घरमुंबईमुंबई ठप्प

मुंबई ठप्प

Subscribe

गेल्या दोन दिवसांपासून मुंबई शहरासह उपनगराला पावसाने अक्षरश: झोडपून काढले. जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईच्या तीन्ही मार्गांवरील रेल्वे सेवा ठप्प झाली. सायन, कुर्ला, चुनाभट्टी, कांजूरमार्ग, नाहूर, मुलुंड, ठाणे, कल्याण, उल्हासनगर,माहिम,माटुंगा रोड, नालासोपारा स्थानकांतील रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकल गाड्या जागीच खोळंबल्या. याचा प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे सीएसएमटी रेल्वे स्थानकात संतप्त प्रवाशांनी गोंधळ घातला. शहरातील रस्त्यांवरीही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रस्ते वाहतूक सुद्धा धीम्या गतीने सुरु होती. मात्र टॅक्सी आणि रिक्षा चालकांनी मनमानीपणे भाडे आकारून प्रवाशांची लूट केली. अशा प्रकारे मुंबईकरांचे या पावसाने चारही बाजुने हाल केले.

मंगळवारी रात्रीपासून पावसाने जोर धरला होता. बुधवारी पहाटेपासून पाऊस आणखी वाढला. त्यामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर सकाळी ८ वाजेपर्यंत वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. त्यातच पश्चिम रेल्वेच्या रुळाला विरारजवळ तडा गेल्याने पश्चिम रेल्वे विस्कळीत झाली होती. या तांत्रिक बिघाडामुळे वसई-विरार दरम्यान जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. बिघाड दुरुस्तीनंतर वाहतूक पूर्ववत झाली, मात्र सतत सुरु असलेल्या पावसामुळे नालासोपारा रेल्वे स्थानकात रुळावर पाणी साचल्याने लोकल सेवा ठप्प झाली. तसेच विरार ते वसई दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्यामुळे दिवसभर लोकल सेवा बंद होती. पावसाचा जोर कमी होताच सायंकाळी ५ वाजता चर्चगेट वरून वसईसाठी पहिली विशेष लोकल सोडण्यात आली. रात्री उशिरापर्यंत पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर आली. कुर्ला-सायन स्थानकांदरम्यान पाणी भरल्यामुळे लोकल गाड्या जागीच खोळंबल्या. प्रवाशांना लोकल गाड्यांमधून खाली उतरुन रुळावरील पाण्यातून वाट काढत चालावे लागले. हार्बर मार्गावरील चुनाभट्टी ते कुर्ला दरम्यान रेल्वे रुळांवर पाणी भरल्यामुळे सीएसएमटी ते वाशी,बेलापुर,पनवेल लोकल सेवा बंद करण्यात आली.

- Advertisement -

लांबपल्ल्याच्या रेल्वे वाहतुकीला फटका
पावसाचा फटका लांब पल्ल्याच्या रेल्वे वाहतुकीलाही बसला. मुंबईत येणार्‍या आणि मुंबईतून बाहेर जाणार्‍या अनेक लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या, तर काही गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला. सीएसएमटी-चेन्नई, सीएसएमटी-भुवनेश्वर, एलटीटी-गोरखपूर, सीएसएमटी-पुणे, सीएसएमटी-कोल्हापूर, सीएसएमटी-मनमाड या गाड्या रद्द करण्यात आल्या. याशिवाय बुधवारी मुंबईत येणार्‍या अनेक गाड्या मधल्या स्थानकात थांबवण्यात आल्या. अनेक गाड्यांच्या वेळात बदल करण्यात आला.

विमान सेवाही प्रभावित
ढगाळ वातावरणामुळे दृष्यमानता कमी झाल्याने विमान सेवेवरही परिणाम झाला. मुंबईहून विमान सेवा अर्धा तास विलंबाने सुरू होती, तर मुंबईत येणार्‍या विमानांच्या आकाशात घिरट्या सुरू होत्या.

- Advertisement -

रस्ते वाहतूक मंदावली
शहरातील अनेक रस्ते पावसाच्या पाण्याच्या खाली गेल्याने रस्ते वाहतूक पूर्णपणे मंदावली. पुर्व-पश्चिम द्रुतगती महामार्गावर देखील गाड्यांच्या रांगा लागल्या. सायन-पनवेल हायवेवर देखील वाहतुकीची कोंडी झाली. लालबाग, सायन, हिंदमाता, परळ, गांधी मार्केट या भागात पाणी भरले. लोकलच्या गोंधळामुळे अनेकांनी रस्ते वाहतुकीचा पर्याय स्वीकारला, परंतु रस्ते वाहतुकीचा वेग मंदावला. दादर टी टी भागात पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने बेस्टच्या अनेक बसगाड्या पाण्यात अडकल्या. टिळक पुलावर देखील गाड्यांच्या रांगा लागल्या. घाटकोपर-अंधेरी मार्गावर वाहतूक कोंडी झाली. एलबीएस रोडवर पाणीच पाणी झाले होते.

तब्बल सहा तासानंतर पहिली लोकल धावली
तब्बल सहा तासानंतर कुर्ल्याहून कर्जत आणि कल्याणहून ठाण्याच्या दिशेने पहिली लोकल रवाना झाली. मात्र सात तास उलटूनही हार्बर मार्गावरील वाहतूक जैसे थे होती, त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

ट्रॅकवर चालणार्‍या प्रवाशांना शॉक
पाण्यात अडकलेल्या लोकल गाड्यांमधून खाली उतरुन पाण्यातून वाट काढत प्रवाशांनी जवळचा रस्ता गाठण्याचा प्रयत्न केला. जेव्हा रेल्वे ट्रॅकवरून प्रवासी चालत असताना अनेक प्रवाशांना कमी दाबाचा विजेच्या झटका लागत होता. तरीही प्रवासी आपला जीव धोक्यात घालून रेल्वे ट्रॅकवरून चालत होते.

रिक्षा-टॅक्सी चालकांकडून प्रवाशांची लूट
पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलामुळे बेस्टनेही काही गाड्या रद्द केल्या होत्या, तर अनेक बसगाड्यांचे मार्ग बदलले होते. त्यामुळे बेस्ट बसेसचीही मुंबईकरांना मदत होत नव्हती. याचा फायदा रिक्षा, टॅक्सी आणि ओला, उबेर यांनी घेतला. अनेक टॅक्सी आणि रिक्षा चालकांनी प्रवासासाठी नकार दिला, तर अनेकांनी प्रवाशांकडून जादा पैसे वसूल करताना दिसून आले आहे. त्यामुळे प्रवाशांची आर्थिक पिळवणूक सुद्धा मोठ्या प्रमाणात झाली आहे.

रेल्वे मंत्री देवदर्शनात मग्न
एकीकडे मुसळधार पावसामुळे मुंबईची लाइफलाईन लोकलसेवा ठप्प झाल्याने मुंबईकरांचे अतोनात हाल होत असताना दुसरीकडे रेल्वेमंत्री पियुष गोयल मुंबईत देवदर्शनात मग्न होते. मुंबईकरांचे काय हाल झाले आहेत याची विचारपूस न करता रेल्वेमंत्री गोयल लालबागच्या राजाचे दर्शनासाठी गेले होते. एरव्ही ट्विटरवर रेल्वे प्रवाशांना तात्काळ रिप्लाय देणारे रेल्वेमंत्री मुंबईत असून देखील लोकल सेवेबद्दल चकार शब्द काढत नव्हते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -