घरमुंबईयाला म्हणतात, 'गिरे तो भी टांग उपर!'

याला म्हणतात, ‘गिरे तो भी टांग उपर!’

Subscribe

लोकलच्या दारात उभ्या असलेल्या एका मुलीचा तोल जातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. एका व्यक्तीने तिला वाचवलं. पण दारात उभं राहाणं ही माझी चूक नव्हतीच, उलट रेल्वेनेच मेट्रोसारखे दरवाजे बसवावेत अशी मल्लिनाथी तिनं माध्यमांसमोर मिरवली आहे!

मुंबईची लोकल आणि तिच्यातली गर्दी हा विषय तर जगजाहीरच आहे. गर्दीमुळे अनेकदा मुंबईकरांना लोकलच्या दरवाज्यात बाहेर लटकत धोकादायक परिस्थितीमध्ये प्रवास करावा लागतो. अनेकदा अशा अवस्थेत प्रवास करताना गंभीर दुर्घटनाही घडते. गर्दीच्या वेळी अशा प्रकारे प्रवास करणं नाईलाज असू शकतो. पण काही महाभाग गर्दी नसतानाही लोकलच्या दरवाजात उभे राहून प्रवास करत असतात. एवढंच नाही, तर दारात उभे राहून स्टंटबाजीही करत असतात. हीच सवय एका मुलीच्या जिवावरच बेतणार होती. मात्र जवळच्या दुसऱ्या प्रवाशाने तिचा जीव वाचवला. दुसऱ्या शब्दांत तिला जीवनदानच दिलं. या तरुणीला मात्र त्याचं काहीही वाटत नाहीये. उलट ‘गिरे तो भी टांग उपर’ अशा आविर्भावात ती रेल्वेला आणि प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधिंनाच ज्ञान द्यायचा प्रयत्न करत आहे. यासंदर्भात तिने प्रसार माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

- Advertisement -

नक्की काय झालं होतं?

मध्य रेल्वेवर पूजा भोसले ही तरुणी शिवडीहून दिव्याकडे जात होती. लोकलमध्ये आत जागा असूनही ही तरुणी दरवाज्यात उभी होती. शिवाय दारात उभं राहूनच ती बिनधास्तपणे हातवारे करत होती, तिच्या ओढणीशी खेळत होती. भांडुप स्टेशनच्या आधी दरवाज्यात पूजा उभी होती. हवेमुळे उडणारी तिची ओढणी अॅडजस्ट करत होती. डावा हात दरवाज्याच्या हँडलवर होता, तर उजवा हात हवेतच होता. ओढणी अॅडजस्ट करण्याच्या नादात पूजाचं समोरून येणाऱ्या लोकलकडे अजिबात लक्ष नव्हतं. ओढणी अॅडजस्ट करता करता तिचा हात हवेत गेला आणि समोरून येणाऱ्या ट्रेनच्या वेगामुळे तिचा डावा हातही हँडलवरून सुटला. जवळच उभ्या असलेल्या एका व्यक्तीने प्रसंगावधान राखून तिचा सुटलेला डावा हात पकडला. तोपर्यंत पूजा दारातून खाली लटकली होती. त्या व्यक्तीने तिला लागलीच वर खेचून परत डब्यात घेतलं. तेव्हा मात्र पूजा अद्दल घडल्यामुळे दारात उभी न राहाता आत उभी राहिली. हा सगळा प्रकार दुसऱ्या एका प्रवाशाने मोबाईल व्हिडिओमध्ये कैद केल्यामुळे समोर आला.


वाचा सविस्तर – ट्रेनच्या डोअरवर हवा खाणं पडलं महागात

- Advertisement -

सुंभ जळला, पण पीळ सुटेना!

एवढं सगळं होऊनही पूजा मात्र तिची चूक मानायला तयार नाही. किंबहुना पूजाने तिची प्रतिक्रिया घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारांनाच चार शब्द सुनावले आहेत! तिचं म्हणणं आहे की, ‘तिने दारात उभं राहून हात बिनधास्त हवेत हलवला यात काहीही चूक नाही’. शिवाय ‘ज्या व्यक्तीने व्हिडिओ शूट केलं, तो फक्त एकदा मला भेटला पाहिजे’, असा दमही पूजा कॅमेऱ्यासमोर देतेय. दारात उभं राहाणं ही तुझी चूक होती असं तुला वाटत नाही का? असा प्रश्न जेव्हा पत्रकारांनी तिला विचारला, तेव्हा तर ‘तुम्हाला एवढंच जर वाटत असेल, तर लोकलला मेट्रोसारखे ऑटोमॅटिक दरवाजे बसवा’, असा बादशाही सल्ला देखील द्यायला पूजा विसरलेली नाही! त्यामुळे तिथे गेलेल्या पत्रकारांनाच डोक्याला हात मारून घ्यायची वेळ आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -