घरमुंबईसांताक्रूझ - चेंबूर लिंक रोडवर झालेल्या हत्येप्रकरणी दोघांना अटक

सांताक्रूझ – चेंबूर लिंक रोडवर झालेल्या हत्येप्रकरणी दोघांना अटक

Subscribe

कुर्ल्यातील सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड येथे एका तरुणाच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

कुर्ल्यातील सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड उड्डाण पुलावर पहाटेच्या सुमारास झालेल्या एका तरुणाच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखेने कक्ष ५च्या पथकाने एका १३ वर्षाच्या मुलासह दोघांना अटक केली आहे. सराईत गुन्हेगार असणाऱ्या या दोघांनी चोरीच्या कारणावरून ही हत्या केली असल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. २४ तास वाहनांची वर्दळ असणाऱ्या सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड उड्डाण पुलावर घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडवून दिली होती. मोहम्मद सादिक मोहंम्मद अली शेख (१८) अल्पवयीन (१३) या दोघांना शिवाजी नगर, गोवंडी येथून गुरुवारी अटक करण्यात आली आहे. या दोघांविरुद्ध शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

नेमके काय घडले?

कुर्ला पश्चिम येथील हलाव पूल येथे राहणारा हरिशंकर यादव (२४) याचा भाऊ रमाशंकर (२३) हा आठवड्याभरापूर्वीच उत्तरप्रदेशातून मुंबईत आला होता. १८ मार्च रोजी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास रमाशंकर हा जखमी अवस्थेत विनोबा भावे नगर पोलिसांना सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड उड्डाण पुलाजवळ मिळून आला होता. दरम्यान पोलिसांनी त्याला उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले होते.

- Advertisement -

रमाशंकर आणि हरिशंकर या दोघांना गावी जायचे असल्यामुळे ट्रेनचे तिकिटाचे आरक्षण करण्यासाठी रमाशंकर हा १८ मार्च रोजी पहाटे ५ वाजता घरातून बाहेर पडला होता. लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिकीट काढण्यासाठी तो सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड उड्डाणपुलावरून एकटाच चालत निघाला होता. काही अंतरावर जाताच त्याच्या समोर एका मोटारसायकलवरून दोघेजण आले आणि त्यांनी रमाशंकर वाटेत अडवून त्याचेकडे पैशाची मागणी केली. मात्र रामशंकरने त्यांना विरोध केला असता दोंघांनी त्याला मारहाण करून १३ वर्षाच्या आरोपीने स्वतजवळील चाकू रमाशंकरच्या पोटात भोसकुन त्याच्याजवळील असलेली पिशवी घेऊन तेथून फरार झाले.

खळबळजनक घटना

वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या हत्येमुळे परिसरात एकच खळबळ होती. या हत्येप्रकरणी विनोबा भावे नगर पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून मारेकऱ्यांचा शोध सुरु केला होता. या हत्येचा संलग्न तपास गुन्हे शाखा कक्ष ५ करीत होते. कक्ष ५चे प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक खोत, पो.नि योगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु असताना या हत्येच्या गुन्हयातील आरोपी गोवंडी शिवाजी नगर परिसरात राहत असल्याची माहिती कक्ष ५च्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव, सुरेखा जोंजाळ, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पाटील, महेंद्र बंडगर, यादव, अंमलदार परब, सावंत, मुलानी, घागरे, विचारे आणि वंजारे आदी पथकाने खबऱ्याच्या मार्फत या दोघांची माहिती मिळवून गुरुवारी दोघांना शिवाजी नगर परिसरातून अटक केली. दोघांकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली अशी माहिती पोलीस उपायुक्त दिलीप सावंत यांनी पत्रकाराना दिली. अटक करण्यात आलेले दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर शिवाजी नगर, मानखुर्द पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्याची नोंद आहे.

- Advertisement -

सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड असुरक्षित

पूर्व उपनगरीतून पश्चिम उपनगराला जोडणारा सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड हा महत्वाचा मार्ग असून येथून दररोज हजारो वाहने ये जा करतात. मात्र या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले नाही, तसेच या उड्डाणपुलावर एकही वाहतूक अथवा स्थानिक पोलीस दिसून येत नाही. त्यातच शिवाजी नगरला जाण्यासाठी गोवंडीतील रिक्षाचालकांनी अनधिकृत रिक्षा आणि टॅक्सी स्टँड तयार केला आहे. त्यातील अनेक रिक्षा चालक गुन्हेगारी प्रवुर्तीचे आहे. ज्या ठिकाणी हत्येची घटना घडली त्या ठिकाणीच हे रिक्षा चालक उभे राहून प्रवाशांची वाट पहात असतात अशी माहिती स्थानिकानी दिली. मात्र पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेऊन या रिक्षाचालकांवर कुठल्याही प्रकारची कारवाई करीत नसल्याचा आरोप स्थनिकांनी केला आहे.


वाचा – श्रीमंतांच्या घरात सराईतपणे चोऱ्या करणाऱ्या मोलकरणीला अटक

वाचा – दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -