घरमुंबईकिशोर कांबळे या गोविंदाचा थरावरून कोसळून मृत्यू

किशोर कांबळे या गोविंदाचा थरावरून कोसळून मृत्यू

Subscribe

दहीहंडीची नगरी म्हणून नावारूपाला आलेल्या ठाण्यात आठ वर्षांपूर्वी एका युवकाचा दहीहंडी फोडताना थरावरून पडून झालेल्या दुखापतीने मृत्यू झाला. सन 2010 च्या दहीहंडी उत्सवात घडलेल्या या घटनेने संपूर्ण ठाणे हळहळले होते.

दहीहंडीची नगरी म्हणून नावारूपाला आलेल्या ठाण्यात आठ वर्षांपूर्वी एका युवकाचा दहीहंडी फोडताना थरावरून पडून झालेल्या दुखापतीने मृत्यू झाला. सन 2010 च्या दहीहंडी उत्सवात घडलेल्या या घटनेने संपूर्ण ठाणे हळहळले होते. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील करतासवरता 25 वर्षे वयाचा किशोर कांबळे हा गोविंदा अशा प्रकारे अचानक गेल्याने कांबळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता.

आता दहीहंडीच्या जल्लोषाला लवकरच सुरुवात होत आहे. हा जल्लोष पाहून किशोर आमच्यात नसल्याचे दुःख मोठे होते, असे किशोरची आई मुद्रिका आणि वडील केशव यांच्यासह त्याच्या भावंडांनी हताशपणे सांगितले. या उपेक्षित ठरलेल्या किशोरच्या कुटुंबाचे अश्रू पुसायला तथाकथित उत्सवप्रिय राज्यकर्त्यांना आजही वेळ नाही.
इतकेच काय त्यावेळी त्याच्या कुटुंबियांसाठी जाहीर केलेला मदतीचा हातही अद्याप या कुटुंबापर्यंत पोहोचलाच नाही. केवळ सहानुभूती व्यक्त करण्यापलीकडे या मोठ्या दहीहंड्या आयोजित करणार्‍या सर्वच आयोजकांनी काहीही केलेले नाही. याबद्दल किशोरच्या वडिलांना संताप व्यक्त केला.

- Advertisement -

ज्ञानेश्वर नगरमधील तरुणांनी एकत्र येऊन ओम साई गोविंदा पथकाची स्थापना केली होती. अजय सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली सर्व गोविंदा पथक परिसरातील लहान मोठ्या दहीहंड्या फोडण्यासाठी जात असत. 2010 च्या 2 सप्टेंबरलाही या पथकाने दहीहंड्या फोडण्यासाठी ठिकठिकाणी थर लावले. मात्र सावरकर नगर आणि शास्त्री नगर येथील हंड्यांना गवसणी घालण्याच्या नादात ओम साईचा मनोरा कोसळला होता. यावेळी चौथ्या थराचा आधार असलेला किशोरही खाली कोसळला होता. त्यानंतर खूप वेळ तो तसाच खाली बसून होता. इतरांनी विचारणा केल्यावरही त्याने त्याच्या इतर सहकारी गोविंदांना काहीच सांगितले नाही. या दुर्घटनेत त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याची शक्यता होती. त्या दिवशी रात्री खूप दमलेल्या अवस्थेत किशोर उशिरा घरी आला. घरची परिस्थिती गरिबीची असल्याने त्याने आपल्या दुखण्याबद्दल कोणालाच काही सांगितले नाही. त्यानंतर त्याला ताप आला. पुढचे दोन दिवस त्याने ताप अंगावर काढला. जवळच्या डॉक्टरांच्या औषधोपचाराने फरक पडत नसल्याने त्याला ठाण्यातील हेल्थ केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत फारच उशीर झाला होता. रुग्णालयातच त्याने आपला प्राण सोडला.

आर्थिक भार नको म्हणून दुखणे अंगावर काढले
किशोरचे वडील ट्रक ड्रायव्हर असल्याने नेहमी राज्यात ठिकठिकाणी फिरतीच्या कामावर असतात. तर मोठा भाऊ अमोल हा अपंग आहे. तर दोघे बालाजी आणि विशाल हे धाकटे भाऊ शाळेत जातात. यात तुटपुंज्या पैशांतून कुटुंबाचा रहाटगाडा ओढणारी आई. अशा स्थितीत लहान मोठी नोकरी करून किशोरने वडिलांना हातभार लावण्यास सुरुवात केली होती. अशावेळी आपल्याला झालेल्या दुखापतीचा आर्थिक भार कुटुंबावर पडू नये, म्हणून किशोरने तोंडातून रक्त येईपर्यंत दुखणे दाबून ठेवले. यामुळे मृत्यूने त्याला कवटाळले. 

- Advertisement -

नांदगावकर-पाटील यांच्यातील चर्चेनंतरही उपेक्षाच 
 घरातला कर्ताधर्ता युवक गेला तर कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो. या संदर्भात कांबळे कुटुंबियांना काही अर्थिक मदत मिळावी, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मुंबईचे तत्कालीन पालकमंत्री जयंत पाटील यांच्यासोबत मंत्रालयात चर्चा केली होती. त्यावेळी पाटील यांनी मृत कुटुंबियांना प्रत्येकी एक लाख रुपये देण्याचे जाहीर केले होते. त्याकरता किशोरचे वडील सातत्याने मंत्रालयात चकरा मारत होते. 2014 नंतर सरकार बदलले आणि सर्वच बदलले. मग किशोरच्या वडिलांनी मंत्रालयात चकरा मारण्याचेही सोडून दिले. आता याबाबत कुणाला विचारणा करायची असा प्रश्न त्यांना पडला आहे.  

जितेंद्र आव्हाडांचे आश्वासनही हवेतच 
इतकेच नव्हे तर त्यावेळी संघर्ष दहीहंडीचे प्रमुख जितेंद्र आव्हाड यांनीही कांबळे कुटुंबियांना एक लाख रुपये मदतीचे आश्वासन दिले होते. त्याचाही पाठपुरावा किशोरचे वडील सन 2015 पर्यंत करीत होते. अखेर हताश होऊन त्यांनी हा मार्ग सोडून दिला. याबाबत महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य राणा जगजितसिंह पाटील यांनी किशोरच्या कुटुंबियांना दिलेल्या मदतीच्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांना पत्र पाठवले होते. ज्यामध्ये त्यांनी संघर्षकडून कांबळे कुटुंबियांना मिळणारी एक लाखांची मदत देण्यात यावी, असे सांगितले होते. मात्र त्या पत्रालाही केराची टोपली दाखवण्यात आल्याचे किशोरच्या वडिलांनी सांगितले.  

एकनाथ शिंदेजी स्टॉलचे काय झाले?
 टेंभीनाक्यावरील दहीहंडीची धुरा वाहणारे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि ठाण्याचे विद्यमान पालकमंत्री आमदार एकनाथ शिंदे यांनी किशोरचा मोठा भाऊ जो अपंग आहे त्याला पालिकेच्या वतीने स्टॉल देऊन त्याचे पुनर्वसन करू, असे आश्वासन दिले. त्याही आश्वासनाचा पाठपुरावा करता करता आज आठ वर्षे निघून गेली. मात्र पदरी काहीच पडले नसल्याची खंत किशोरच्या वडिलांनी व्यक्त केली.  

आता ढुंकून पाहायलाही कुणी येत नाही
घरातील कमावता मुलगा गेल्याचे दुःख पचवित असतानाच राजकारण्यांनी आणि संस्कृतीच्या ठेकेदारांनी आमच्या कुटुंबाची अशी अवहेलना करावी हे त्यापेक्षाही मोठे दुःख आहे. आमचा कर्ताधर्ता मुलगा या संस्कृतीची जोपासना करता करता गेला. मात्र या संस्कृतीचे पालनहार म्हणवणार्‍यांनी आमच्याकडे आजपर्यंत एकदाही ढुंकून पाहिले नाही. मुलाचा मृत्यू झाला तेव्हा मोठमोठी आश्वासने देणारे नेते आज आम्ही कुठल्या अवस्थेत जगत आहोत. याकडे पहायला देखील त्यांच्याकडे वेळ नाही. अशी व्यथा दुःखद अंतकरणाने किशोरच्या वडिलांनी दै.‘आपलं महानगर’कडे व्यक्त केली.  

शिवसेनेने १ लाखांची मदत दिली होती
किशोर कांबळेच्या निधनानंतर शिवसेना जिल्हा शाखेतर्फे त्यांच्या कुटुंबाला जाहीर केल्याप्रमाणे १ लाखांची मदत घरी जाऊन दिली होती. मात्र अजूनही कांबळे यांच्या कुटुंबाची फरफट होत असल्यास त्यांना मदत करायला शिवसेना सदैव तयार आहे.  –  एकनाथ शिंदे, पालकमंत्री ठाणे

किशोरच्या कुटुंबाला अर्थमंत्र्यांकडे घेऊन जाणार
मी स्वतः गोविंदा होतो. गोविंदा घरी सुरक्षित परतेपर्यंत त्याच्या कुटुंबियांची काय अवस्था असते त्यामधून मी गेलो आहे. यामुळे गोविंदांनी आपल्या सुरक्षेची काळजी घ्यायला हवी. किशोर कांबळे या गोंविंदाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाची झालेली होरपळ विदारक आहे. त्याच्या कुटुंबाला सरकारकडून मदत मिळाली पाहिजे आणि नेत्यांनीही घोषणा केल्याप्रमाणे आर्थिक आधार देणे गरजेचे आहे. यासाठी मी स्वतः किशोरच्या कुटुंबाला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे घेऊन जाईन आणि त्यांना मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करेन.
– बाळा नांदगावकर, माजी आमदार, मनसे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -