घरमुंबईअन सौभाग्याचे लेणं परत मिळालं

अन सौभाग्याचे लेणं परत मिळालं

Subscribe

त्या महिलेने केले पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक

मंगळसूत्र म्हणजे सौभाग्याचे लेणं..अन ते परत मिळालं तर महिलेचा आनंद गगनात मावेनासा होतो. असाच एक प्रकार कल्याणात घडला आहे. रोहिणी देवडीकर या महिलेचे मंगळसू़त्र हिसकावून पळणार्‍या चोरट्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्या चोरट्याकडून मंगळसूत्र व इतर वस्तूही पोलिसांनी हस्तगत केल्या असून शुक्रवारी पोलिसांनी रोहिणी यांना परत केल्या. मंगळसूत्र मिळाल्याने त्यांच्या चेहर्‍यावर आनंद पसरला. अखेर त्या महिलेने विद्यार्थ्यांसह पोलीस ठाण्यातच बाजारपेठ पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करीत त्यांचा जाहीर सत्कार केला.

कल्याण पश्चिम येथे राहणार्‍या रोहिणी देवडीकर या 27 जून रोजी सकाळी 5.30 च्या सुमारास टिळक चौकातून नेहमीप्रमाणे शिकवणी घेण्यासाठी जात होत्या. टिळक चौक जवळील रस्त्याने पायी चालत जात असतानाच एका दुचाकीस्वाराने त्यांना धक्का देत त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, सात हजार रोख आणि मोबाईल असलेली पर्स हिसकावून पळ काढला. त्यांनी आरडाओरड केली, पण चोरटे दुचाकीवरून पळून गेले. हा प्रकार सीसी कॅमेर्‍यात कैद झाला होता. याप्रकरणी देवडीकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी या गुन्ह्याचा छाडा लावीत चोरट्यांकडून मंगळसूत्र इतर वस्तू हस्तगत करण्यात यश मिळवले. पोलिसांनी न्यायालयीन प्रक्रिया जलदगतीने करून देवडीकर यांना लाख मोलाचे मंगळसूत्र आणि इतर वस्तू परत केल्याने त्यांनी पोलिसांचे आभार मानले. अशा पोलीस अधिकार्‍यांच्या कर्तव्यदक्षतेचा योग्य तो सन्मान व्हावा व पुढच्या पिढीच्या समोर पोलिसांची प्रतिमा उंचावली जावी व त्यांचा आदर्श ठेवला जावा यासाठी रोहिणी देवडीकर यांनी विद्यार्थ्यांसह बाजारपेठ पोलिसांना भेट वस्तू देत सत्कार केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -