घरमुंबईEknath Shinde : मुंबईचा स्वच्छता पॅटर्न चांदा ते बांदापर्यंत नेणार; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Eknath Shinde : मुंबईचा स्वच्छता पॅटर्न चांदा ते बांदापर्यंत नेणार; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Subscribe

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने मुंबईमध्ये सुरू करण्यात आलेले स्वच्छता अभियान आता केवळ मुख्यमंत्री किंवा महापालिकेच्या संकल्पनेपुरता राहिलेले नसून त्याने आता लोकचळवळीचे रुप धारण केले आहे. मुंबईतील स्वच्छता पॅटर्न चांदा ते बांदा असा संपूर्ण महाराष्ट्रात राबविला जाईल. त्यातून स्वच्छ, सुंदर महाराष्ट्र घडवू, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुंबई महापालिकेच्यावतीने आयोजित ‘महा स्वच्छता अभियान’चा शुभारंभ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते भारताचे प्रवेशद्वार (गेट वे ऑफ इंडिया) येथे रविवारी करण्यात आला, त्याप्रसंगी ते जनतेला उद्देशून बोलत होते. (Eknath Shinde Mumbai sanitation pattern will take from Chanda to Banda Testimony of the Chief Minister)

हेही वाचा – Sonia Gandhi : ‘माँ, यादें और मुरब्बा’; स्वयंपाकघरातील व्हिडीओमधून राहुल गांधींचा भाजपावर निशाणा

- Advertisement -

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून मुंबईमध्ये 3 डिसेंबरपासून मुंबई महानगरात संपूर्ण स्वच्छता मोहीम (Deep Cleaning Drive) सुरू करण्यात आली आहे. त्याचा पुढचा टप्पा म्हणून आज (31 डिसेंबर) मुंबईत दहा ठिकाणी ‘महा स्वच्छता अभियान’ राबवण्यात आले. स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून केली जाणारी स्वच्छता, संयंत्रांच्या सहाय्याने स्वच्छतेची प्रात्यक्षिके आणि स्थानिक लोकसहभाग असे सर्व मिळून ही महा स्वच्छता करण्यात आली. त्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला.

- Advertisement -

भारताचे प्रवेशद्वार व्यतिरिक्त वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती व उद्यान प्राणिसंग्रहालय (भायखळा), सदाकांत ढवन मैदान (नायगाव), वांद्रे रेल्वे स्थानक पश्चिम, वेसावे (वर्सोवा) चौपाटी, गणेश घाट (गोरेगाव पूर्व), स्वातंत्र्यवीर सावरकर क्रीडांगण (कुर्ला पूर्व), अमरनाथ पाटील उद्यान (गोवंडी पूर्व), हिरानंदानी संकूल (पवई), हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ड्रीम पार्क, ठाकूर गाव (कांदिवली पूर्व) अशा एकूण दहा ठिकाणी महा स्वच्छता अभियान पार पडले. या महा स्वच्छता अभियानाचा मुख्य कार्यक्रम भारताचे प्रवेशद्वार येथे पार पडला. येथूनच उर्वरित नऊ ठिकाणी दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्य कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. तसेच या नऊ ठिकाणचे लोकप्रतिधी तसेच नागरिकांशी मुख्यमंत्री यांनी थेट संवादही साधला.

हेही वाचा – New Year : तळीरामांमुळे राज्य सरकार मालामाल! ‘इतक्या’ हजार कोटींचे विक्रमी उत्पन्न मिळण्याची अपेक्षा

तसेच, राणीच्या बागेत (वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहाल) आमदार यामिनी जाधव, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव, अभिनेते व हास्यजत्रा फेम अरुण कदम, वांद्रे रेल्वे स्थानक परिसर येथून आमदार आशिष शेलार, वेसावे चौपाटी येथून डॉ. भारती लव्हेकर, गणेश घाट येथून आमदार विद्या ठाकूर, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ड्रीम पार्क येथून खासदार गोपाळ शेट्टी आणि आमदार प्रकाश सुर्वे, स्वातंत्र्यवीर सावरकर क्रीडांगण येथून आमदार मंगेश कुडाळकर, अमरनाथ पाटील उद्यान येथून खासदार राहूल शेवाळे, सदाकांत धवन उद्यान येथून आमदार कालिदास कोळंबकर आणि आमदार मनीषा कायंदे, हिरानंदानी संकूल येथून आमदार दिलीप लांडे या लोकप्रतिनिधींसह अधिकारी, शालेय विद्यार्थी, नागरिक आदी महा स्वच्छता अभियानात सहभागी झाले.

मुंबईतील प्रदूषण मुळापासून दूर करण्यासाठी कार्यवाही

मुंबईतील विविध कारणांमुळे वाढणारे प्रदूषण रोखण्यासाठी मुळापासून कार्यवाही करण्याचा निश्चय केला आहे. त्यातून संपूर्ण स्वच्छता अभियानाची संकल्पना सुचली. विविध विभागातील मनुष्यबळ, यंत्रसामुग्री एका विभागात एकत्र आणून एकाचवेळी संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला रस्ते स्वच्छ करणे, त्यानंतर ब्रशच्या धूळ हटवून जेट स्प्रेद्वारा संपूर्ण रस्ते पाण्याने धुवून काढणे; गटारे व नाल्यांचे प्रवाह कचरा मुक्त ठेवणे, सार्वजनिक प्रसाधनगृहांची नियमित स्वच्छता व निर्जंतुकीकरण, अनधिकृत फलक काढणे अशी एक ना अनेकांगी कार्यवाही हाती घेतली.
रस्ते धुण्यासाठी पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर केला जात आहे. हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी बांधकामांची ठिकाणे आच्छादित करण्यात आली आहेत. धूळ नियंत्रण संयत्रे लावणे अनिवार्य केले आहे. या सर्वांचे दृश्य परिणाम म्हणून मुंबई स्वच्छ दिसू लागली आहे. मुंबईतील स्वच्छतेची चळवळ विस्तारुन आता हे अभियान चांद्यापासून बांद्यापर्यंत राबवत संपूर्ण महाराष्ट्र स्वच्छ करायचा आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा – फणसाळकरांकडील नव्या जबाबदारीमुळे Rashmi Shukla यांचा मुंबई आयुक्तपदाचा मार्ग मोकळा?

‘ग्रीन कॉरिडॉर’ बनविणार

काही दिवसांपूर्वी मुंबईत पूर्व द्रुतगती मार्गावरील पदपथ दिसेनासे झाले होते. आता ते संपूर्ण स्वच्छ करण्यात आले असून त्या ठिकाणी ‘ग्रीन कॉरिडॉर’ बनवले जाईल, जेणेकरुन नागरिकांना त्यावरून सुखद अनुभवासह फिरता येईल. मुंबईत हरित आच्छादन (ग्रीन कव्हर) वाढवण्याच्या उद्देशाने प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी उपलब्ध मोकळ्या सार्वजनिक जागांवर झाडे लावण्याचे निर्देश दिले आहेत, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

मुंबईत लवकरच ज्येष्ठांसाठी ‘डे केअर केंद्र’

शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले की, संपूर्ण स्वच्छता अभियानामुळे मुंबईतील हवा स्वच्छ होऊ लागली आहे. मुंबईतील लहानसहान परिसर, गल्लीबोळातील भाग स्वच्छ करून आरोग्यदायी वातावरण राहील, अशा पद्धतीने कार्यवाही सुरू आहे. मुंबईत लवकरच ज्येष्ठांसाठी ‘डे केअर केंद्र’ सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती मंत्री केसरकर यांनी दिली.

हेही वाचा – Lok Sabha Elections संदर्भात एकनाथ खडसे म्हणाले; “मविआमध्ये जागावाटपावरून…”

22 हजार किलोमीटर रस्ते धुतल्यामुळे प्रदूषण पातळी घटली 

महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल चहल यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या स्वच्छता मोहीमेअंतर्गत आतापर्यंत संपूर्ण मुंबईत मिळून 22 हजार किलोमीटर लांबीचे रस्ते धुवून काढण्यात आले आहेत. आजवर 13 विभागात संपूर्ण स्वच्छता करण्यात आली आहे. त्यातून 183 टन कचरा आणि 1,100 टन राडारोडा (डेब्रीज) उचलण्यात आला आहे. दररोज 1 हजार किलोमीटर रस्ते धुण्याचा संकल्प हाती घेतला आहे. या सर्वांच्या परिणामामुळे हवा गुणवत्तेचा निर्देशांक 350 वरून निम्म्यावर आला आहे. काही ठिकाणी तर तो 90 च्याही खाली आला आहे. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या अभियानाला नवचेतना मिळाली आहे. हे अभियान आता जनचळवळीत परावर्तित झाले असून मुंबई मॉडेल देशासाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल, असा आशावादही डॉ. चहल यांनी व्यक्त केला.

दरम्यान, गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार सदा सरवणकर, महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल चहल, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, उद्योजक नादिर गोदरेज, माजी आमदार राज पुरोहित, उप आयुक्त (विशेष) संजोग कबरे, उप आयुक्त (परिमंडळ – २) रमाकांत बिरादार, यांच्यासह विविध मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -