घरमुंबईशेतकर्‍यांच्या मागण्यांसाठी भाकपचा मोर्चा

शेतकर्‍यांच्या मागण्यांसाठी भाकपचा मोर्चा

Subscribe

येत्या सोमवारी मुंबई लालवादळ

मुंबई: शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नाशिक ते मुंबई अशी पदयात्रा करून सगळ्यांचे लक्ष वेधणारे शेतकरी येत्या सोमवारी मुंबईत लाल वादळ निर्माण करणार आहेत. सोमवारी भायखळा येथील राणीबागेच्या मैदानातून हा मोर्चा सुरू होणार असून हे शेतकरी ‘सरकार हटाव’चा नारा देणार आहेत. शेतकर्‍यांची फसवणूक, भूमीहीन आणि शेतमजुरांची परवड, बेरोजगार तरुणांची क्रूर थट्टा, चोक्सी-मल्ल्या-मोदी मालामाल, ‘अच्छे दिन’चा बोजवारा आणि लोकांना देण्यात आलेले पंधरा लाखांचे गाजर, असे प्रश्न घेऊन शेतकरी मुंबईत येणार आहेत. मोठ्या संख्येने ते आझाद मैदानाकडे कूच करतील, अशी माहिती भाकपचे राज्य सरचिटणीस कॉ. राजू देसले यांनी दिली.

शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमुक्तीसह स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी या प्रमुख मागण्या घेऊन हे शेतकरी मुंबईत येणार आहेत. याआधी हे शेतकरी नाशिकहून चालत मुंबईत आले होते. तेव्हा त्याची सर्वांनीच दखल घेतली होती. कम्युनिस्टांचे पारंपरिक विरोधक असलेल्या शिवसेनेनेही शेतकर्‍यांच्या मोर्चात सहभाग घेत सरकारला जाब विचारला होता.

- Advertisement -

सरकारविरोधी हल्लाबोल करणार्‍या शेतकर्‍यांच्या या मोर्चाची देश-विदेशातील माध्यमांनी चांगलीच दखल घेतल्याने सरकारनेही अधिक आडेवेडे न घेता मोर्चेकर्‍यांना दिलासा देणारी आश्वासने दिली होती. मात्र या आश्वासनांची जराही पूर्तता झाली नाही. यामुळे सरकारला जागे करण्यासाठी शेतकरी पुन्हा मुंबईत येणार आहेत. शेतकर्‍यांसह असंघटित कामगारही या मोर्चात सहभागी होणार आहेत. शेतकर्‍यांच्या कर्जमाफीबरोबरच कृषीपंपांची वीजबील माफीची मागणीही करण्यात येणार आहे. शेतमालाला खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा, या मागणीचाही समावेश आहे.

 कर्जबाजारीपणाला कंटाळून कुटुंबासह आत्महत्या करण्याची वेळ शेतकर्‍यांवर आलेली आहे. अशा परिस्थितीत चांदवड, निफाड, येवला तालुक्यातील शेतकर्‍यांची काही कोटींच्या किमतीची द्राक्षे व्यापार्‍यांनी लाटली. या व्यापार्‍यांविरोधात निफाड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तत्काळ तपास करण्याची मागणीही या मोर्चावेळी केली जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -