घरताज्या घडामोडी‘राजगड’खालीच बसवले फेरीवाले; मनसेसह देशपांडेचा वचपा काढणार महापालिका

‘राजगड’खालीच बसवले फेरीवाले; मनसेसह देशपांडेचा वचपा काढणार महापालिका

Subscribe

‘राजगड’ असलेल्या पद्माबाई ठक्कर रोडवरील कासारवाडी ते कोहिनूर स्वेअरपर्यंतच्या पदपथांवर तब्बल १०० फेरीवाले बसवले जाणार आहेत.

मुंबईतील रेल्वे स्थानकाबाहेरील फेरीवाल्यांना हटवा, अशी मागणी करत विराट मोर्चा काढणार्‍या मनसेच्या ‘राजगड’च्या खालीच महापालिकेने फेरीवाल्यांना बसवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘राजगड’ असलेल्या पद्माबाई ठक्कर रोडवरील कासारवाडी ते कोहिनूर स्वेअरपर्यंतच्या पदपथांवर तब्बल १०० फेरीवाले बसवले जाणार आहेत. विशेष म्हणजे याच मार्गावर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांचेही घर आहे. त्यामुळे ‘राजगड’सह देशपांडे यांच्याही घरासमोर फेरीवाल्यांना बसवून वचपा काढण्याचा प्रयत्न महापालिकेने केला आहे.

१ हजार ४८५ फेरीवाल्यांना बसण्याची जागा निश्चित

मुंबई महापालिकेने फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीकोनातून न्यायालयाच्या आदेशानुसार पावले उचलली आहेत. त्यानुसार प्रथम केलेल्या फेरीवाला क्षेत्राला लोकांच्या झालेल्या विरोधानंतर सुधारीत यादी तयार करण्यात आली आहे. या सुधारीत यादीनुसार महापालिकेने विविध विभागातील फेरीवाला क्षेत्रातील पदपथांवर एक बाय एकच्या आकाराच्या जागा रंगवण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये दादर, माहिम आणि दादर या जी/उत्तर विभागामध्ये १४ रस्ते फेरीवाला क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. या १४ रस्त्यांवर १ हजार ४८५ फेरीवाल्यांना बसण्याची जागा निश्चित करण्यात आली आहे.

- Advertisement -

याठिकाणी फेरीवाल्यांना दिली जाणार परवानगी

या १५ रस्त्यांमध्ये ‘राजगड’ असलेल्या पद्माबाई ठक्कर मार्गावरील कासारवाडी ते कोहिनूर स्क्वेअरपर्यंत १०० फेरीवाल्यांना बसवण्यात येणार आहे. तर सेनापती बापट मार्गावर माहिमला २०० फेरीवाल्यांना बसण्याची जागा निश्चित केली आहे. परंतु, माहिममधील सेनापती बापट मार्ग वगळता या मार्गावरील माटुंगा रोड आणि दादरपर्यंत कुठेही फेरीवाल्यांना बसवण्यास परवानगी नाही. विशेष म्हणजे ज्या रस्त्यावर सध्या एकही फेरीवाला नाही त्या भागोजी किर मार्गावरील दक्षिण दिशेला असलेल्या पदपथावर ५० फेरीवाल्यांचे पुनर्वसन केले जाणार आहे. त्याबरोबरच दादरमधील शारदाश्रम शाळेजवळील बाबुराव परुळेकर मार्गावरही ५० फेरीवाल्यांचे पुनर्वसन केले जाणार आहे. तर माहिमच्या दिशेला एल.जे. रोडवर सर्वाधिक म्हणजे ३०० फेरीवाल्यांना बसवले जाणार आहे.

सध्या जाखादेवी ते पोर्तुगीज चर्च या मार्गावरील अपवादात्मक फेरीवाले दृष्टीस पडत असले तरी या भागातील गोखले मार्गावर तब्बल १०० फेरीवाल्यांचे पुनर्वसन केले जाणार आहे. महापालिका सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पद्माबाई ठक्कर रोडवर कधीही फेरीवाले बसलेले नाही. परंतु, तिथे फेरीवाले बसवले जात आहेत. त्याबरोबरच बाबुराव परुळेकर मार्गावरही फेरीवाले नाहीत. तिथेही फेरीवाले बसवले जात असल्याने साहजिकच लोकांची मोठी नाराजी आहे. त्यामुळे अशाप्रकारचे निर्णय घेण्यापूर्वी प्रशासनाने स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घ्यायला हवे. त्यामुळे अशा मार्गावर आम्ही फेरीवाले बसवू देणार नाही. प्रशासनाने त्यापेक्षा सेनापती बापट मार्गावर जरुर फेरीवाले बसवावे, अशीही सूचना त्यांनी केली आहे.

- Advertisement -

जी/उत्तर विभागातील फेरीवाला क्षेत्रांची नावे

  • धारावी ६० फूट रोड : ८० फेरीवाले
  • माहिम एम.एम.सी रोड : ५०फेरीवाले
  • भागोजी किर रोड : ५० फेरीवाले
  • माहिम सुनावाला अग्यारी रोड : १०० फेरीवाले
  • शितलादेवी रोड: १५०फेरीवाले
  • पद्माबाई ठक्कर रोड : १०० फेरीवाले
  • एन.सी.केळकर रोड : १०० फेरीवाले
  • एल.जे.रोड : ३०० फेरीवाले
  • सेनापती बापट मार्ग : २०० फेरीवाले
  • व्ही.एस.मटकर मार्ग : ३० फेरीवाले
  • बाबुराव परुळेकर मार्ग : ५० फेरीवाले
  • भवानी शंकर रोड : ७५ फेरीवाले
  • गोखले रोड : १०० फेरीवाले
  • पंडित सातवडेकर मार्ग : १०० फेरीवाले

    हेही वाचा – शिवाजीपार्क मैदानाचा लवकरच कायापालट


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -