घरसंपादकीयअग्रलेखआघाडीला धक्का, भाजपलाही बुक्का !

आघाडीला धक्का, भाजपलाही बुक्का !

Subscribe

विधान परिषदेच्या ५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत मतदारांनी सर्वच राजकीय पक्षांना ठिकाणावर आणले असून मतदारांना गृहीत धरू नका, असा संदेश पुन्हा एकदा मतपेटीच्या माध्यमातून देण्यात आला आहे. ५ ही जागांवर आपलाच विजय होईल अशा फुशारक्या मारणार्‍या पदाधिकार्‍यांना मतदारांनी जागा दाखवून दिली. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये नागो गाणार यांचा झालेला पराभव, विद्यमान आमदारांना धूळ चारत कोकण शिक्षक मतदारसंघात ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मारलेली मुसंडी आणि कागदावर बलाढ्य दिसणार्‍या महाविकास आघाडीला कचर्‍यासारखे उडवत अपक्ष सत्यजित तांबे यांनी मिळवलेला विजय या बाबी निवडणुकीत लक्षवेधी ठरल्या. निवडणुकीत धक्कादायक निकाल ठरला तो नागपूरचा.

नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचा बालेकिल्ला आणि एकूणच भाजपची मातृसंस्था म्हणून ओळख असलेल्या नागपूरमध्ये इतर पक्षांना फारशी किंमत नाही, हा गैरसमज या निवडणुकीने खोडून काढला. नागो गाणार हे गेली दोन टर्म नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून आमदार होते. ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे खास विश्वासू मानले जातात. एक प्रामाणिक लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख असली तरी त्यांच्यात शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक आक्रमकता नाही, असा ठपका त्यांच्यावर ठेवला जातो. याचा फटका नागो गाणार यांना बसला. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची गेल्या अनेक वर्षांची तयारी, जुनी पेन्शनचा भावनिक विषय आणि महाविकास आघाडीचा पाठिंबा याशिवाय गाणारांबद्दलची अँटी इन्कमबन्सी हे सुधाकर आडबाले यांच्या विजयात महत्वाचे मुद्दे ठरले. आडबाले यांच्या विजयामुळे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचा तब्बल १२ वर्षांचा वनवास संपला आहे.

- Advertisement -

ही निवडणूक ५ मतदारसंघांची असली तरी राज्यातील सर्वांचेच लक्ष लागून होते ते नाशिक पदवीधर मतदारसंघाकडे. कारण निवडणुकीच्या अवघ्या काही दिवस आधी तत्कालीन आमदार डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसची उमेदवारी मिळूनही त्यांनी अर्ज दाखल केला नाही आणि त्यांचे पूत्र सत्यजित यांना अपक्ष म्हणून पुढची चाल दिली. तांबे यांची ही चाल उधळून लावण्यासाठी भाजपने उमेदवारी नाकारलेल्या शुभांगी जाधव यांना महाविकास आघाडीने पाठिंबा दर्शवला आणि निवडणुकीतील चुरस वाढवली. खरे तर, शुभांगी पाटील विजयी होणे शक्य होते. उत्तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे २४ आमदार आहेत. महापालिका आणि जिल्हा परिषदेतील लोकप्रतिनिधींचे प्रमाणही मोठे आहे. उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश मोठ्या शिक्षण संस्थांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांचा प्रभाव आहे.

तरीही शुभांगी पाटील यांचा पराभव होणे ही बाब महाविकास आघाडीच्या प्रचार पद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करते. महाविकास आघाडीतील सर्वच नेत्यांनी एकदिलाने शुभांगी पाटील यांचा प्रचार केला असता, तर विजय अशक्य नव्हता, परंतु एकदिलाने काम करतील ते महाविकास आघाडीतील नेते कसले? ही नेतेमंडळी बैठकांसाठी एकत्र आली खरी; परंतु प्रत्यक्ष प्रचारात मात्र कुठे दिसली नाहीत. त्यामुळे शुभांगी पाटील विजयाजवळ जाऊ शकल्या नाहीत. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी निवडणुकीला रंग देण्याचा प्रयत्न केला खरा; परंतु त्यांच्या प्रयत्नांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीची अजिबातच साथ मिळाली नाही. किंबहुना अहमदनगर जिल्ह्यात तर बरेच काँग्रेसचे कार्यकर्ते सत्यजित तांबे यांच्या प्रचारात व्यस्त होते. या सर्व घडामोडींचा परिणाम म्हणजे अपक्ष तांबे यांनी महाविकास आघाडीचे मनसुबे उधळले. आता तांबे भाजपात जातात की पुन्हा स्वगृही परततात हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.

- Advertisement -

गोव्याच्या सीमेपासून (सिंधुदूर्ग) थेट गुजरातच्या सीमेपर्यंत (पालघर) विस्तारलेल्या कोकण शिक्षक विधान परिषद मतदारसंघातील निवडणुकीत राज्याच्या राजकारणात एकेकाळी महत्त्वाची भूमिका बजावलेल्या शेकापला मोठा धक्का बसलाय. या मतदारसंघातून भाजपप्रणित शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल बोरनारे यांच्या नावाबाबत चर्चा होती, मात्र ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी गेल्या ६ वर्षांत मतदारसंघात सूक्ष्म नियोजन केले होते. यामुळे त्यांना उमेदवारी दिल्यास विजय सोपा होईल, हे भाजपने हेरले. त्यानुसार म्हात्रेंना उमेदवारी दिली. आतापर्यंत ही निवडणूक भाजप ऐवजी शिक्षक परिषदच लढत होती. २०१७ मध्ये शिक्षक सेनेच्या माध्यमातून लढताना म्हात्रे यांना बाळाराम पाटील यांनी ५ हजार मतांनी पराभूत केले होते. त्याचा बदला म्हात्रेंनी यंदाच्या निवडणुकीत घेतलेला दिसतो. मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचीही निवडणूक चुरशीचीच झाली.

३ पंचवार्षिकपासून आमदार असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे यांच्या गळ्यात यंदा पुन्हा विजयाची माळ पडली. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसमधून नाराज झालेले प्रदीप साळुंखे यांनीही विक्रम काळेंना आव्हान दिले होते. त्यामुळे काळे यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नाही हे स्पष्ट झाले होते. अपक्ष उमेदवार सूर्यकांत विश्वासराव यांनी आश्चर्यकारकरित्या आघाडी घेत भाजपच्या उमेदवाराला तिसर्‍या स्थानावर फेकले. भाजपने किरण पाटील या नवख्या उमेदवारावर प्रतिष्ठा पणाला लावली होती. पाटील यांच्याकडे धनाढ्य उमेदवार म्हणून पाहिले जात असल्याने ते ऐनवेळी चमत्कार घडवतील असे चित्र रंगवले जात होते, परंतु प्रत्येक वेळी ‘साम, दाम, दंड आणि भेद’ ही नीती चालत नाही हे मराठवाड्याच्या मतदारांनी भाजपला दाखवून दिले आहे. अमरावती पदवीधर निवडणुकीत काटे की टक्कर बघायला मिळाली. महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे यांनी भाजपच्या पदाधिकार्‍यांना घाम फोडला. देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले रणजीत पाटील यांना या निवडणुकीत फारसा करिष्मा दाखवता आला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -