतर्भाव मुंबई महापालिकेच्या आगामी अर्थसंकल्पात करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चहल यांना दिले आहेत. मुंबई महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प तयार करताना मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेतानाच त्यांना सुशासनाचा अनुभव यावा यासाठी विविध मुद्यांचा आणि उपाययोजनांचा समावेश करण्यात यावा, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.

मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासंदर्भात विशेष उपाययोजना मुख्यमंत्र्यांनी सुचविल्या आहेत. मुंबईतील सुमारे २७ टक्के नागरिक मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या विकारांनी ग्रस्त आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून त्यांची घरोघरी जाऊन तपासणी करून त्यांचा डाटा तयार करण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले आहेत. त्याचबरोबर मुंबईतील महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये बाह्यरुग्ण विभागात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. हा ताण कमी करण्यासाठी बाह्य यंत्रणांची मदत घेतानाच खिडक्यांची संख्या वाढवावी. तसेच एमआरआय, सीटी स्कॅन आणि निदान केंद्र वाढविण्याच्या तसेच डायलिसीस केंद्र उभारण्याच्या सूचनाही शिंदे यांनी दिल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या प्रत्येक शाळेत इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास केंद्र सुरू करावे. मुंबई पब्लिक स्कूलची मागणी पाहता त्यांची संख्या वाढवावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना दिले आहेत.

- Advertisement -

मुंबई महानगराची हवा महिनाभर प्रदूषित
ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे सुरेश चोपणे यांनी जानेवारीतील हवेच्या गुणवत्तेचा अहवाल सादर केला असून मुंबईसह नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण शहरातील हवेची गुणवत्ता खालावल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे. या प्रदूषणास धूलिकण, वाहनांची वाढती संख्या, बांधकामे, ज्वलनशील कचरा कारणीभूत असल्याचाही निष्कर्ष काढण्यात आला आहे. सोबतच शहरांची भौगोलिक परिस्थिती, वार्‍याची संथ गती आणि हिवाळ्यातील कमी तापमानही कारणीभूत असल्याचे नोंदवण्यात आले आहे.

मुंबईकरांना सुशासनाचा अनुभव यावा
मुंबई महापालिकेचा सन २०२३-२४ या वर्षाचा अर्थसंकल्प लवकरच सादर होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी महापालिका अर्थसंकल्पात कोणत्या मुद्यांना प्राधान्य द्यावे याबाबत महापालिकेला सूचना केल्या आहेत. इमारत परवाना, मालमत्ता कर, दुकान नोंदणी परवान्याचे नूतनीकरण संबंधित परवानग्या आणि परवाने ऑनलाईन दिले जात आहेत. याशिवाय नागरिकांना सर्व सुविधा सुलभ आणि सहज मिळतील अशा पद्धतीने प्रशासनाकडून सुशासन असावे यावर भर देण्याची सूचना शिंदे यांनी केली आहे. मुंबई महानगराच्या सुशोभीकरणासोबतच दळणवळण, पायाभूत सुविधा, गर्दी आणि वाहतुकीचे नियंत्रण याबाबत सामान्य मुंबईकरांना दिलासा देतानात महिला बचत गटांना सक्षम करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून अर्थसंकल्पात तरतूद करावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सुचविले आहे.

मुंबई महानगराची हवा महिनाभर प्रदूषित
ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे सुरेश चोपणे यांनी जानेवारीतील हवेच्या गुणवत्तेचा अहवाल सादर केला असून मुंबईसह नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण शहरातील हवेची गुणवत्ता खालावल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे. या प्रदूषणास धूलिकण, वाहनांची वाढती संख्या, बांधकामे, ज्वलनशील कचरा कारणीभूत असल्याचाही निष्कर्ष काढण्यात आला आहे. सोबतच शहरांची भौगोलिक परिस्थिती, वार्‍याची संथ गती आणि हिवाळ्यातील कमी तापमानही कारणीभूत असल्याचे नोंदवण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -