घरमुंबईदत्तक मुलीकडून हत्या

दत्तक मुलीकडून हत्या

Subscribe

मृतदेहाचे गुढ उकलले , मुलीसह प्रियकराला अटक

पाच दिवसांपूर्वी माहीम येथील समुद्रकिनार्‍यावर सुटकेसमध्ये सापडलेल्या अज्ञात व्यक्तीच्या अवयवांचे गुढ उकलण्यात अखेर गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांना यश आले आहे. मृत व्यक्तीचे नाव बेनेट रिबेलो (59) असून त्यांच्या हत्येप्रकरणी त्यांचीच मानलेली 19 वर्षांची मुलगी आराध्या जितेंद्र पाटील ऊर्फ रिया बेनेट रिबेलो व तिचा सोळा वर्षांचा अल्पवयीन प्रियकर या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रियकराला डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे तर रिया सध्या पोलीस कोठडीत आहे.

बेनेट हे रियावर लैंगिक अत्याचार करीत होते, तसेच तिच्या प्रेमसंंबधाला त्यांचा विरोध होता, त्यामुळे तिने प्रियकराच्या मदतीने त्यांची हत्या करुन हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली रियाने पोलिसांना दिली. मात्र ती सांगत असलेली माहिती विसंगत असून तिला बेनेट यांची प्रॉपर्टी हडप करायची होती असा पोलिसांचा संशय आहे. त्या दृष्टीने तपास सुरु असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश साईल यांनी सांगितले. 2 डिसेंबरला माहीम येथील मगदूम शहा बाबा दर्ग्याच्या मागील समुद्रकिनार्‍यावर एका सुटकेसमध्ये मानवी अवयव सापडले होते. या व्यक्तीची हत्या करुन त्याच्या शरीराचे तुकडे करुन सुटकेसमधून भरुन ते समुद्रात फेकण्यात आले होते.

- Advertisement -

पोलिसांनी हत्येसह हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्याचा माहीम पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारीही संमातर तपास करीत होते. हा तपास सुरु असतानाच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश साईल यांनी त्यांच्या पथकातील मृतदेहाची जास्तीत जास्त माहिती काढण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर या पथकाने सुटकेसमध्ये मिळालेल्या कपड्यात एका शर्टच्या कॉलरवर अल्मो मेन्स वेअर या नावाचा टेलर मार्क सापडला. या दुकानात जाऊन पोलिसांनी दुकानाचा मालक अफरोज अन्सार यांच्याकडून दीड वर्षांतील शंभरहून अधिक बिले तपासली. त्यातील एका बिलामध्ये सुटकेसमध्ये सापडलेल्या शर्टशी जुळणारा कपडा सापडला. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश साईल, योगेश चव्हाण, गणेश जाधव, सुरेखा जौजाळ, महेंद्र पाटील, महेश बंडगर, संजय कदम, रवींद्र राणे, अरविंद मालुसरे, विलास देसाई, मेहबूब शेख, धनंजय पैगनकर, विलास वाबळे, नितेश विचारे, विकास घागरे, नितीन जाधव, हरिश कांबळे, प्रदीप शिरसाट, संतोष साळुंखे, रोहिदास वंजारे, सरफरोज मुलानी, बाबासाहेब जावळे, भावना पाटील यांच्या पथकाने शर्टासहीत सोशल मीडियाच्या मदतीने मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला होता.

याच दरम्यान पोलिसांना फेसबुकवर बेनेट रिबेलो यांचा प्रोफाईल दिसून आला. त्यांच्या प्रोफाईलची पाहणी केल्यानंतर त्यातील एक शर्ट घातलेला फोटो दिसून आला. त्यानंतर त्यांच्या घराची माहिती काढण्याचा प्रयत्न केला असता बेनेट हे सांताक्रुज येथील वाकोला मशिदीजवळील द्वारका कुंजमध्ये राहत असल्याचे दिसून आले. तिथे जाऊन पोलिसांनी चौकशी केली असता बेनेट यांना आठ ते दहा दिवसांपासून पाहिले नसल्याचे शेजार्‍यांनी सांगितले. त्यांच्यासोबत त्यांची मानलेली मुलगी आराध्या ऊर्फ रिया व तिचा अल्पवयीन प्रियकर राहत असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर या दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत रियाने बेनेट हे तिचे मानलेले पिता असून त्यांनी तिला रस्त्यावरुन घरी आणले होते, ते तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत असत. त्यांना तिच्या अल्पवयीन प्रियकरासोबत प्रेमसंबंध मान्य नव्हते.

- Advertisement -

त्यामुळे तिने प्रियकराच्या मदतीने त्यांची बांबू आणि चाकूने वार करुन हत्या केली. नंतर त्यांनी मार्केटमधून चार धारदार सुरे आणले होते. ते सुरे गरम करुन त्यांच्या शरीराचे तुकडे करुन ते काही सुटकेसमध्ये भरले. त्यानंतर ते सुटकेस माहीम समुद्रकिनार्‍यासह मिठी नदी व इतर ठिकाणी फेकून हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. या कबुलीनंतर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. रियाने तपासात दिलेली माहिती विसंगत असून तिला बेनेट यांची प्रॉपटी हडप करायची होती. की प्रॉपटी हडप करुन तिला प्रियकरासोबत राहायचे होते, त्यासाठी बेनेट यांची हत्या करणे गरजेचे होते. त्यामुळे ते कॅनडा येथे गेल्याचे सांगून तिने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिचा हा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला आणि पाच दिवसांत माहीम येथील सुटकेसमधील मर्डर मिस्ट्रीचा पर्दाफाश केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -