घरताज्या घडामोडीKCR Uddhav thackeray Meet : महाराष्ट्रातून निघणारा मोर्चा यशस्वी होतो, समविचारी पक्षांसोबत...

KCR Uddhav thackeray Meet : महाराष्ट्रातून निघणारा मोर्चा यशस्वी होतो, समविचारी पक्षांसोबत लवकरच रणनिती आखणार – के चंद्रशेखर राव

Subscribe

देशात चांगले सुधार आणण्यासाठी तसेच अनेक गोष्टींमध्ये गती वाढवण्यासाठी काही स्ट्रक्चरल चेंजेस करण्यासाठी तसेच देश पातळीवर काही धोरणे बदलण्यासाठी आम्ही आज चर्चा केली. अनेक विषयांवर एकमत झाला असून अनेक विषयांच्या बाबतीत एकत्र आहोत. येत्या काळात एकत्र काम करण्यासाठी समविचारी लोकांसोबत माझी चर्चा सुरू आहे. हैद्राबाद किंवा इतर कोणत्या ठिकाणी भेटून भाजपविरोधी आघाडी निर्माण करण्यासाठी मार्ग निश्चित करणार असल्याची माहिती तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट झाल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनीही देशातील वातावरण गढूळ होत असल्याचे सांगत केंद्रीय तपास यंत्रणांच्या सूडाच्या राजकारणावर जोरदार टीका केली.

देशातील राजकीय नेते भेटतात तेव्हा राजकारणावर चर्चा होतेच. देशपातळीव काहीतरी बदल व्हायला हवा, या अनुषंगानेच ही भेट होती. देशाच्या ७५ वर्षांच्या स्वातंत्र्यानंतर ज्या गोष्टी घडायच्या होत्या त्या झाल्या नाहीत. म्हणूनच देशाच्या परिवर्तनासाठी युवा पिढीच्या माध्यमातून या गोष्टी घडाव्यात हा हेतू आहे. देशातील वातावरण खराब व्हायला नको. तसेच एक मजबुत हिंदुस्थान निर्माण व्हायला हवा असेही ते म्हणाले. महाराष्ट्रातून मोर्चा निघतो तो यशस्वी होतो असा आतापर्यंतचा इतिहास आहे. मग शिवछत्रपती असो वा बाळासाहेब ठाकरे असो. देशातील अन्याय, अवैध कामे, लोकशाही विरोधातील कामांना रोखण्यासाठी एक चांगली सुरूवात म्हणून आम्ही या भेटीकडे पाहत आहोत. उद्धवजींनी यापुढच्या काळात तेलंगणा येथे यावे असेही निमंत्रण त्यांनी यावेळी दिले. हे निमंत्रण तत्काळ उद्धव ठाकरेंनीही स्विकारले. महाराष्ट्रातून प्रेम घेतले असल्याचेही ते म्हणाले.

- Advertisement -

देशातील वातावरण दिवसागणिक गढूळ – उद्धव ठाकरे 

आजच्या भेटीतून आम्ही लपवण्यासाठी काहीही ठेवलेले नाही. आमची भेट ही देशात काही वातावरण दिवसागणिक गढूळ होते आहे त्यानिमित्ताने होती. एक सूडाचे राजकारण अतिशय खालच्या पातळीवर सुरू असल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. आमच हिंदुत्व बदला घेणार नाही. देशाला शेवटी भविष्य काय ? तसेच देशाच काय होईल ? हा विचार करायला पाहिजे होता, ती सुरूवात आम्ही करतो आहोत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. संपूर्ण देशात राज्य एकमेकांचा शेजारधर्म विसरली आहेत. अशावेळी राज्या राज्यात चांगल वातावरण रहायला हव अशा एक नव्या विचारांची सुरूवात आम्ही करत आहोत. राष्ट्रीय पातळीवर आघाडी निर्माण करण्याच्या विचाराला आकार उकाराला अवधी लागेल. पण ही प्रयत्नांची सुरूवात आहे. मेहनत करावी लागणार आहे. फक्त मूलभूत प्रश्नांना हात न लागता आरोप करायचे हा कारभार मोडायला हवा असेही ते म्हणाले.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. राष्ट्रीय पातळीवर भाजप विरोधी पक्षांची आघाडी तयार करण्यासाठी समविचार पक्षांची ताकद निर्माण करणे या अनुषंगानेच ही भेट घेण्यात आली. उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच के चंद्रशेखर राव यांना फोन करून भेटीचे निमंत्रण दिले होते. आज दोन्ही मुख्यमंत्र्यांमध्ये वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट झाली.

- Advertisement -

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकांच्या लेखातही राष्ट्रीय पातळीवर भाजपविरोधी आघाडी निर्माण करण्याचे या भेटीचे उदिष्ट असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीच्या निमित्ताने शिवसेनेतील बड्या नेत्यांची गर्दी याठिकाणी दिसून आली. त्यामध्ये प्रामुख्याने खासदार संजय राऊत, उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार अरविंद सावंत, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती.

राव हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला जाणार आहे. राव यांच्यासोबत अभिनेता प्रकाश राव यांच्यासोबतचे मोठे शिष्टमंडळ आहे. आजच्या भेटीत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुष्पगुच्छ देऊन के चंद्रशेखर राव यांचे स्वागत केले. त्यानंतर सोबत आलेल्या शिष्टमंडळातील व्यक्तींचेही स्वागत करण्यात आले.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -