घरमुंबईदै. आपलं महानगरकडून ‘गाथा यशस्विनींची...महिला बचत गटांची’

दै. आपलं महानगरकडून ‘गाथा यशस्विनींची…महिला बचत गटांची’

Subscribe

सर्वच क्षेत्रात महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून यशस्वी भरारी घेत आहेत. महिलांनी संघटित होऊन आपला विकास साधावा यासाठी काही वर्षांपूर्वी सहकार क्षेत्राप्रमाणे ‘महिला बचत गट’ ही संकल्पना उदयास आली. ही संकल्पना नुसतीच उदयास आली नाहीतर त्यातून अनेक महिलांनी स्वत:चे अस्तित्व निर्माण करत अनेक महिलांचे आयुष्य घडवलेे. अशा या उंच झेप घेणार्‍या महिलांची यशोगाथा दै.‘आपलं महानगर’ ‘गाथा यशस्विनींची… महिला बचत गटांची!’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजासमोर आणत आहे. हा कार्यक्रम सोमवार, दुपारी 1 ते 4 वाजताच्या दरम्यान मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित केला आहे.

नोकरीमध्ये स्वत:चा विकास होणार नाही म्हणून समाजामध्ये दोन वेळच्या जेवणासाठी झगडणार्‍या महिलांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी मुंबईतील शालिनी गायकवाड यांनी स्वत:चा फर्निचरचा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायामध्ये पुरुषांची मक्तेदारी मोडून काढत त्यांनी नुसतेच यश मिळवले नाही तर तब्बल दोन हजारांपेक्षा अधिक महिलांना या व्यवसायातून स्वत:च्या पायावर उभे केले. त्याचप्रमाणे मराठमोळ्या पद्धतीने बेकरी पदार्थ बनवून अलिबागकरांची मने जिंकणार्‍या विद्या पाटील यांनी बेकरी व्यवसायातून 25 महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला. त्यांच्या मयूर बेकरीची वार्षिक उलाढाल अडीच कोटींची आहे.

- Advertisement -

महिला बचत गट यशस्वीपणे राबवणे हे फारच जिकिरीचे काम असते. परंतु ठाण्यातील प्रतिभा इरकशेट्टी यांनी ठाण्यामध्ये तब्बल 15 महिला बचत गटांच्या माध्यातून अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्याचप्रमाणे नाशिक जिल्हा महिला विकास क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून नाशिकमधील 900 महिला बचत गट आणि 16 हजार महिलांना एकत्र आणत नाशिकच्या अश्विनी बोरस्ते यांनी एक प्रकारे इतिहास रचला आहे. टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्याच्या व्यवसायात रुपांतर करून महिला बचत गटाच्या माध्यामातून पालघरसारख्या आदिवासी जिल्ह्यातील प्रणिता अधिकारी यांनी 200 महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. प्रणिता अधिकारी यांच्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल 10 लाखांपेक्षा अधिक आहे.

अशा या स्वत:सोबत महिलांचाही विकास घडवणार्‍या हिरकणींसोबत थेट संवाद साधण्याची संधी सोमवारी दै.‘आपलं महानगर’ने ‘गाथा यशस्विनींची… महिला बचत गटांची’ या कार्यक्रमातून उपलब्ध केली आहे. या कार्यक्रमाला महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष्या ज्योती ठाकरे, डिकी संस्थेच्या अध्यक्ष्या आणि उद्योजिका चित्रा उबाळे, पश्चिम उपनगर महिला सहकारी फेडरेशनच्या अध्यक्ष्या संजना घाडी उपस्थित राहणार आहेत. ‘गाथा यशस्विनींची… महिला बचत गटांची!’ हा कार्यक्रम सोमवारी 19 ऑगस्ट रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ, आझाद मैदान शेजारी येथे दुपारी 1 ते 4 या वेळेत होणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी संपर्क : सौरभ शर्मा : 9867999762

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -