घरमुंबईगणेश नाईकांच्या भाजप प्रवेशावर भाजपमध्येच नाराजी!

गणेश नाईकांच्या भाजप प्रवेशावर भाजपमध्येच नाराजी!

Subscribe

नवी मुंबईमध्ये गणेश नाईक भाजपमध्ये प्रवेश करून राजकीय भूकंप घडवणार असल्याच्या चर्चा एकीकडे असतानाच आता त्यांच्या भाजप प्रवेशावर स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांच्यासह मोठ्या संख्येने त्यांचे कार्यकर्ते आणि नगरसेवक देखील भाजपमध्ये प्रवेश करणार यावर आता जवळजवळ शिक्कामोर्तब झालं आहे. त्याचसंदर्भात गणेश नाईक यांच्याकडून कोपरखैरणे इथल्या व्हाईट हाऊसमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केलं जात आहे. मात्र, असं असताना नवीन मुंबईतले भाजपचे पदाधिकारी मात्र नाईकांच्या भाजप प्रवेशावर नाराज झाल्याचं पाहायला मिळत आहे. बेलापूर विधानसभा मतदारसंघाचं विधानसभेत प्रतिनिधित्व करणाऱ्या मंदा म्हात्रे यांनी नाईकांच्या संभाव्य भाजप प्रवेशावर तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली आहे.

काय म्हणाल्या मंदा म्हात्रे?

भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी नाईक यांच्यावर तीव्र शब्दांमध्ये टीका करत या भाजप प्रवेशावर नाराजी व्यक्त केली. ‘ज्यांचं कुठे नाव राहिलेलं नाही, ज्यांचे उमेदवार ४० – ५० हजार मतांनी इथे पडले आहेत, ते त्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठीच भाजपमध्ये येत आहेत. त्यांच्या येण्यावर मी काय आक्षेप घेणार? हे सत्तेसाठी असं करत आहेत. सत्तेसाठीच ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. २०१४मध्येच ते भाजपमध्ये येत होते. पण राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांनी खो घातल्यामुळे तेव्हा ते राहिलं. पण आज ते सत्तेसाठीच येत आहेत. नाहीतर तसं भाजपवर त्यांचं काही प्रेम नाही’, अशी प्रतिक्रिया मंदा म्हात्रे यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना दिली. त्यामुळे नाईकांच्या संभाव्य भाजप प्रवेशावर स्थानिक भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज असल्याचंच दिसून येत आहे. यासंदर्भात रवींद्र चव्हाण यांनी तातडीनं मंदा म्हात्रे यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न केल्याचं देखील बोललं जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – राष्ट्रवादीचे नगरसेवक राजी तर गणेश नाईकांची नाराजी

५२ नगरसेवकही भाजपत प्रवेश करणार?

दरम्यान, सोमवारी आमदार संदीप नाईक यांच्या उपस्थितीत सीबीडी पारसिक हिलवर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची बैठक झाली. यामध्ये तब्बल ५२ नगरसेवक भाजप प्रवेशाच्या तयारीत असल्याचं समजतंय. तसेच, या नगरसेवकांनीही गणेश नाईक यांना आपल्यासोबत भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी गळ घातल्याचीही माहिती सूत्रांनी दिली. या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी गणेश नाईक कोपरखैरणे इथे जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहेत. याशिवाय, भाजप प्रवेशाचा अधिकृत निर्णय गणेश नाईक आज घेणार असून उद्या अर्थात बुधवारी भाजपमध्ये प्रवेश घेण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -