घरमुंबईशिवशाही चालकांची रॅश ड्रायव्हिंग पोलिसांसाठी डोकेदुखी

शिवशाही चालकांची रॅश ड्रायव्हिंग पोलिसांसाठी डोकेदुखी

Subscribe

मर्यादा घाला, अन्यथा कारवाई करण्याचे महामंडळाला पत्र

मुंबई पुणे एक्स्प्रेसवर खासगी वाहनांच्या भरधाव वेगाला लगाम लावण्यासाठी वाहतूक पोलिसांसह राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत, तर दुसरीकडे राज्य परिवहन मंडळाच्या शिवशाही आणि शिवनेरी या बसचालकांकडून सर्रासपणे वेगमर्यादांच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे प्रकार वाढत असल्याची माहिती समोर आली आहे. याविरोधात गेल्या काही दिवसांपासून प्रवाशांच्या तक्रारीदेखील वाढल्या आहेत. विशेष म्हणजे, याविरोधात आता पोलीस निरीक्षकांकडूनच थेट एसटी महामंडळाकडे तक्रार केल्याची माहितीदेखील आपलं महानगरच्या हाती आली असून, याविरोधात पोलीस निरीक्षकांकडून थेट कारवाईचा इशारादेखील देण्यात आला आहे.

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवर बसेस चालकाच्या स्पीड गव्हर्नन्सचे उल्लंघन करणार्‍या एसटीचालकांना आवरा, अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी लागेल, अशा शब्दात सूचना मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक पोलिसांनी काही दिवसांपूर्वी दिल्या आहेत. शिवशाहीचे वारंवार होणारे अपघात कमी करण्यासाठी चालकांना प्रशिक्षण देण्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली होती. मात्र, त्यानंतरही या वेगाला ब्रेक लावण्यात परिवहन विभाग अयशस्वी ठरले आहे. त्यामुळे आता वाहतूक पोलिसांनी याविरोधात थेट एसटी महामंडळाकडे धाव घेतल्याची माहिती पुढे आली आहे. पनवेल महामार्ग पोलीस निरीक्षक कार्यालयकडून एसटी महामंडळाच्या पुणे विभागाला एक पत्र पाठवून दिले आहे. ज्यात म्हटले आहे की, मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर बसकरिता वेगमर्यादा ही प्रति तास ८० किलोमीटर आहे.

- Advertisement -

मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर शिवशाही आणि शिवनेरीचे चालक वाहतूक नियमांचे आज पालन करत नसल्याचे समोर आले आहे. सोबत या पत्रात असे म्हटले आहे की, महामार्गावर जास्तीत जास्त अपघात हे अतिवेगाने वाहन चालवून वाहनावरील चालकांचे नियंत्रण सुटून झालेले आहेत. वाहन चालवताना त्यामध्ये बसलेल्या सर्व प्रवाशांची जबाबदारी त्या बसचालकांवर असते, परंतु बसचालक हे वेगमर्यादेचे उल्लंघन करून सर्व प्रवाशांचादेखील जीव धोक्यात घालतात. त्यामुळे एसटी मंहाडळाने आपल्या चालक वाहकांना वाहतूक नियमांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात यावेत, नाहीतर महामार्ग पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल. याबाबत महामंडळाला विचारणा केली असता प्रशासनाने कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला आहे.

शिवशाहीचे 252 अपघात
एसटी महामंडळाने आपल्या सेवेत आणलेल्या शिवशाही बसचे अपघात डोकेदुखी ठरत आहेत. राज्यात शिवशाही बसचे वर्षभरात तब्बल 252 अपघात झाले असून, 19 जणांचा यात मृत्यू झाला आहे, तर 190 प्रवासी गंभीर व 21 किरकोळ जखमी झाले. या अपघाताचे कारण म्हणजे एसटी कर्मचार्‍यांना शिवशाही चालविण्याचा अनुभव नाही. त्यामुळे त्यांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला. तरीसुद्धा आज सर्रास महामार्गावर शिवशाही आणि शिवनेरी बसचालकांकडून वेगमर्यादांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे आता महामार्ग पोलिसांनी पत्र पाठवून एसटी महामंडळाला चांगलेच धारेवर धरले आहे.

- Advertisement -

प्रशिक्षण नको पण रस्त्यांची दुरुस्ती करा
आम्हाला मुंबई ते पुणा प्रवासादरम्यान दिलेल्या वेळेत गाडी पोहोचवावी लागते. मात्र, आम्हाला महामार्गावरील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. इतकेच नव्हे तर आम्हाला मुंबई पुणे गाडी चालवताना ड्युटी शेडुलिंग सुद्धा मेंटेन करावे लागते. त्यामुळे एकप्रकारे कामाचा मानसिक ताण येतो. जर का आम्ही वेळेत पोहोचलो नाही, तर दुसर्‍या फेरीला लेटमार्क लागतो. प्रवाशांनासुद्धा त्रास होतो. त्यामुळे प्रवासी आमच्याविषयी तक्रार करतात. आम्ही कधीच प्रवाशांचा जीव धोक्यात टाकून वाहन चालवत नाही. मात्र, परिवहन मंत्र्यांनी प्रशिक्षण नको पण रस्त्यांवरची गर्दी कमी करावी, अशी माहिती एका शिवशाही चालकाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -