घरमुंबईलिगो प्रकल्प २०२५ मध्ये होणार पूर्ण

लिगो प्रकल्प २०२५ मध्ये होणार पूर्ण

Subscribe

लेजर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल-वेव ऑब्जर्वेटरी (लिगो) या महत्त्वाकांक्षी अशा प्रकल्पाचे काम २०२५ अखेरीस पूर्ण होईल, असा विश्वास वैज्ञानिकांनी व्यक्त केला आहे. जगातील तिसर्‍या लिगोची स्थापना महाराष्ट्रात होत आहे. हिंगोली जिल्ह्यातील औंध याठिकाणी या ऑब्जर्वेटरीचे काम सुरू आहे. भारतातील एकूण ३७ वैज्ञानिक या प्रकल्पासाठी काम करत आहेत, अशी माहिती या प्रकल्पाचा भाग असणारे वैज्ञानिक नवीन कुमार यांनी दिली. मुंबईत ८ मे पासून होणार्‍या मेगा सायन्स प्रदर्शनानिमित्त झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सध्या प्रकल्पाच्या ठिकाणी बांधकाम सुरू झाले आहे. त्यामुळे नियोजित अशा २०२५ पर्यंत महाराष्ट्रातील लिगोचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ठ्य पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास या प्रकल्पासाठी काम करणारे वैज्ञानिक नवीन कुमार यांनी व्यक्त केला. याआधीच २०१६ मध्ये महाराष्ट्र सरकारने या प्रकल्पासाठी जमीन उपलब्ध करून दिली होती.

- Advertisement -

आता या प्रकल्पासाठीचे काम सुरू झाले आहे. गुरूत्वाकर्षण लहरींशी संबंधित अभ्यासासाठी हा प्रकल्प महत्वाचा मानला जात आहे. यासाठी आता कटींग एज टेक्नॉलॉजीचा वापर झाल्यास या प्रकल्पातील काम आणखी वेगाने पुढे सरकण्यासाठी मदत होईल, असे त्यांनी सांगितले. भारतातील खगोलशास्त्रीय प्रकल्पासाठी महाराष्ट्रात होणारा प्रकल्प एक महत्वपूर्ण ठरेल. भौतिकशास्त्रामध्ये या प्रकल्पाचा नक्कीच फायदा होईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

चार शहरात प्रदर्शन
भारतातील पहिले असे मेगा सायन्स प्रदर्शन विज्ञान संगम हे ८ मे पासून मुंबईत नेहरू विज्ञान केंद्रातून प्रेक्षक आणि विज्ञानप्रेमींना पहायला उपलब्ध होणार आहे. त्यानंतर बंगळुरू, कोलकाता, नवी दिल्ली असा या प्रदर्शनाचा प्रवास असेल. जगभरात सुरू असणार्‍या मोठ्या (मेगा) वैज्ञानिक प्रकल्पात भारतातील वैज्ञानिकांचा समावेश असणार्‍या प्रकल्पांचा समावेश या प्रदर्शनात असेल. लार्ज हॅड्रॉन कोलायडर, इंडिया बेस न्युट्रिनो ऑब्झर्वेटरी, इंटरनॅशनल थर्मो न्युक्लिअर एक्सपिरीमेंटल रिएक्टर, लेजर इंफेरोमीटर ग्रॅव्हीटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी (लिगो), थर्टी मीटर टेलिस्कोप, स्केअर किलोमीटर एरे यासारख्या प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे.

- Advertisement -

या प्रकल्पाच्या माध्यमातून भारतीय वैज्ञानिक समुहाच योगदान विज्ञानप्रेमी, शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पटवून देणे हा उद्देश आहे. तसेच अधिकाधिक विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे आकर्षित करणे हादेखील उद्देश असल्याची माहिती केंद्रीय अणुऊर्जा आयोगाचे सचिव अरूण श्रीवास्तव यांनी दिली. चार शहरांचा प्रवास झाल्यानंतर हे प्रदर्शन कायमस्वरूपी दिल्ली येथे ठेवण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -