घरमुंबईमंत्रालयावर आता 'ड्रोनची' नजर!

मंत्रालयावर आता ‘ड्रोनची’ नजर!

Subscribe

सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आता मंत्रालयावर ड्रोनमधून नजर ठेवली जाणार आहे. त्यामुळे आता मंत्रालय अधिक सुरक्षित होणार आहे.

ज्या ठिकाणाहून संपूर्ण राज्याचा गाडा हाकला जातो असे ठिकाण म्हणजे मंत्रालय. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न करण्याचे प्रकार वाढत आहेत. तसंच मंत्रालयाबाहेर सतत आंदोलने देखील होऊ लागली आहेत. या आणि अशा घटनांमुळे मंत्रालयाचा गृह विभाग अधिक सतर्क झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आता मंत्रालयामध्ये आणि मंत्रालय परिसरात घडणाऱ्या  घडामोडींवर ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येणार आहे. यापुढे ड्रोनच्या माध्यमातून मंत्रालयावर गृहविभागाची नजर असणार आहे. आज मंत्रालय परिसरात या ड्रोनची प्राथमिक चाचणी करण्यात आली. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दोन मुख्य दिवशी ड्रोनची मंत्रालयावर विशेष नजर असेल. मात्र, त्याशिवाय जेव्हा जेव्हा राज्यात वातावरण असंवेदनशील होईल, तेव्हा ड्रोनद्वारे मंत्रालयाच्या सुरक्षेवर नजर ठेवण्यात येईल. याबाबतची सविस्तर माहिती  गृहविभागाकडून आपलं महानगरला देण्यात आली. क्यूडीच (quidich) या खासगी कंपनीकडून हा ड्रोन बनवून घेण्यात आला असून, तो ५०० मीटर पर्यंतच्या अंतरावरचं चित्र स्पष्टपणे दाखवू शकणार आहे.

मंत्रालयावर नजर ठेवणारा ड्रोन कॅमेरा

मंत्रालयात अतिरिक्त १०० सीसीटीव्ही

सध्या मंत्रालयाच्या सुरक्षेसाठी ३३१ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असून, अजून १०० कॅमेरे मंत्रालयाच्या आवारात लावण्यात येणार आहेत. मंत्रालयाच्या चारही बाजूने बांधण्यात येणाऱ्या संरक्षक भिंतीला हे अतिरिक्त १०० कॅमेरे लावण्यात येणार असून, यावर अत्याधुनिक कंट्रोल रूममधून नजर ठेवली जाईल. एका मोठ्या स्क्रीनद्वारे या सर्व सीसीटीव्हींवर ६ पोलीस कर्मचारी नजर ठेवणार असल्याची माहिती गृह विभागाने दिली आहे. याशिवाय मंत्रालयाच्या गेट बाहेर बुम बॅरिअर देखील लावण्यात येणार आहेत.सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ही सर्व प्रक्रिया सुरू झाल्यानंतर बारकोड बॅरिअर लावण्याचा देखील गृहविभाग विचार करत असल्याचे, गृह विभागाकडून सांगण्यात येत आहे.

- Advertisement -
ड्रोनची मंत्रालय परिसरात चाचणी करताना

तीन विभागांचं एकत्रित काम

मंत्रालयाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभाग, गृह विभाग आणि मुंबई पोलीस आयुक्त या सर्व प्रक्रियेवर काम करत आहेत. याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालयातील संरक्षक भिंत बांधण्याचे कामही लवकरच सुरु होणार असून, या भिंतीला सीसीटीव्ही बसवण्याचे काम गृह विभागाकडून आणि त्यावर नजर ठेवण्याचे काम मुंबई पोलीसांकडून केले जाईल. यासाठी सुमारे 8 ते 9 कोटींचा खर्च येणार असल्याची माहिती गृह विभागाने दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -