घरमुंबईविद्यापीठ प्रशासन ढिम्म, निकालांवर परिणाम

विद्यापीठ प्रशासन ढिम्म, निकालांवर परिणाम

Subscribe

प्राध्यापक = २०००, पेपर तपासणी = ०

सौरभ शर्मा

मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षांच्या निकालासाठी सध्या परीक्षा व मूल्यमापन विभागाने आपले सर्वस्व पणाला लावले असताना, यंदाही सुमारे दोन हजार प्राध्यापकांनी एकही पेपर तपासला नसल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. प्राध्यापकांच्या या शून्य पेपर तपासणीमुळे विद्यापीठाच्या पेपर तपासणीच्या कामावर परिणाम झाला असल्याची माहिती परीक्षा विभागातील सूत्रांनी दिली. दरम्यान, या शून्य पेपर तपासणी करणार्‍या शिक्षकांवर कारवाई करण्यासंदर्भात सध्या परीक्षा विभागाचा विचार सुरु असल्याची माहिती यानिमित्ताने ‘आपलं महानगर’ला समजली आहे.

- Advertisement -

मुंबई विद्यापीठाने गेल्या वर्षीपासून सरसकट सर्व अभ्यासक्रमांच्या पेपर तपासणीसाठी ऑनलाइन मूल्यांकन ही पद्धत सुरु केली. या ऑनलाइन मूल्यांकन करण्यासाठीचे कंत्राट मेरिट ट्रॅक या कंपनीला देण्यात आले. सरसकट सर्व अभ्यासक्रमासाठी ही पद्धत सुरु केल्याने सुरुवातीपासूनच ऑनलाइन मूल्यांकन प्रणाली वादाच्या भोवर्‍यात अडकली. तर ऑनलाइन मूल्यांकनाच्या प्रक्रियेतील घोळामुळे निकालात गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे अनेकांचे शैक्षणिक भवितव्यही धोक्यात आल्याने विद्यापीठावर बरीच टीकादेखील झाली होती. अनेक प्राध्यापकांनी या प्रक्रियेला विरोधही केला. त्यामुळे ऑनलाइन पेपर तपासणी नेहमीच चर्चेचा विषय ठरला होता. मात्र यंदाही विद्यापीठाने ऑनलाइन मूल्यांकनाचा निर्णय कायम ठेवल्याने सर्वांचे लक्ष निकालाच्या घोषणेकडे लागून राहिले. यासाठी परीक्षा विभागाने कंबर कसली असून, विभागाने विविध कल्पना लढवत या प्रक्रियेत बदल केले. त्याचबरोबर प्राध्यापकांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले. इतकेच नव्हे, तर या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी कॉलेज प्राचार्यांना डॅशबोर्डचे लॉगिनदेखील दिले. मात्र त्यानंतरही अनेक प्राध्यापकांनी एकही पेपर तपासला नसल्याची माहिती समोर आली आहे. जवळपास दोन हजार प्राध्यापकांनी एकही पेपर तपासणी केली नसल्याचे कळते. हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर या दोन हजार प्राध्यापकांमध्ये विद्यापीठातील विविध विभागातील विभागप्रमुख आणि प्राचार्यांचा बहुतांश समावेश आहे.

दरम्यान, यासंदर्भातील एक अहवाल बनविण्याचे काम सुरु असून, हा अहवाल लवकरच नवनियुक्त कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहिती हाती आली आहे. शून्य पेपर तपासणी करणार्‍या प्राध्यापकांची अंतिम यादी तयार झाल्यानंतर या प्राध्यापकांना नोटीस पाठविण्यात येणार आहे. यातील काही प्राध्यापकांनी गेल्यावर्षी एकही पेपर तपासला नव्हता. त्यामुळे या प्राध्यापकांना परीक्षा व मूल्यमापन विभागाकडून सुनावणीसाठी बोलविण्यात येणार असल्याचे कळते. शून्य पेपर तपासणी ही अत्यंत गंभीर बाब असून, हा प्रकार इतर प्राध्यापकांवर अन्यायकारक असल्याची चर्चा विद्यापीठात सुरु झाली आहे. यासंदर्भात मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. अर्जुन घाटुळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होवू शकलेला नाही.

- Advertisement -

सध्या निकाल वेळेवर लावणे ही विद्यापीठ आणि प्राध्यापकांची प्राथमिकता आहे. यासाठी परीक्षा व मूल्यमापन विभागाची जय्यत तयारी सुरु असून, जर काही प्राध्यापक पेपर तपासणी करीत नसतील तर ही गंभीर बाब आहे. गेल्यावर्षी हा प्रकार घडला होता. मात्र त्यावेळी विद्यापीठाने कोणतीही कारवाई न केल्याने ही वेळ पुन्हा आली आहे. त्यावेळी जर कारवाई केली असती, तर आज इतक्या मोठ्या प्रमाणात शून्य पेपर तपासणी करणार्‍या प्राध्यापकांची संख्या वाढली नसती. त्यामुळे यंदा मात्र परीक्षा व मूल्यमापन विभागाने योग्य ती कारवाई करावी. यासाठी आम्ही लवकरच कुलगुरुंची भेट घेणार आहोत. – सुधाकर तांबोळी, सिनेट सदस्य, मुंबई विद्यापीठ

आकडेवारी
विद्यापीठामार्फत घेण्यात येत असलेल्या एकूण परीक्षा – ४०२
परीक्षा देणारे एकूण विद्यार्थी – ४ लाखांहून अधिक (परीक्षा सुरु)
पेपर तपासणीसाठी नोंदणी झालेले प्राध्यापक – १२ हजाराहून अधिक
एकूण उत्तर पत्रिका -१५ लाख ३८ हजार (परीक्षा सुरु)

नियमावली नाही
मुंबई विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयातील एकूण विद्यार्थी क्षमतेच्या दीड पट पेपर तपासणी करावी, असा नियम आहे. पण प्राध्यापकांनी नेमकी किती पेपर तपासणी करावी, अशी कोणतीही नियमावली नाही. पण तपासणीची गुणवत्ता टिकून राहावी, यासाठी दिवसाला ३० उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करणे सोयीचे असल्याची माहिती पेपर तपासणी करणार्‍या प्राध्यापकांकडून देण्यात आली आहे.

असे आहे मानधनाचे गणित
मुंबई विद्यापीठाने गेल्यावर्षीपासून पेपर तपासणीच्या मानधनात महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. या बदलानुसार पदवी अभ्यासक्रमाच्या १०० गुणांच्या उत्तरपत्रिकेच्या तपासणीसाठी १६ रुपये, ७५ ते ८० गुणांच्या उत्तरपत्रिकेसाठी १६ रुपये आणि ४० ते ६० गुणांच्या उत्तरपत्रिकेच्या मूल्यांकनासाठी ८ रुपये असे मानधन दिले जाते. तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पेपर तपासणीसाठी अनुक्रमे २०, २० आणि १० रुपये मानधन दिले जाते.

काय आहे प्राध्यापकांचे म्हणणे
पेपर तपासणीसाठी बर्‍याच कॉलेजांमध्ये कॅप सेंटर नाही. तर अनेक प्राध्यापकांना पेपर तपासणीसाठी कलिना कॅम्पस येथील कॅप सेंटर येथे जावे लागते. त्यामुळे बराच वेळ वाया जातो, कॉलेजांतील काम पूर्ण करुन याठिकाणी जाणे फारच त्रासदायक ठरते. त्यामुळे पेपर तपासणीसाठी जाणे टाळले जाते. तर कोकणातील ग्रामीण भागातील ज्या कॉलेजांमध्ये कॅप सेंटर आहेत, त्यातील बहुतांशी कॉलेजांमध्ये इंटरनेट सेवेची अडचण असल्याने पेपर तपासणीच्या कामासाठी अडथळा येतो. तर अनेक कॉलेजांमध्ये मान्यताप्राप्त प्राध्यापक नसल्याने कंत्राटी प्राध्यापक पेपर तपासणीसाठी पुढे जाणे टाळतात. तर विद्यापीठाला प्राध्यापकांवर कारवाई करु शकत नसल्याने अनेकजण टाळाटाळ करीत असल्याचे कळते.

सध्या उन्हाळी सत्र परीक्षांचे निकाल लावणे ही आमची प्राथमिकता आहे. निकालाचे काम पूर्ण झाल्यानंतर याबाबती सविस्तर माहिती घेतली जाईल. – डॉ. अर्जुन घाटुळे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन विभाग

काय आहे प्राध्यापकांचे म्हणणे
पेपर तपासणीसाठी बर्‍याच कॉलेजांमध्ये कॅप सेंटर नाही. तर अनेक प्राध्यापकांना पेपर तपासणीसाठी कलिना कॅम्पस येथील कॅप सेंटर येथे जावे लागते. त्यामुळे बर्‍याच वेळ वाया जातो, कॉलेजांतील काम पूर्ण करुन याठिकाणी जाणे फारच त्रासदायक ठरते. त्यामुळे पेपर तपासणीसाठी जाणे टाळले जाते. तर कोकणातील ग्रामीण भागातील ज्या कॉलेजांमध्ये कॅप सेंटर आहेत, त्यातील बहुतांशी कॉलेजांमध्ये इंटरनेट सेवेची अडचण असल्याने पेपर तपासणीच्या कामासाठी अडथळा येतो. तर अनेक कॉलेजांमध्ये मान्यताप्राप्त प्राध्यापक नसल्याने कंत्राटी प्राध्यापक पेपर तपासणीसाठी पुढे जाणे टाळतात. तर विद्यापीठाला प्राध्यापकांवर कारवाई करु शकत नसल्याने अनेकजण टाळाटाळ करीत असल्याचे कळते.

सध्या उन्हाळी सत्र परीक्षांचे निकाल लावणे ही आमची प्राथमिकता आहे. निकालाचे काम पूर्ण झाल्यानंतर याबाबती सविस्तर माहिती घेतली जाईल. – डॉ. अर्जुन घाटुळे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन विभाग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -