घरमुंबईमेट्रो ३ कारशेड पुन्हा आरेत, जलयुक्त शिवारलाही गती

मेट्रो ३ कारशेड पुन्हा आरेत, जलयुक्त शिवारलाही गती

Subscribe

कार्यभार स्वीकारताच फडणवीसांची बॅटिंग सुरू

राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सायंकाळी मंत्रालयात पहिली कॅबिनेट घेतली. या कॅबिनेटमध्ये रखडलेल्या प्रकल्पांना चालना देण्याचा निर्णय घेत बॅटिंगला सुरुवात केली. यात प्रामुख्याने मेट्रो ३चा रखडलेला कारशेडचा प्रश्न मार्गी लावण्याचे आणि बंद झालेली जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू करण्याचे निर्देश अधिकार्‍यांना देण्यात आले.

मुंबईतील पत्रकार संघात आल्यावर एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजपचे पदाधिकारीही उपस्थित होते. यावेळी रखडलेल्या प्रकल्पांची गती वाढवणे हेच आपले उद्दिष्ट आहे. कॅबिनेटमधील जे रखडलेले विषय आहेत ते वेळेआधी पूर्ण करू. आता माजी मुख्यमंत्री फडणवीसही सोबत असल्याने बॅटिंग जोरदार होईल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

जलयुक्त शिवार, मेट्रोचे प्रकल्प आदींबाबतही कामे होणार आहेत. राज्यातील समाजघटकांसाठी आणि सर्वच क्षेत्राला न्याय देण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे. राज्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत. फडणवीसांचे अनुभव कामी येतील. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग राज्याचा गेमचेंजर ठरणार आहे, असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले.

मेट्रो ३चे (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) कारशेड पुन्हा आरे जंगलात नेण्यासाठी न्यायालयात सरकारतर्फे भूमिका मांडा, अशा सूचना फडणवीसांनी महाधिवक्त्यांना केल्याचे समजते. फडणवीस सरकार आरेतच कारशेड करण्यावर ठाम होते, परंतु उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर आरेतील कारशेड हलवून ते कांजूरला नेल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकार असा वाद सुरू झाला. हा वाद सध्या न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळेच फडणवीस पुन्हा सत्तेत कार्यरत झाल्याने त्यांनी सर्वात आधी मेट्रो ३च्या कारशेडचा प्रश्न सोडवण्यास प्राधान्य दिल्याचे यावरून दिसून येत आहे.

- Advertisement -

तर जलयुक्त शिवार योजना पुन्हा एकदा सुरू करण्याचेही निर्देश कॅबिनेटमध्ये देण्यात आले. या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा ठपका ठेवत ठाकरे सरकारकडून चौकशीचे आदेश देण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -