घरसंपादकीयओपेडजो जें वांछील तो तें लाहो...

जो जें वांछील तो तें लाहो…

Subscribe

बर्‍या-वाईट गोष्टी, आठवणी मागे सोडत आपण सर्वांनीच नव्या वर्षात प्रवेश केला आहे. सरत्या वर्षाला निरोप देताना नव्या वर्षाच्या स्वागताचा उत्साह कमी होऊ नये. हाच उत्साह, चेतना जीवनाचा मूलाधार आहे. त्यासाठी तशा मानसिकतेची बैठक तयार केली पाहिजे. झाले गेले गंगेला मिळाले. घटना या घडतच असतात, त्याकडे आपण कसे पाहतो, हे महत्त्वाचे ठरते. कारण गेलेल्या गोष्टींवर चिंता करून वेळ आणि ऊर्जा फुकट घालवण्यापेक्षा त्याचा सकारात्मक उपयोग केल्यास ते स्वत: आणि समाजासाठी हिताचे ठरते.

आभाळानं उघडला सोनियाचा डोळा
निळ्या निळ्या अंगणात सूर्यदेव आला…

नवीन वर्ष घेऊन सूर्य उगवला आहे. आणखी एक वर्ष सरले. या शतकातले 23 वे वर्ष सरले. भारतासह जगभरात नव्या 2024 वर्षाचे जल्लोषात स्वागत झाले. ठिकठिकाणी विशेष कार्यक्रमांची रेलचेल, पार्ट्या, संगीत, मद्यधुंद होणे हे सर्व पहाटेपर्यंत सुरू होते. हीच झिंग पुढे साधारणपणे महिनाभर राहते. याच ‘रम्य’ आणि सुरेल आठवणी काही दिवस मनात रुंजी घालत राहतात. हे सूर आयुष्यात कायम राहावेत, यासाठीदेखील प्रयत्न झाले पाहिजेत. त्यासाठी तशी मनोभूमी तयार करण्याची गरज आहे.

- Advertisement -

काय होते की, नव्या वर्षाचे स्वागत उत्साहाने केले जाते. काही नवे संकल्प केले जातात. त्यापैकी बहुतांश संकल्प हे नियमित व्यायाम, नियमित फिरायला जाणे, व्यसन सोडणे, भाषेवर ताबा मिळवणे… यासारखेच असतात, पण त्याची पूर्ती तर होत नाहीच. हे संकल्प वर्षानुवर्षाचे बनतात. ते प्रत्यक्षात फारसे उतरतच नाहीत. त्यासाठी विविध कारणे पुढे केली जातात. त्यातली निम्म्याहून अधिक न पटणारी असतात. असो. अनेकदा काही जखमा कुरवाळत बसतो किंवा सरलेल्या वर्षात आपल्या आयुष्यात फार काही चांगले घडलेच नाही, असा समज काहीजण करतात, पण काही तरी घडण्यासाठी आपण किती प्रयत्न केले? किती संधी चालून आल्या होत्या, त्या कशा गमावल्या यााचा ठोकताळा नव्या वर्षाच्या सुरुवातीला केला, तर वास्तव समोर येईल. त्यानंतरच पुन्हा अशी संधी न गमावण्याचा निर्धार केला पाहिजे.

काही वेळेस नवीन वर्ष उजाडले तरी, आयुष्य हे ‘मागील पानावरून पुढे सुरू’ याच दृष्टीने पाहात असतो. साहित्यामध्ये आयुष्याला अनेक उपमा दिल्या जातात. त्यातलीच ही पुस्तकाची. मग त्यासाठी शाळेची आठवण का ठेवायला नको? शैक्षणिक का होईना, पण शाळेचेही ‘नवीन वर्ष’ असते. तेव्हा आपल्यासाठी नवी कोरी पुस्तके आणली जातात. त्या पुस्तकांचा सुगंध मनात साठवला जातो. नवीन वर्ग, नवा बेंच, कदाचित नवे मित्र-मैत्रिणी, नवीन शिक्षक याची ओढ असतेच ना. तशीच ओढ मोठेपणी हवी ना! पण नेमके तेच मोठेपणी पुसले जाते. नवीन वर्ष सुरू झाल्यावर हे वर्ष आपल्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येणार आहे, असा सकारात्मक विचार करायला काय हरकत आहे. आमीर खानच्या ‘थ्री इडियट्स’ या चित्रपटासारखेच आहे. आता आपल्याला नवीन काहीतरी शिकायला मिळणार, असा विचार एकाही विद्यार्थ्याच्या मनात येत नाही, याकडे त्याने बोट ठेवले आहे.

- Advertisement -

सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रसन्न वदनाने प्रत्येक गोष्टीला सामोरे जाता आले पाहिजे. तुम्ही सकाळी जो मूड तयार करता, त्याचा प्रभाव दिवसभराच्या कामकाजावर राहतो. हे मानसशास्त्रीय गणित आहे. हेच समीकरण आपण नव्या वर्षाच्या सुरुवातीला वापरू शकतो. निखळ हास्यच तुमच्या आयुष्यातील गोडी वाढवते. दिवंगत कवी मंगेश पाडगावकर यांच्या ‘सांगा कसं जगायचं?’ या कवितेचे सार हेच आहे. ते म्हणतात –

सांगा कसं जगायचं?
कण्हत कण्हत की गाणं म्हणत
तुम्हीचं ठरवा!

समस्या नसतात कोणाला? प्रत्येकाला समस्यांनी ग्रासले आहे. म्हणून हसणे सोडायचे नाही. गंभीर, चिंताक्रांत चेहरा करून समस्या चुटकीसरशी सुटणार आहे का? तर नाही. मग चिंता कशासाठी? सुखसोयी वाढत चालल्यामुळे समाधानाचा संकोच होत चालला आहे. साध्या-साध्या गोष्टीतही समाधान मानून घेणारा कधीही दु:खी होत नाही. त्यामुळे चेहर्‍यावरचे हासू निवळू न देण्याची कला शिकली पाहिजे. हसण्याचे क्षण आपल्या आसपासच असतात. ते आपल्याल टिपता आले पाहिजे. केवळ आपल्याच कोषात राहून त्याचा आनंद कसा घेणार? ओशो यांनी म्हटले आहे की, ‘हसणे एक विलक्षण रसायन आहे. ते तुमच्यात प्रचंड परिवर्तन घडवून आणते. आयुष्यात आसपासच्या हास्यास्पद गोष्टींना बघून मनमुराद हसा. ईश्वराच्या मंदिराकडे जाताना रस्ताभर हसत राहा. जे पोटभर हसलेले आहेत, तेच तिथे पोहोचले आहेत. गंभीर माणसे मात्र आपले लांब चेहरे घेऊन अजून वणवणतच आहेत.’

मानसिक आरोग्य सुधारण्याचा हसणे हा एक उत्तम मार्ग आहे. मानसिक सदृढता ही शारीरिक स्वास्थ्यासाठीदेखील आवश्यक असते, पण त्याचबरोबर सामाजिक आणि कौटुंबिक स्वास्थ्यही तितकेच महत्त्वाचे आहे, पण तेही आपण गुंतागुंतीचे करून ठेवले आहे. कुटुंबातील हास्यविनोद आता दुर्मीळ होत चालला आहे. प्रत्येक जण आपल्या हातातील मोबाईलमध्ये मान खुपसून बसलेला असतो. शेजारी बसलेल्या आई-बाबा, भाऊ, बहीण किंवा मित्रापेक्षा दुसरीकडे कुठेतरी असलेला मित्र, मैत्रीण, आप्त याच्याशी त्याचा संवाद सुरू असतो. सोशल मीडिया हे अतिशय प्रभावी माध्यम ठरले आहे, पण त्याच्या आहारी बहुतांशजण गेले आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सोशल मीडियाने जगाच्या या कोपर्‍यापासून त्या कोपर्‍यापर्यंत सर्वांना कनेक्ट केले, पण घरातल्यांना, आसपासच्यांना, मित्रांना अजून कनेक्ट केलेले नाही. बहुधा यातूनच कोरडेपणा, दिखाऊपणा निर्माण होत असावा.

याच पार्श्वभूमीवर मध्यंतरी हास्य क्लब चालवले जात होते, पण त्याचे फलित काय? मागे एकदा प्रसिद्ध नाटककार शफाअत खान यांचे एक सुंदर वाक्य वाचनात आले होते. आजकाल लोक ‘लाफ्टर क्लब’मध्ये जाताना दिसतात. याचाच अर्थ आता जीवनातील निखळ हास्याचे क्षण यायचे कमी झाले आहेत. म्हणूनच हास्य क्लबची गरज भासू लागली आहे का, अशा आशयाचे ते वाक्य होते.

एकीकडे सामाजिक कटूता वाढत चाललेली असतानाच दुसरीकडे, राजकारणानेसुद्धा सर्वच मर्यादा, स्तर सोडले आहेत. या निष्ठा, तत्त्व यांना तिलांजली देणार्‍या पुढार्‍यांच्या बोलण्याला भुलून घरात, मित्रामित्रांमध्ये द्वेषाच्या भिंती उभ्या करू नका. त्यातच आता निवडणुकांचा मोसम आहे. लोकसभा आणि राज्य विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आता राजकारणाला वेगळीच धार येईल. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आणखी तीव्र होतील. या नेत्यांच्या बोलण्याला फसून अनेकजण आपल्या चेतना, संवेदना हरवून बसतो. येथे पुन्हा एकदा मला ओशो यांची आठवण होते. ‘प्रत्येक जमाव अस्ताव्यस्त, वेडगळ, निर्जीव असतो. एक स्वतंत्र व्यक्ती जिवंत असते, पण ज्या क्षणी ती व्यक्ती समूहाचा एक अंश बनते, त्या क्षणी तिची चेतना हरवल्यासारखी होते आणि ती एका सामूहिक, यांत्रिक मनाकडून नाचवली जाते.’ परमेश्वराच्या चेतनेने भारलेली व्यक्ती बनायचे की कोणत्या तरी जमावात सहभागी होऊन कोणत्यातरी स्वार्थी व्यक्तीच्या हातची कठपुतली बनायचे, हा निर्णय प्रत्येकाने घेतला पाहिजे.

या नव्या वर्षात एक आनंदाची बातमी अशी की, 22 जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिराचे लोकार्पण होत आहे. जवळपास 500 वर्षांच्या लढ्याचे हे फलित आहे. हा आनंद सोहळा आहे. मुळात मनुष्य हा उत्सवप्रिय आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा उत्सव केला जातो. राम मंदिरचे उद्घाटनदेखील ऐतिहासिक आहे. अशा उत्सवात सहभागी झाले पाहिजे. त्याला विरोध करून स्वत:चीच शोभा करून घेण्यात हशील ते काय? नाके मुरडून असा क्षण टाळण्यापेक्षा, दिवाळी साजरी होत आहे, आतषबाजी चालू आहे… स्वत:ला एखादा फटाका नाही फोडता आला, पण बाकीचे फोडत आहेत, तर निदान टाळ्या तर वाजवू शकतो ना!

राम गणेश गडकरी यांची चिंतातूर जंतू, या नावाची एक कविता आहे. त्यात ते म्हणतात, काही लोक असे असतात की, त्यांना घडणार्‍या प्रत्येक गोष्टीची चिंता वाटत राहते. कुठल्याही गोष्टीचा ते नकारात्मक विचार करतात आणि तसेच त्याकडे पाहू लागतात. इतकेच नव्हे, तर लोकांमध्येही त्या गोष्टीविषयीचा नकार पसरवतात. त्यांना नेहमी चढण्यापेक्षा पडण्याची आणि जिंकण्यापेक्षा हरण्याची स्वप्ने पडत असतात. अशा लोकांची मने ही कायम चिंतेने ग्रासलेली असतात. खाण्याच्या अगोदर त्यांना अपचनाची कल्पना सतावत असते. त्यामुळे ते त्यांच्या आवडत्या खाद्यपदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेऊ शकत नाहीत. अशा लोकांपासून इतरांनी सावध राहणे आवश्यक असते.

आता नवीन वर्षाचे कॅलेंडर प्रत्येक घरातील भिंतीवर लागले असेलच. ते हाती पडल्यानंतर जोडून येणार्‍या सुट्ट्यांची मोजदादही झाली असणार. प्रत्येक महिन्याचे भविष्यही पाहून झाले असणार, पण त्याचबरोबर यावर्षी एखाद्या गरीब विद्यार्थ्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याचा किंवा तत्सम एखादा विधायक संकल्प सोडू शकतो. ज्ञानेश्वर माऊलीने केलेल्या प्रार्थनेचा एक छोटासा हिस्सा बनता येईल.

दुरिताचें तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जें वांछील तो तें लाहो । प्राणिजात ॥

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -