घरमुंबईठाण्यात भाडोत्रींची पोलीस पडताळणी बंधनकारक

ठाण्यात भाडोत्रींची पोलीस पडताळणी बंधनकारक

Subscribe

मेगासिटी असलेल्या मुंबईच्या वेशिलगत असलेल्या ठाणे शहरात झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्या सोबतच वाढती भाडोत्र्यांची संख्या विलक्षण आहे. या भाडोत्र्यांना इच्छितस्थळी खोली मिळवून देण्याच्या एजंटाच्या धंद्याला सुगीचे दिवस आले आहेत. त्यामुळे एजंटाची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. मुंबईतील घराचे भाडे परवडणारे नसल्याने अनेकांनी ठाण्यात धाव घेतली. ठाण्याच्या लोकसंख्येपैकी २५ टक्के घरात भाडोत्री राहत आहेत. या भाड्यांच्या घरात राहणारी कुटुंबाची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक आहे. यामुळे पोलिसांना कुठल्या विभागात कोण भाड्याने राहतो याचा शोध घेणे सोपे जाईल. मात्र भाडोत्रींची माहिती न दिल्याने आणि भाडोत्री गुन्हा करून परागंदा झाल्यास तो पोलिसांच्या डोक्याला ताप ठरतो.

ठाण्यात एकूण घरांच्या संख्येपैकी तब्बल २५ टक्के घरात भाडेकरू

मुंबई सारख्या महानगरात गगनाला भिडलेले जागेचे भाव आणि त्यामुळे वाढलेले घरभाडे या दोन्ही कारणांमुळे मुंबईत सर्वसामान्यांना निवारा शोधणे म्हणजे एक अवघड बाब झाली आहे. त्यामुळे मुंबईला पर्याय म्हणून म्हणा, किंवा ठाण्याचे सुसंस्कृत वातावरण म्हणा, पण मध्यमवर्गीय नागरिकांची प्रथम पसंती ही ठाण्यालाच असते. म्हणून ठाण्यात हक्काचे घर घेणाऱ्यांबरोबरच भाड्याने घर घेवून राहणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्याच बरोबर मुंबईत पोटापाण्याच्या सोयीसाठी येणारे हजारोंच्या संख्येचे परप्रांतीय लोंढे देखील ठाण्यात मोठ्या प्रमाणात दिवसागणिक स्थायिक होतात. या साऱ्यांचा परिणाम म्हणजे ठाण्यात एकूण घरांच्या संख्येपैकी तब्बल २५ टक्के घरात भाडेकरू राहत असल्याची माहिती ठाणे रियल स्टेट एजंट असोशिएशनच्या सूत्रांनी दिली. ठाण्यात सर्वाधिक महागडे घरांचे भाडे हे वसंतविहार, मेडोज, हिरानंदानी, घोडबंदर रोड या परिसरात असून येथे दरमहा १५ हजारच्या भाड्यापासून तर लाख-दीड लाखाच्या घरात भाडे असणारी घरे उपलब्ध आहेत. ठाण्यात सर्वाधिक कमी भाडे हे लोकमान्य नगर, सावरकरनगर, इंदिरानगर, वागळे स्टेट, कोपरी कोळीवाडा या चाळीने वेढलेल्या भागात आहे. या भागात दरमहा ४ हजारापासून तर १०-१५ हजार रुपयांपर्यंत भाड्याची घरे उपलब्ध आहेत.

- Advertisement -

ठाण्यात ३ हजारापेक्षा जास्त एजंट

ठाण्यात सुमारे ३ हजारावर इस्टेट एजंट कार्यरत असून बहुतांश रियल इस्टेटचा व्यवसाय हा याच स्टेट एजंटच्या माध्यमातून होत असतो. या रियल इस्टेट एजंटच्या व्यवसायात काळानुरूप बदल घडवून आधुनिक पद्धतीने व्यवसायाची सांगड घालण्यावर आम्ही संघटनेच्या माध्यमातून भर देत आहोत. रियल स्टेट एजंट हा व्यावसायिक आणि निवारा शोधणारा सामान्य नागरिक यातील दुवा असल्याकारणाने आमचे रियल स्टेट एजंट देखील त्यांचे जबाबदारीचे भान जाणून कार्यरत असतात. व्यावसाईकाबरोबरच सर्वसामान्य लोकांच्या हिताच्या दृष्टने कार्यरत राहणे यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील असल्याचे ठाणे रियल स्टेट एजंट असोशिएशनचे माजी अध्यक्ष शंकर धर्माधिकारी यांनी सांगितले.

चाळमाफियांकडून अनधिकृत चाळींचे साम्राज्य

ठाणे महापालिका परिसरात पाच हजाराहून अधिक हेक्टर जागा वनविभाग, शासकीय, आरक्षित, तसेच आदिवासी जागा होत्या. भूमिपुत्रांना धमकावून आणि शासकीय बांबूना हाताशी धरुन, येथे चाळमाफियांनी अनधिकृत चाळींचे साम्राज्य उभे केले आहे. धक्कादायक म्हणजे, चाळमाफियांनी या भागात मोठ-मोठे डोंगर पोखरले आहेत. नैसर्गिक नाले मातीचा भराव टाकून बंद करण्यात आले आहेत. डोंगर पोखरुन राजरोसपणे चाळींची बांधकामे सुरुच आहेत. हे चाळ माफिया रातोरात चाळ उभी करून त्यात मोठ्या संख्येने परप्रांतीय भाडेकरू ठेवतात. या चाळींची शासन दप्तरी कुठेही नोंद होत नसल्याने अशा अनधिकृत चाळीत राहणाऱ्या भाडेकरूंची माहिती देखील पोलीस आणि प्रशासनापासून अनभिज्ञ ठेवली जाते.

- Advertisement -

भाडोत्र्यांच्या नोंदीसाठी ऑनलाईन सुविधा

ठाणे शहरात स्थलांतरितांंची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दिवसागणिक ही संख्या वाढतच आहे. दरम्यान, सांस्कृतिक आणि स्मार्ट सिटीचे शहर गुन्हेगारांच्या हिट लिस्टवर आहे. त्यामुळे पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने भाडेकरूंची नोंदणी बंधनकारक केली आहे. भाड्याने राहणार्‍या नागरिकांनाही अनेक कामांसाठी ही नोंदणी उपयुक्त ठरते. यापूर्वी ही नोंदणी पोलीस ठाण्यात जाऊन करावी लागत असे. परंतु वेळ वाचावा, यासाठी पोलिसांनी आता भाडेकरूंच्या नोंदणीसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध केली आहे. नागरिकांना घरबसल्या भाडेकरू नोंदणी करता येते. भाडेकरूंची माहिती पोलिसांपासून लपवल्यास घरमालकावर कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -