घरमुंबईमिठी नदीच्या सफाईत तिजोरीची होणार सफाई

मिठी नदीच्या सफाईत तिजोरीची होणार सफाई

Subscribe

महागड्या कंत्राटदारांना कामे,महापालिकेचा पाय खोलात

मिठी नदीच्या सफाईची जबाबदारी तीन ते चार वर्षांपूर्वी महापालिकेने खांद्यावर घेतल्यानंतर, यंदाही सफाईचे काम एप्रिलपासून सुरु करण्याचा प्रयत्न सुरु आहे. यासाठीची निविदा प्रक्रिया सुरु असून यामध्ये कमी बोली लावणार्‍या चार कंपन्या बाद झाल्या आहेत. त्यामुळे अधिक बोली लावणार्‍या कंपन्यांना कामे बहाल करण्याच्या विचारात प्रशासन आहे. प्रत्यक्षात ही निविदा प्रक्रिया रद्द करून फेरनिविदा मागवणे आवश्यक असतानाही प्रशासनाने अधिक बोली लावणार्‍यांनाच कामे देण्याचा घाट घातल्यामुळे महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची भीती वर्तवली जात आहे.त्यामुळे मिठी नदीच्या सफाईत महापालिकेच्या तिजोरीची सफाई होण्याची शक्यता आहे.

शहर भागातील वांद्रे-कुर्ला संकुल ते माहिम या परिसरातील मिठी नदीच्या सफाईच्या कामांसाठी निविदा प्रक्रिया सुरु आहे. या सफाईसाठी दहा कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. मिठी नदीच्या सफाईसाठी मागवण्यात आलेल्या या निविदेत सहा कंत्राट कंपन्यांनी भाग घेतला होता. परंतु या पैकी चार कंत्राटदारांनी अंदाजित रकमेपेक्षा कमी बोली लावली होती, तर दोन कंत्राट कंपन्यांनी अंदाजित रकमेपेक्ष अधिक बोली लावली होती. परंतु यासर्वांना कागदपत्रे सादर करण्यास सांगितले. पण कमी बोली लावणार्‍या कंपन्यांनी कागदपत्रे सादर केलेली नाही. त्यामुळे कागदपत्रे सादर करू शकल्याने चारही कंपन्यांना बाद ठरवण्यात आले. त्यामुळे १५ व १८ टक्के अधिक बोली लावणार्‍या दोन कंपन्या उरल्या. त्यातील एका कंपनीला पात्र ठरवून त्यांना कामे देण्याचा घाट महापालिका पर्जन्य जलअभियंता विभागाने केली आहे.

- Advertisement -

मागील वर्षी शहर भागातील मिठी नदीच्या सफाईसाठी मागवलेल्या निविदांमध्ये अंदाजित रकमेपेक्षा १८ टक्के कमी दराने कंत्राट कामे देण्यात आली होती. परंतु यावेळी चार कंपन्या अपात्र ठरल्यानंतर उर्वरीत दोन कंपन्यांपैकी एका कंपनीला काम देवून महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान करण्याचा प्रयत्न सुुर आहे. ज्या चार कंपन्या बाद ठरल्या आहेत, त्यांनी साखळी बनवून स्वत:ला बाद करून घेत दोनपैकी एका कंपनीला मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ही निविदा प्रक्रिया रद्द करून फेरनिवदा मागवण्याची गरज आहे. परंतु तसे न करता कंपनीला कामे देण्याचा घाट घातला आहे. पर्जन्य जलअभियंता विभागाचे प्रमुख अधिकारी श्रीकांत कावले यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याबाबतची निविदा प्रक्रिया सुरु असल्याचे सांगितले. निविदाची अंतिम प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. अंतिम पाकीट उघडलेले नाही. त्यामुळे फेरनिविदा मागवायचे की अंतिम पाकीट उघडून पात्र कंपनीची निवड करायची याचा निर्णय घेण्यात आला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -