घरमुंबईसीईटी सेलकडून विद्यार्थ्यांसाठी ई डायरी

सीईटी सेलकडून विद्यार्थ्यांसाठी ई डायरी

Subscribe

एमएचटी सीईटीमार्फत राबवण्यात येणार्‍या प्रवेश परीक्षेतील कारभार अधिक पारदर्शक व्हावा, विद्यार्थ्यांना परीक्षा, परीक्षेचे वेळापत्रक, निकाल, कॅप राऊंड याची माहिती सहज उपलब्ध व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून ‘ई डायरी’ सुरू करण्यात येणार आहे. ई डायरीचे उद्घाटन 1 फेब्रुवारीला होण्याची शक्यता आहे.

सीईटी परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना दरवर्षी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. परीक्षा कधी असणार, निकाल कधी लागणार, कॅप राऊंड कधी सुरू होणार, गेल्यावर्षीची कट ऑफ डेट काय होती अशा अनेक बाबी विद्यार्थ्यांना माहीत नसतात. त्यामुळे त्यांचा परीक्षेच्या तयारीबाबत प्रंचड गोंधळ होतो. त्यामुळे सीईटी परीक्षेचा कारभार अधिक पारदर्शक व्हावा व विद्यार्थ्यांचा त्रास कमी व्हावा या उद्देशाने सीईटी सेलकडून त्यांच्या वेबसाईटवर ‘ई डायरी’ उपलब्ध करून देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे सचिव आनंद रायते यांनी घेतला आहे. त्यानुसार सीईटी सेलच्या तंत्रज्ञांमार्फत ई डायरी बनवण्यात आली आहे. या ‘ई डायरी’ला शिक्षण मंत्र्यांकडून मान्यता मिळाल्यास 1 फेब्रुवारीला त्याचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

‘ई डायरी’मध्ये दिनदर्शिका असून, त्यावर प्रत्येक दिवसाच्या कार्यक्रमाची माहिती देण्यात येणार आहे. यामध्ये सीईटी सेलकडून राबवण्यात येणारे कार्यक्रम, परिसंवाद, जनजागृती कार्यक्रम याची माहिती असणार आहे. तसेच, इंजिनीयरिंग, मेडिकल अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा, निकाल यासंदर्भात स्वतंत्र माहिती देण्यात येणार आहे. तसेच, सीईटी सेलशी संबंधित असलेल्या कॉलेजमधील कार्यक्रमांची माहितीही या ‘ई डायरी’वर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे सीईटीच्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये असलेले गैरसमज दूर होऊन त्यांची होणारी दिशाभूल रोखण्यास मदत होईल, अशी माहिती सीईटी सेलचे सचिव आनंद रायते यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -