घरमुंबई‘प्रॉपर्टी कार्ड’वर बृहन्मुंबई महापालिकेचे नाव लागले!

‘प्रॉपर्टी कार्ड’वर बृहन्मुंबई महापालिकेचे नाव लागले!

Subscribe

अतिरिक्त महापालिका आयुक्त आय. ए. कुंदन यांच्या मार्गदर्शनात मालमत्ता खात्याद्वारे सुरु करण्यात आलेल्या कार्यवाहीअंती गेल्या काही दिवसात ५९० मालमत्तांच्या 'प्रॉपर्टी कार्ड'वर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे नाव लावण्यात आले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता खात्याच्या अखत्यारितील ४ हजार ७८८ भूखंडांपैकी २ हजार ३७७ मालमत्तांबाबत महापालिकेकडे कायदेशीर दस्तावेज असले, तरी ‘मालमत्ता पत्रकांवर (Property Card) पालिकेचे नाव नव्हते. यामुळे भविष्यात तांत्रिक अडचण उद्भवू नये, यासाठी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश महापालिकेच्या मालमत्ता खात्याला दिले होते. त्यानुसार अतिरिक्त महापालिका आयुक्त आय. ए. कुंदन यांच्या मार्गदर्शनात मालमत्ता खात्याद्वारे सुरु करण्यात आलेल्या कार्यवाहीअंती गेल्या काही दिवसात ५९० मालमत्तांच्या ‘प्रॉपर्टी कार्ड’वर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे नाव लावण्यात आले आहे. तर उर्वरित १ हजार ७८७ मालमत्तांच्या ‘प्रॉपटीं कार्ड’बाबत ‘भूमापन आणि भूमी अभिलेख’ खात्यांच्या सहकार्याने आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे, अशी माहिती महापालिकेच्या मालमत्ता खात्याचे सहाय्यक आयुक्त पराग मसूरकर यांनी दिली आहे.

काही भूखंडांवर ‘बॉम्बे इंप्रुव्हमेंट ट्रस्ट’चेच नाव

१८९८ मध्ये ‘बॉम्बे इंप्रुव्हमेंट ट्रस्ट’ (BIT) स्थापन झाल्यानंतर तत्कालिन नियमांनुसार अनेक भूखंड हे सदर ट्रस्ट कडे हस्तांतरीत झाले होते. सदर भूखंड प्रामुख्याने भाडे तत्वावरील निवासी बांधकामासाठी उपयोगात आणले गेले. या काळात सदर मालमत्तांच्या ‘प्रॉपर्टी कार्ड’वर ‘बॉम्बे इंप्रुव्हमेंट ट्रस्ट’चे नाव लावण्यात आले. तथापि, १९२५ मध्ये ‘बॉम्बे इंप्रुव्हमेंट ट्रस्ट’ महापालिकेत विलीन झाल्यानंतरही यापैकी काही भूखंडांच्या ‘प्रॉपर्टी कार्ड’वर ‘बॉम्बे इंप्रुव्हमेंट ट्रस्ट’चेच नाव होते. याव्यतिरिक्त विकास नियोजन आरक्षणांतर्गत महापालिकेने खरेदी केलेले भूखंड (Acquired DP Plot) असोत किंवा मालमत्ताकर न भरल्याने महापालिकेच्या ताब्यात आलेल्या मालमत्ता किंवा भूखंड असोत; हे जरी महापालिकेच्या मालकीचे झाले होते, तरी यापैकी काही भूखंडांच्या किंवा मालमत्तांच्या ‘प्रॉपर्टी कार्ड’वर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे नाव लावण्याची कार्यवाही प्रलंबित होती.

- Advertisement -

तांत्रिक अडचण उद्भवण्याची शक्यता

वरीलनुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता खात्याच्या ताब्यात असलेल्या ४ हजार ७८८ भूखंडांपैकी २ हजार ४११ भूखंडांच्या ‘प्रॉपर्टी कार्ड’वर महापालिकेचे नाव अंतर्भूत आहे. मात्र, उर्वरित २ हजार ३७७ भूखंडाच्या ‘प्रॉपर्टी कार्ड’वर पालिकेचे नाव लावण्याची कार्यवाही प्रलंबित होती. यामुळे भविष्यात तांत्रिक अडचण उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेच्या सर्व मालमत्तांच्या ‘प्रॉपर्टी कार्ड’वर महापालिकेचेच नाव असावे, यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी वर्ष २०१७ मध्ये दिले होते. यानुसार पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या मालमत्ता खात्याच्या अखत्यारित असणा-या भूखंडांच्या ‘प्रॉपर्टी कार्ड’वर महापालिकेचे नाव चढविण्याची कार्यवाही यापूर्वीच सुरु करण्यात आली आहे.

भूभागावर पुनर्वसन प्रकल्प मंजूर

या कार्यवाहीनुसार २ हजार ३७७ भूखंडांपैकी ५९० भूखंडांच्या ‘प्रॉपर्टी कार्ड’वर महापालिकेचे नाव लावण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे. तर उर्वरित १ हजार ७८७ भूखंडांच्या ‘प्रॉपर्टी कार्ड’वर पालिकेचे नाव लावण्याची कार्यवाही मुंबई शहर तसेच मुंबई उपनगर जिल्ह्यांच्या ‘भूमापन आणि भूमी अभिलेख’ खात्यांच्या सहकार्याने प्रगतीपथावर आहे. तसेच बृहन्मुंबई महापालिकेने ६० वर्ष, ९९ वर्ष, ९९९ वर्ष किंवा शाश्वत पद्धतीने मक्त्याने दिलेल्या भूभागावर पुनर्वसन प्रकल्प मंजूर करतेवेळी, ‘प्रॉपर्टी कार्ड’वर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे नाव मक्तेदार म्हणून अंतर्भूत करणे बंधनकारक करण्यात आले आहे, अशीही माहिती मसूरकर यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -