घरमुंबईमहापालिकेच्या टँकर जलभरणा केंद्रांवर तिसरा डोळा

महापालिकेच्या टँकर जलभरणा केंद्रांवर तिसरा डोळा

Subscribe

मुंबईकरांना होत असलेल्या धरणातील पाणीसाठा आता कमी झाल्याने शहरांत पाणीकपात लागू करण्यात आली आहे. या कपातीची झळ आता नागरिकांना बसू लागली आहे. महापालिकेच्या जलभरणांवरून खासगी टँकर माफिया पाणी भरून मुंबईकरांच्या पाण्याची लूट करतील, अशी भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे यावर महापालिका आता आधुनिकपद्धतीने नियंत्रण ठेवणार आहे. यासाठी महापालिकेच्या जलअभियंता विभागांतर्गत येणार्‍या सर्व टँकर जलभरणा केंद्रावर सी.सी.टि.व्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

मुंबईला सध्या होत असलेल्या पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना ऐन उकाड्यात पाण्याची तीव्र समस्या भासू लागली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या सर्व धरणांमधील पाणीसाठा कमी झाल्याने धरणांमधील राखीव साठ्यातील पाणी उचलून मुंबईकरांची तहान भागवण्याचा विचार महापालिकेच्यावतीने सुरु आहे. मुंबईतील पाणी समस्येचा फायदा टँकर माफियांकडून घेतला जात असल्याने या माफियांवर लगाम घालण्यासाठी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी मागील वर्षी महापालिकेच्या १८ जलभरणा केंद्रांवर सी.सी. टि.व्ही बसवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार महापालिकेच्या या टँकर जलभरणा केंद्रांवर सी.सी.टि.व्ही बसवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. महापालिकेच्या टँकरनाच याठिकाणी पाणी भरण्यास मुभा असून वेळप्रसंगी पाण्याची समस्या निर्माण झाल्याने खासगी सोसायट्यांनी टँकरची व्यवस्था केल्यास, त्या टँकरमध्ये पाणी भरण्यास परवानगी दिली जाते.

- Advertisement -

जलअभियंता तसेच उपायुक्त अशोक कुमार तवाडिया यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याला दुजोरा दिला आहे. १८ पैकी १६ केंद्रांवर नाईट व्हिजन सी.सी.टि.व्ही कॅमेरा बसवण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. यामध्ये टँकरचा वाहन नोंदणी क्रमांक, वाहनचालकाचा चेहरा आदींचे चित्रीकरण होणार आहे.

टँकर जलभरणा केंद्र म्हणजे काय?
महापालिकेच्यावतीने पुरवठा करण्यात येणारे पिण्याचे पाणी टँकरमध्ये भरण्याची सोय १८ ठिकाणी करण्यात आली आहे. याला टँकर जलभरणा केंद्र असे म्हटले जाते. या सर्व ठिकाणी जलमापक बसवण्यात आले आहेत. दररोज दिवसाच्या शेवटी या जलमापकांवर नोंद झालेला पाण्याचा वापर व दिवसभरात टँकर्समध्ये भरण्यात आलेले पाणी याचा ताळमेळ घालण्यात येतो. परंतु यामध्ये तफावत आढळून आल्यास संबंधित ठिकाणावरून वितरीत झालेल्या पाण्याबाबत चौकशी करण्यात येते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -