घरक्रीडाखेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध - क्रीडा मंत्री विनोद तावडे

खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध – क्रीडा मंत्री विनोद तावडे

Subscribe

नुकतेच पुणे येथे झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. महाराष्ट्राने या स्पर्धेत सर्वाधिक पदके मिळवण्याचा पराक्रम केला. त्यामुळे गुरुवारी या राष्ट्रीय स्पर्धेतील महाराष्ट्राच्या पदक विजेत्यांचा राज्य शासनाच्या वतीने सन्मान करण्यात आला. त्यावेळी खेळाडू आणि खेळाच्या उत्कर्षासाठी शासन कार्यरत असून, खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे महाराष्ट्राचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री विनोद तावडे म्हणाले.

तसेच या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सूचनेनुसार खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेल्या प्रत्येक खेळाडूला एक लाख रुपये, रौप्यपदक विजेत्यांना प्रत्येकी ७५ हजार आणि कास्यपदक विजेत्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये राज्य सरकारकडून बक्षीस म्हणून मिळणार असून, याची अंमलबजावणी येत्या पंधरा दिवसात होईल, असे आश्वासन तावडे यांनी दिले. त्याचप्रमाणे भविष्यात खेळाडूंना अधिक प्रोत्साहन मिळावे यासाठी, तालुका स्तरावर खेळणार्‍या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणात पाच गुण, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर खेळणार्‍या खेळाडूंना अनुक्रमे १०, १५, आणि २० गुण प्रदान करण्यात येणार आहेत. याचबरोबर राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर खेळणार्‍या खेळाडूंना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी पाच टक्के आरक्षण देण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर विजेत्या खेळाडूंना थेट शासकीय नोकरीत सामावून घेतले जाणार असल्याचेही तावडे यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

या कार्यक्रमाला तावडेंसोबतच शालेय आणि क्रीडा विभागाच्या अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा, आयुक्त सुनिल केंद्रेकर, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, उपसचिव राजेंद्र पवार, सहसंचालक नरेंद्र सोपल, उपसंचालक एन. बी. मोरे उपस्थित होते.

सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेला आपला देश, पण मोठ्या स्पर्धांमध्ये आपल्याला म्हणावे तसे यश मिळवता येत नाही, यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी खेळांवर विशेष लक्ष केंद्रित केले. त्या अनुषंगाने खेलो इंडिया स्पर्धा मागील वर्षापासून सुरू करण्यात आली. यंदा या स्पर्धेचे यजमानपद महाराष्ट्राला मिळाले आणि आपल्या राज्याने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन केले. त्याचबरोबरीने राज्याने सर्वाधिक पदकेही मिळवली, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. आता २०२८ साली होणार्‍या ऑलिम्पिक स्पर्धेत आपल्या देशाला जास्तीत जास्त पदके मिळवून देऊन मिशन ऑलिम्पिक सर करायचा आहे. त्यासाठी प्रत्येक पात्र खेळाडूला पुढील आठ वर्षे दरवर्षी पाच लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. या शिष्यवृत्तीचा उपयोग करून खेळाडूंनी मेहनत घ्यावी आणि पदक मिळवून देशाचा मानसन्मान वाढवावा, असे आवाहनही तावडे यांनी केले.

- Advertisement -

खेलो इंडिया स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये दुहेरी गटात सुवर्ण तर एकेरी गटात कास्यपदक पटकावणार्‍या खारघरच्या स्वस्तिका संदीप घोष हिचा विनोद तावडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. स्वस्तिकाने राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. ज्युनियर गटात देशात दुसरी तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ३२ वी सीडेड स्वस्तिका खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलची विद्यार्थीनी आहे. तिला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी फ्रान्स येथे प्रशिक्षणासाठी आर्थिक मदत, तसेच रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये सरावासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

स्वस्तिकाने हाँगकाँग, जॉर्डन, श्रीलंका यांसह इतर देशांमध्ये झालेल्या स्पर्धांत अजिंक्यपद पटकावले आहे. स्वस्तिकाला ‘विराट कोहली फाऊंडेशन’कडून स्कॉलरशिपही जाहीर झाली आहे. या संस्थेद्वारे स्कॉलरशिपसाठी निवड झालेली ती भारतातील एकमेव टेबल टेनिस खेळाडू आहे. स्वास्तिकाचे वडील संदीप घोष हे प्रशिक्षक आणि सल्लागार आहेत. स्वास्तिकाने २०१३ मध्ये गुजरात येथे झालेली राष्ट्रीय रँकिंग सेंट्रल झोन टेबल टेनिस चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर प्रत्येक वर्षी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रगती दाखविली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -