घरमुंबईविरार येथे कार्यालयात घुसून वीज कर्मचार्‍याला मारहाण

विरार येथे कार्यालयात घुसून वीज कर्मचार्‍याला मारहाण

Subscribe

दोन थकबाकीदार महिलांविरुद्ध गुन्हा दाखल 

वीजबिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित केला जाईल, अशी पूर्वसूचना दिल्याच्या रागातून दोन महिलांनी सहायक लेखापाल यांना मारहाण केल्याची घटना म्हाडा कॉलनीतील विरार उपविभागीय कार्यालयात घडली. थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केल्याच्या तसेच वीजचोरी पकडल्याच्या रागातून वीज कर्मचार्‍यांना मारहाण करण्याची गेल्या आठवडाभरातील ही तिसरी घटना आहे. हल्लेखोर महिलांविरुद्ध अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या अजामीनपात्र कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्मचारी अथवा सेवेबाबत तक्रार असल्यास ती कायदेशीरपणे करावी, कायदा हातात घेण्याचा प्रयत्न झाल्यास गय केली जाणार नसल्याचा इशारा मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी हल्लेखोरांना दिला आहे. विरार उपविभागीय कार्यालयात कार्यरत सहायक लेखापाल रामू जानू महाला हे गुरुवारी दुपारी कार्यलयात काम करीत असताना तिरुपती ग्रँड हाऊसिंग सोसायटीतील (तिरुपती नगर, विरार पश्चिम, ता. वसई) 25 ते 30 महिला आल्या. त्यातील दोन महिलांनी महाला यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत गचांडी पकडून चपलांनी मारहाण केली. तत्पूर्वी बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याची पूर्वसूचना कंत्राटी कर्मचार्‍याकडून सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाला देण्यात आली होती. त्या रागातूनच संबंधित महिलांनी महाला यांच्यावर हल्ला केला. कल्याण परिमंडलात गेल्या आठ दिवसात उल्हासनगर, पिंपळास (भिवंडी) व त्यानंतर विरार येथे वीज कर्मचार्‍याला मारहाण करण्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

मार्च एन्डच्या पार्शवभूमीवर थकीत वीजबिलाची शंभर टक्के वसुली हे वीज कर्मचार्‍याचे आद्य कर्तव्य ठरते. एप्रिल 2019 पासून फेब्रुवारी 2020 अखेरपर्यंत कल्याण परिमंडलात वितरित केलेल्या विजेचे 7 हजार 886 कोटी रुपये वसूल होणे आवश्यक होते. मात्र यातील तडजोडीची रक्कम वगळता व कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांची थकबाकी गृहीत धरता 192 कोटी रुपयांची वसुली बाकी आहे. तर याच कालावधीत 7 हजार 599 वीजचोरांवर कारवाई करून 19 कोटी 50 लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली आहे. कर्तव्य बजावणार्‍या वीज कर्मचार्‍यांवर हल्ले करणार्‍यांची गय केली जाणार नाही. अशा आरोपींविरुद्ध कठोर कारवाईसाठी महावितरण गंभीर असून कडक शिक्षेसाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -