घरमुंबईमराठी शाळा वाचवण्यासाठी आता रंगमंचावर टाहो

मराठी शाळा वाचवण्यासाठी आता रंगमंचावर टाहो

Subscribe

‘मी मराठी शाळा बोलतेय’बालनाट्य सादर होणार

शाळा हा तसा अनेकांच्या उत्सुकतेचा विषय असतो. शाळा म्हटले की प्रत्येकजण आपल्या बालपणात रमत जातो. परंतु गेल्या काही वर्षामध्ये मुंबई, ठाणे, पुणे व नाशिक यासारख्या शहरांमध्ये मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या घटत्या संख्येमुळे मराठी शाळांची विद्यार्थ्यांविना दूरवस्था होत आहे. याकडे राज्य सरकारकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. परंतु मराठीतून शिक्षण घेण्याबाबत पालकांमध्ये असलेला न्यूनगंड, मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व, मातृभाषेतील शिक्षणामुळे होणारी व्यक्तीमत्व विकासातील वाढ यासारख्या बाबीवर भर देत मातृभाषेतून शिक्षण किती महत्त्वाचे आहे,

हे पटवून देण्यासाठी आता मराठी रंगमंचावर प्रथमच ‘मातृभाषेतून शिकू द्या, मराठी शाळा टिकू द्या’ या टॅगखाली ‘मी मराठी शाळा बोलतेय’ हे बालनाट्य येत आहे. मराठी रंगभूमीवर गाजलेल्या नाटकांचे लेखन व दिग्दर्शन करणारे रमेश वारंग हे बालनाट्य घेऊन येत आहेत. बालनाट्याच्या सरावाला 2 मेपासून सुरुवात होत आहे. छोट्या-मोठ्या शहरांमधील पालकांना मातृभाषेतून शिक्षण घेणे हे कमीपणाचे वाटते. तसेच मातृभाषेतून शिक्षण घेतल्यास नोकरीच्या संधी कमी असतात असा त्यांचा समज झाला आहे. त्यामुळे दशकभरापासून अनेक पालकांनी आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत घातले आहे. यामुळे शहरातील मराठी माध्यामांच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या संख्येत प्रचंड घट होऊन त्याचा परिणाम मराठी शाळांवर दिसू लागला आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक यासारख्या महानगरांबरोबरच काही छोट्या शहरातील मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडू लागल्या. परंतु इंग्रजी माध्यमांच्या शाळेत मुलांना टाकल्याने त्यांचे होत असलेले नुकसान काही पालकांच्या लक्षात येत असल्याने त्यांनी आपल्या पाल्यांना पुन्हा मराठी शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे.

- Advertisement -

इंग्रजी शाळांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांना तिसरा विषय म्हणून मराठी असतो. याचा परिणाम त्यांचा मराठीकडे दुर्लक्ष होते व त्यांना व्यवस्थित मराठीही येत नाही. मातृभाषेशी विद्यार्थ्यांचा फारसा संबंध येत नसल्याने त्याचा परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर होतो. शाळांमध्ये इंग्रजीमधून शिक्षण तर घरी मराठी वातवावरण यामुळे विद्यार्थ्यांचे एक ना धड अशी अवस्था होते. ही बाब लक्षात घेऊन नाट्य लेखक व दिग्दर्शक रमेश वारंग हे ‘मी मराठी शाळा बोलतेय’ हे बालनाट्य लवकरच मराठी रंगभूमीवर घेऊन येत आहेत. यामध्ये सरकारच्या उदासीनतेमुळे बंद पडत चाललेल्या मराठी शाळांची दयनीय अवस्था मांडण्याबरोबरच मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्त्वाने बजावलेली कामगिरीही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील शहरी भागातील मराठी शाळा बंद होत असल्या तरी ग्रामीण भागात सुरू असलेल्या मराठी शाळांमध्ये अनेक गुणवान विद्यार्थी घडत असल्याचे त्यांनी यातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत. ‘मी मराठी शाळा बोलतेय’ या बालनाट्यासाठी वारंग यांनी 2 मेपासून दादर, करीरोड किंवा बोरिवली या भागामध्ये कार्याशाळा घेणार आहेत. तसेच यासाठी त्यांनी मराठीमधून शिक्षण घेत असणार्‍या मुलांची निवड करणार आहेत. त्यामुळे मराठी माध्यमातून शिक्षण घेणार्‍या मुलांच्या पालकांनी आपल्या मुलाची बालनाट्यामध्ये निवड होण्यासाठी संपर्क करावा असे आवाहन रमेश वारंग यांनी केले आहे.

वारंग यांनी अनेक चांगली नाटके व बालनाट्य केली आहेत. त्यामुळे त्यांनी मराठी शाळांसदर्भात एखादे नाटक करावे असे मी त्यांना सुचवले. यावर त्यांनी आपल्याकडे यासंदर्भात अगोदरच एक संहिता तयार असल्याचे सांगितले. तसेच मराठी शाळांबाबत सकारात्मक बाबी व अनेक जिल्ह्यांमध्ये पालक आपल्या मुलांना इंग्रजी शाळांमधून मराठी शाळांमध्ये टाकत आहेत. याचा संदर्भ त्यांच्या नाट्यसंहितेत द्यावा अशा सूचना त्यांना केल्याचे मराठी शाळा वाचवण्यासाठी फेसबूकच्या माध्यमातून मोहीम राबवणार्‍या प्रसाद गोखले यांनी सांगितले.

- Advertisement -

रमेश वारंग यांनी केलेली नाटके
शकालाका बूमबूम, पॉकेमॉनच्या नगरीत, नेता आला रे, कोकणकन्या एक्स्प्रेस, प्रेमाच्या आधी, ब्रेकअपच्या नंतर, एक चावट मधूचंद्र, ही स्वामींची इच्छा, पब्जी गो बॅक यासह 50 बालनाट्य त्यांनी केली आहेत.

मराठीतील सिनेकलाकार उदासीन
लोकांना सतावणारा हा विषय आहे. मातृभाषेतून शिक्षणाकडे का दुर्लक्ष का? व मराठी शाळा बंद होत आहेत. याबाबत मराठी चित्रपटसृष्टीतील नामाकित सिनेनिर्माते सचिन पिळगावकर, महेश मांजरेकर, अवधूत गुप्ते व नागराज मंजुळे यांना आपण मराठी शाळा वाचवण्यासंदर्भातील विषयावर एखादे नाटक किंवा चित्रपट काढावा यासंदर्भात अनेकदा ईमेल व फेसबूकच्या माध्यमातून मेसेज केले होते. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे प्रसाद गोखले यांनी सांगितले.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -