घरमुंबईअतिक्रमण विभागावर दहशत कोणाची?

अतिक्रमण विभागावर दहशत कोणाची?

Subscribe

अतिक्रमणांवर गदा येऊ नये म्हणून काही अतिक्रमण माफिया आपापल्या परीने पालिकेच्या अतिक्रमण विभागावर नियंत्रण ठेऊन आहेत. तर काहींनी हा विभागच आपल्या खिशात ठेवला आहे.

अतिक्रमण हा प्रकार शहराला लागलेला कलंक असला तरी त्यामुळे अनेकांचे खिसे गरम होत आहेत. त्यामुळे अतिक्रमणांवर गदा येऊ नये म्हणून काही अतिक्रमण माफिया आपापल्या परीने पालिकेच्या अतिक्रमण विभागावर नियंत्रण ठेऊन आहेत. तर काहींनी हा विभागच आपल्या खिशात ठेवला आहे. त्यामुळे कितीही सक्षम अधिकारी आला अथवा अतिक्रमणाविरुद्ध आवाज उठवला तरी त्याकडे दुर्लक्ष होत आहे. अतिक्रमण माफियांच्या तालावर मनपाचा अतिक्रमणविरोधी विभाग नाचताना दिसत आहे.

कुंपणच शेत खातंय?

शनिवारी झालेल्या स्थायी समिती सभेत दैनंदिन बाजारासाठी लागणार्‍या भूखंडाचा प्रस्ताव मंजुरीसाठी आला असता स्थायी समिती सदस्यांनी शहरातील वाढत्या अनधिकृत फेरीवाल्यांवरून प्रशासनाला धारेवर धरले. त्यावर उपस्थित मनपा आयुक्तांनी कारवाईचे आदेश दिले. मात्र ते किती अंमलात येतील हे वेळच ठरवणार आहे. मनपाचा स्वतंत्र अतिक्रमण विभाग आहे. त्या विभागाचे जे उपायुक्त आहेत त्यांच्या घराजवळच हॉटेलधारकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. त्यात स्थानिक नगरसेवक संदीप सुतार यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याने त्यावर कारवाई होण्यास विभागाकडून चालढकल होत आहे. जर कुंपणच शेत खात असेल तर बाकी ठिकाणी काय होणार अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

- Advertisement -

पालिका, सिडको हतबल

प्रत्येक विभाग कार्यालयात स्वतंत्र अतिक्रमण विभाग असून त्या विभागावर करोडो रुपये खर्च करण्यात येतात. मात्र तो विभाग गोरगरीब फेरीवाले आणि रस्त्यावरील पोस्टरवरच आपला धाक ठेऊन आहे. शहरातील नेरूळ व वाशी हे मोठे नोड असल्याने या ठिकाणी रहदारीही मोठ्या प्रमाणात आहे. त्याच ठिकाणी अतिक्रमण माफिया फोफावल्याने पालिका व सिडकोसह इतर प्रशासकीय यंत्रणा हतबल झाले आहेत. नेरूळ रेल्वे स्थानकाच्या पूर्व व पश्चिम भागात तर फेरीवाल्यांनी कहरच केल्याने या ठिकाणी येणार्‍या जाणार्‍या नागरिकांना व वाहन धारकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

फेरीवाल्यांवर कुणाचा वरदहस्त?

स्टेशनच्या पूर्व भागात रेल्वे स्थानकालगत फेरीवाल्यांनी रस्त्यावरच व्यवसाय मांडला आहे. त्या फेरीवाल्यांचे प्रतिनिधित्व एक मुस्लीम युवक करत असल्याचे समजले आहे. तर त्या व्यतिरिक्त पश्चिम भागात असलेल्या अनेक फेरीवाल्यांवर स्थानिक प्रकल्पग्रस्त तरुणांचा वरदहस्त असल्याने त्यांची दहशत त्या ठिकाणी आहे.त्यामुळे या भागात फेरीवाले मोठ्या प्रमाणात फोफावले असून पालिका,सिडको कारवाई करण्यास घाबरत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर सानपाडा ते वाशी रेल्वे स्थानकाच्या परिसरातही फेरीवाल्यांनी दहशत माजवली असून त्यांच्यावरही स्थानिक नेत्यांचा हात असल्याचे सांगण्यात येत आहे.

शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत फेरीवाले वाढले असतील तर त्यावर उपाय योजना करण्यात येतील. त्यांच्याकडेच प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणत होत असल्याने त्यावरही लक्ष ठेवण्यात येईल. सर्व विभागांना त्यांच्या विभागातील अनधिकृत फेरीवाल्यांवर तातडीने कारवाई करण्याचे सूचित करण्यात आले आहे. यात जो कामचुकारपणा करेल त्या अधिकार्‍यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

रमेश चव्हाण, उपायुक्त, नवी मुंबई

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -