घरCORONA UPDATEविलेपार्ले ते जोगेश्वरी पश्चिम - असा होणार गणेशोत्सव साजरा!

विलेपार्ले ते जोगेश्वरी पश्चिम – असा होणार गणेशोत्सव साजरा!

Subscribe

एक प्रभाग, एक गणपती अशी संकल्पना मांडून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना के/ पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त विश्वास मोटे यांनी आवाहन केल्यानंतर त्यांना मंडळांकडून काही प्रमाणात प्रतिसाद लाभताना दिसत आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि आनंदात गणेशोत्सव साजरा करणाऱ्या या मंडळांनी यंदा हा उत्सव साधेपणाने साजरा करण्याची तयारी दर्शवली आहे. या विभागात मागील वर्षी ८८ मंडळांनी सार्वजनिक गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली होती. त्यातील ३२ मंडळांनी यंदा उत्सव साजरा न करण्याची तयारी दर्शवली आहे. तर काही मंडळांनी दीड ते सात दिवस उत्सव करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे आपल्या विभागातील किमान काही मंडळांचे मन वळवण्यात महापालिकेच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे.

‘एक प्रभाग एक सार्वजनिक गणपती’ संकल्पना

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. त्या दृष्टिकोनातून महापालिकेने मार्गदर्शक तत्वेही तयार केली आहेत. त्यामुळे के/पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त विश्वास मोटे यांनी या वर्षाचा गणेशोत्सव हा आपल्या वैयक्तिक पातळीवर साजरा करूया, असे आवाहन केले आहे. के/पश्चिम विभागात जवळपास ८८ च्या आसपास गणेशोत्सव मंडळे असून त्यांनी या सर्व मंडळांना एक प्रभाग एक सार्वजनिक गणपती ही संकल्पना मांडली आहे.

- Advertisement -

विलेपार्ले ते जोगेश्वरी पश्चिम या महापालिकेच्या के-पश्चिम विभागातील जवळपास सर्व मंडळांशी संवाद साधला जात आहे. येथील एकूण ८८ पैकी ३२ मंडळांचे मन वळवण्यात महापलिका यशस्वी ठरली आहे. उर्वरीत मंडळांपैकी ११ मंडळांनी ११ ऐवजी दीड दिवस उत्सव साजरा करण्याची तयारी दर्शवली. तर २ मंडळांनी ५ दिवस व २ मंडळांनी ७ दिवस उत्सव करण्याची तयारी दर्शवली आहे. तर उर्वरित मंडळे हे ११ दिवस उत्सव करण्यावर कायम असल्याची माहिती के- पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त विश्वास मोटे यांनी दिली आहे.

के- पश्चिम विभागात १३ कृत्रिम तलाव

के-पश्चिम विभागात एकूण १३ नगरसेवक प्रभाग असून या सर्व प्रभागात प्रत्येक नगरसेवकांमागे एक याप्रमाणे कृत्रिम तलावांची उभारणी केली जाणार आहे. एक प्रभाग एक सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले असले तरी नैसर्गिक विसर्जन स्थळांवर गर्दी होऊ नये म्हणून कृत्रिम तलावांची संख्याही वाढवण्यात येत असून एक नगरसेवक, एक कृत्रिम तलाव ही संकल्पना राबवून जास्तीत जास्त कृत्रिम तलाव उपलब्ध करून दिली जातील, असे मोटे यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -