घरमुंबईपालिकेच्या शाळा दहावीपर्यंत होणे अशक्य

पालिकेच्या शाळा दहावीपर्यंत होणे अशक्य

Subscribe

मुंबई महापालिकेकडून अनेक शाळांची मर्यादा दहावीपर्यंत वाढविण्यासंदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होत आहे. पालिकेची ही मागणी लवकरच पूर्ण केली जाईल, असे संकेत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी मुंबईत एका कार्यक्रमात दिले. त्यामुळे मुंबई महापालिकेतील विद्यार्थ्यांना नवीन वर्षांच्या सुरुवातीलाच गूड न्यूज मिळाली खरी; पण अवघ्या काही मिनिटातच विद्यार्थ्यांच्या या आनंदावर विरजण पडले आहे. या शाळांना सोयीसुविधा पुरविणे अशक्य असल्याचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी स्पष्ट केल्याने शिक्षणमंत्र्यांच्या घोषणेची हवाच काढून टाकली आहे.

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाचा मुहूर्त साधत राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी दादर येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी शिक्षणमंत्र्यांनी पालिकेच्या सर्व शाळा दहावीपर्यंत करण्याबाबत सरकार विचाराधीन असल्याची घोषणा केली. मुलांना शाळेत प्रवेश घेताना पालक शाळा दहावीपर्यंत असण्याला प्राधान्य देतात. पालिकेच्या बहुतांश शाळा या दहावीपर्यंत नसल्याने अनेक पालक खासगी शाळांना प्राधान्य देतात. पालिकेच्या शाळेत दहावीपर्यंतच वर्ग उपलब्ध केल्यास पालक आपल्या विद्यार्थ्यांना पालिकेच्या शाळेत प्रवेश घेतील. त्यामुळे पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढण्यास मदत होईल, असे वक्तव्य शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली. पालिकेच्या शाळा दहावीपर्यंत करण्यासाठी अनुदानाची गरज आहे. त्यासाठी सरकारचे वित्त विभाग, शिक्षण विभाग व पालिका एकत्र येऊन प्रयत्न करत आहेत, असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

परंतु पालिकेच्या सर्व शाळा दहावीच्या करणे अशक्य असल्याचे मत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मांडत तावडे यांना तोंडघशी पाडले. पायाभूत सुविधा उभारणे, शिक्षक उपलब्धता, जागेची कमतरता, अपुरी पटसंख्या या समस्यांमुळे महापालिकेच्या शाळा दहावीपर्यंत करणे अशक्य असल्याचे त्यांनी सांगितले.

फक्त दोनच शाळांना मान्यता
महापालिकेच्या शाळा दहावीपर्यंत वाढवण्यासंदर्भात विचारणा होत असली तरी प्रत्येक शाळेत पायाभूत सुविधा, सोयीसुविधा व वर्गखोल्या उपलब्ध करणे अशक्य आहे. त्यामुळे प्रत्येक विधानसभेतील फक्त दोनच शाळा दहावीपर्यंत वाढवण्याचा विचार आहे, अशी माहिती महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -