घरमुंबईराष्ट्रवादी काँग्रेसकडून मनसेला कल्याण डोंबिवलीची जागा?

राष्ट्रवादी काँग्रेसकडून मनसेला कल्याण डोंबिवलीची जागा?

Subscribe

आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीत मनसेला घेण्यासंबंधी राष्ट्रवादीचे नेते इच्छुक आहेत, हे आता लपून राहिलेले नाही. त्यातच आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईत झालेल्या बैठकीनंतर प्रफुल पटेल आणि अजित पवार यांनी मनसेला सोबत घेण्याचा पुन्हा एकदा बोलून दाखवले. तसेच मनसेला सोबत घेण्याबाबत काँग्रेसशी चर्चा करणार असल्याचेही अजित पवार यावेळी म्हणाले. मात्र मनसेला सोबत घेतले तर त्यांना मतदारसंघ कोणता सोडायचा? हा देखील एक प्रश्न आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेला कल्याण डोंबिवली हा मतदारसंघ मनसेला मिळू शकतो, अशी माहिती मिळत आहे.

कल्याण-डोंबिवली मतदारसंघात २००९ साली आनंद परांजपे शिवसेनेकडून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे २०१४ साली हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आला. मात्र मोदीलाटेत कल्याण-डोबिंवलीच्या जागेवर ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे निवडूण आले. या मतदारसंघात मनसेचीही बऱ्यापैकी ताकद आहे. कल्याण-डोंबिवली हे शहर राज ठाकरेंच्या आवडीचे शहर मानले जाते. २०१४ च्या निवडणुकीनंतर आनंद परांजपे लोकसभा लढवतील की नाही? याबाबत संभ्रमावस्था होती.

- Advertisement -
हे वाचा – अजित पवारांनी घेतली राज ठाकरेंची भेट; दीड तास चर्चा रंगली 

आनंद परांजपे यांच्याकडे सध्या ठाणे शहराध्यक्षपदाची जबाबदारी आहे. ठाणे शहरात त्यांनी संघटनात्मक पातळीवर चांगले काम सुरु केले आहे. पुन्हा कल्याण-डोंबिवलीमध्ये जाण्याचा त्यांचा विचार नसल्याचे सुत्रांकडून कळत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी जर मनसेला घेण्यास इच्छुक आहे, तर स्वतःच्या कोट्यातील जागा त्यांना सोडावी लागेल आणि ती जागा कल्याण-डोबिंवलीची आहे, असे तरी सध्या दिसत आहे.


हे देखील वाचा – ‘राज ठाकरे बदलले आहेत, त्यांना सोबत घ्या’ – अजित पवार

 

- Advertisement -

कल्याणचीच जागा का?

दरम्यान, आनंद परांजपे (२०१४ – १ लाख ९० हजार मतं) कल्याणमधून निवडणूक लढवणार नसल्याचं समोर आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला कल्याणमध्ये नवा पर्याय शोधावा लागणार होता. मात्र, मनसेसोबत आघाडी झाल्यास कल्याणची जागा मनसेसाठी सोडता येईल. २०१४च्या निवडणुकीत कल्याणमधून मनसेचे उमेदवार प्रमोद पाटील यांनी तिसऱ्या क्रमांकाची (१ लाख २२ हजार) मतं मिळवली होती. तेव्हा श्रीकांत शिंदे (४ लाख ४० हजार) यांच्या आणि म्हात्रेंच्या मतांमध्ये सुमारे ३ लाख मतांचं अंतर होतं. मात्र, आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे यांच्या संभाव्य बंडखोरीमुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. तसेच, केदार दिघे मनसेमध्ये देखील दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून तसे झाल्यास शिवसेनेची मतं मोठ्या प्रमाणावर फोडण्यात मनसेला यश मिळू शकेल. त्यामुळे आघाडी झाल्यास मनसेचाही कल्याणच्या जागेसाठीच आग्रह राहू शकेल.

काँग्रेस भिवंडी सोडणार नाही

दरम्यान, बाजूच्याच भिवंडी मतदारसंघातही परिस्थिती फारशी वेगळी नसून तिथे देखील २०१४मध्ये मनसेचे उमेदवार सुरेश म्हात्रे (९३ हजार ६००) यांनी तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळवली होती. मात्र, त्याचवेळी काँग्रेसच्या रामचंद्र पाटील यांनी ३ लाख १ हजार मतं मिळवत भाजपचे विजयी उमेदवार कपिल पाटील (४ लाख १० हजार) यांना कडवी टक्कर दिली होती. त्यामुळे काँग्रेस मनसेसाठी भिवंडीची जागा सोडणं सद्य घडीला तरी अशक्य वाटत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -