घरमुंबईमोबाईलमुळे हात अडकला संडासच्या भांड्यात, फायर ब्रिगेडला बोलावलं!

मोबाईलमुळे हात अडकला संडासच्या भांड्यात, फायर ब्रिगेडला बोलावलं!

Subscribe

लोकांना उठता-बसता, चालता-बोलता मोबाईल लागतो. मोबाईलच्या याच व्यसनापाई 'त्याने' मोबाईल टॉयलेटमध्ये नेला आणि त्याचा हातच टॉयलेटमध्ये अडकला.

सध्या मोबाईल हा आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. लोकांना उठता-बसता, बोलता-चालता मोबाईल लागतो. मोबाईलवर लोकांचे इतके प्रेम आहे की, लोकं टॉयलेटला जाताना देखील मोबाईल सोबत घेऊन जातात. कित्येकदा लोकांची मोबाईलवर असणाऱ्या याच प्रेमापाई नको ती पंचाईत होते. अशीच घटना मुंबईच्या कुर्लामध्ये घडली आहे. कुर्ल्यात एका १९ वर्षीय मुलाचा हात टॉयलेटच्या भांड्यात अडकला आणि तोही मोबाईलमुळे. भांड्यात पडलेला मोबाईल बाहेर काढण्यासाठी त्याने आपला हात टाकला. परंतु, त्याचा हात टॉयलेटच्या भांड्यात फसला. तो हात निघावा यासाठी घरातल्यांपासून आजूबाजूच्या लोकांच्या नाकीनऊ आले. अखेर तो हात काढण्यासाठी फायर ब्रिगेडला बोलवावं लागलं.

काय आहे प्रकरण?

उत्तर प्रदेशच्या आजमगढमध्ये राहणारा रोहित राजभर हा १९ वर्षीय तरुण फिरण्यासाठी मुंबईमध्ये आपल्या काकांकडे आला आहे. त्याचे काका लालमणी वर्मा हे कुर्ल्याच्या विनोबा भावे नगरच्या गौरी शंकर सीएचएसमध्ये राहतात. रोहित सकाळी आठ वाजता काकांच्या घरातील टॉयलेटमध्ये मोबाईलचा वापर करत होता. दरम्यान, त्याचा मोबाईल हातातून निसटला आणि टॉयलेटच्या भांड्यात तो मोबाईल पडला. आपला मोबाईल काढण्यासाठी त्याने प्रयत्न सुरू केले. यासाठी त्याने हात टॉयलेटच्या भांड्यात टाकला. त्याच्या हातात कडं होतं. ते कडं त्या भांड्यात अडकलं आणि त्याचा हातही त्यात अडकला. त्याने खूप प्रयत्न करुनही तो हात बाहेर काढू शकला नाही. अखेर त्याने दुसऱ्या हाताने टॉयलेटचा दरवाजा उघडत घरच्यांना बोलावले.

- Advertisement -

अखेर अग्निशमन दलाला फोन लावला

घरच्यांकडूनही हात बाहेर येऊ शकला नाही. अखेर शेजारी राहणाऱ्या श्रीकृष्ण यादव यांनी अग्निशमन दलाला फोन लावला. अग्निशमन दलाची गाडी तातडीने घटनास्थळी पोहोचली आणि रोहितचा हात बाहेर काढण्यात त्यांना यश आले. अग्निशमनची गाडी आलेली बघून स्थानिक पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. परंतु, तोपर्यंत रोहितचा हात सुखरूप बाहेर काढण्यात आला होता. अग्निशमन दलाचे काही कर्मचारी आणि पोलीस अधिकारी रोहितला स्थानिक रुग्णालयात घेऊन गेले. दरम्यान, हात बाहेर काढण्याच्या गडबडीत त्याचा १४ हजारांचा स्मार्टफोन मात्र संडासमध्येच वाहून गेला!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -