घरमुंबईपोलीस ठाण्यासमोरच पेट्रोल ओतून व्यक्तीने पेटवून घेतले

पोलीस ठाण्यासमोरच पेट्रोल ओतून व्यक्तीने पेटवून घेतले

Subscribe

शिवाजीनगर पोलीस ठाण्यासमोरच मंगळवारी दुपारी एका ४४ वर्षांच्या व्यक्तीने स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत रिजवान अब्दुल हमीद जमादार हा ३० ते ३५ टक्के भाजला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. पार्किंग वादातून स्थानिक लोकांकडून होणार्‍या त्रासाविरुद्ध त्याने पोलिसांत तक्रार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याच्या तक्रारीला पोलिसांनी दाद दिली नाही. म्हणून त्याने स्वत:ला पेटवून घेतल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

त्रास देणार्‍यांविरुद्ध पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नाही म्हणून पेटविले

रिझवान हा गोवंडीतील बैंगनवाडी परिसरात पत्नी आणि चार मुलांसोबत राहतो. याच परिसरात त्याचा पार्किंगचा व्यवसाय आहे. रिक्षांची देखभालीसाठी तो चालकांकडे पैसे घेत होता. याच पार्किंग वादातून त्याचे स्थानिक लोकांशी वाद सुरु होता. अनेकदा त्याच्याविरुद्ध त्यांनी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली होती. काही महिन्यांपासून हा वाद विकोपास गेला होता. त्यातूनच त्याला काही लोकांकडून सतत जिवे मारण्याची धमकी येत होती. या धमकीला कंटाळून मंगळवारी रिजवान हा पोलीस ठाण्यात गेला होता. त्यांनी त्रास देणार्‍यासह धमकी देणार्‍या व्यक्तींविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या तक्रारीकडे पोलिसांनी विशेष लक्ष दिले नाही. त्याला बराच वेळ पोलीस ठाण्यात बसून ठेवण्यात आले. त्यानंतर त्याला तेथून जाण्यास सांगण्यात आले. त्याचा राग आल्याने रिजवान हा पोलीस ठाण्यातून निघून गेला.

- Advertisement -

भाजलेल्या व्यक्तीवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु

काही वेळाने तो पेट्रोल घेऊन पुन्हा पोलीस ठाण्यात आला. त्याने पेट्रोल स्वत:च्या अंगावर ओतून पेटवून घेतले. अचानक घडलेल्या या प्रकाराने तिथे उपस्थित पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली होती. आग विझवून त्याला पोलिसांनी तातडीने जवळच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले होते. आगीत रिजवान हा ३० ते ३५ टक्के भाजला असून त्याच्यावर तिथे उपचार सुरु आहे. या संपूर्ण घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेत शिवाजीनगर पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहे. लवकरच रिजवानची पोलिसांकडून जबानी नोंदविण्यात येणार आहे. तसेच त्याच्या पत्नीसह भावाला चौकशीसाठी बोलाविण्यात आले आहे. रिजवानची तक्रार नोंदविण्यात पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप होत आहे. त्यातून त्याने स्वत:ला पेटवून घेतले. त्यामुळे दोषी पोलिसांवर लवकरच कारवाई होण्याचे संकेत वरिष्ठांकडून देण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -